गुढीपाडवा - हिंदू नववर्षाचा आरंभ

प्रतिनिधी 21/03/2015

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.

पाडवा हा सण का साजरा केला जातो याबाबतच्या वेगवेगळ्या उपपत्तीत आहेत. ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केले आणि कालगणना सुरू झाली असे ब्रम्हपुराणात म्हटले आहे. ती चैत्र शुद्ध प्रतिपदेची सकाळ मानतात. अशा तऱ्हेने पाडवा हा जगाच्या उत्पत्तीचा दिवस ठरतो. त्या दिवशी श्रीरामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येत परत आले असेही मानले जाते. त्या वेळी अयोध्यावासीयांनी घरांना तोरणे लावून, विजयपताका अर्थात गुढ्या उभारून आनंद साजरा केला. म्हणून भारतीय लोक त्यांच्या निवासस्थानी गुढ्या उभारून त्या दिवसाचे व नववर्षाचे स्वागत करतात.

आणखी एक कथा अशी आहे, की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यांमध्य प्राण फुंकून त्यांच्या साह्याने शकांचा पराभव केला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. शालिवाहनाने मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली - शालिवाहनाच्या चमत्काराचा असा तर्कसुसंगत अर्थ काढता येतो. त्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना ‘शालिवाहन शक’ अशी सुरू करण्यात आली. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिप्रदा! ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते ‘शक’ अशा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ या संज्ञेमध्ये झाला आहे. अजूनही शालिवाहन शकानुसार भारतीय कालगणना होते. त्यानुसार हिंदू पंचांगे तयार केली जातात. भारतातील काही प्रांतांत कार्तिक प्रतिपदेला, तर काही ठिकाणी मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानले जात असले तरी ‘शालिवाहन शक’ मात्र सर्वदूर रूढ आहे.

चैत्र महिन्यात सभोवतालच्या सृष्टीत बदल होऊ लागतात. शुष्क झालेली सृष्टी चैत्राच्या नव पालवीने फुलून जाते. वसंत ऋतूची चाहूल लागते. निसर्गातील त्या परिवर्तनाचे, नवचैतन्याचे स्वागत करण्याचा उद्देश दारी गुढी उभारण्यामागे दिसून येतो. तो दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात ‘उगादी’ नावाने साजरा करण्यात येतो.

त्या दिवशी पहाटे घरातील सर्व माणसे तैलाभ्यंग करून गरम पाण्याने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. (पूर्वी ओवा, जिरे, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खाण्याची प्रथा होती. गावाकडे अंगण शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या जात.) त्यांनंतर गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करून रांगोळीने सुशोभित केली जाते. स्वच्छ धुतलेल्या बांबूला रंगीत रेशमी वस्त्र, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांचा हार व साखरेची गाठी बांधतात. यासाठी कळकाच्या काठीचाही उपयोग केला जातो. त्यावर चांदी, तांबे किंवा पितळ यांचा गडू किंवा भांडे पालथे घातले जाते. काठीला गंध, फुले, अक्षता लावतात. अशी तयार झालेली गुढी नियोजित जागेवर उभी करतात. गुढीला धर्मशास्त्रात ‘ब्रम्हध्वज’ असे म्हणतात. ‘ब्रह्म’ ही भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ कल्पना आहे. ‘ब्रह्म’ हा शब्द बृह म्हणजे वाढणे, मोठे होणे या धातूवरून बनला आहे. जे बृहत्तम किंवा महत्तम आहे आणि ज्यात ‘वाढणे’ या क्रियेचे सर्व अर्थ समाविष्ट आहेत ते ‘ब्रह्मा’ आहे. गुढीचे पूजन म्हणजे ब्रह्मध्वजाचे पूजन. परंपरेप्रमाणे गुढीची पूजा करून तिला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. निरांजन आणि उदबत्ती लावली जाते. पूजा करताना ‘ब्रम्हध्वजाय नम:’ अर्थात -

 

ब्रम्हध्वज नमस्तेsतु सर्वाभिष्ट फलप्रद |
प्राप्तेस्मिनसंवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ||

हा मंत्र म्हणतात. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवतात. गुढी उतरवण्यापूर्वी तिला हळदकुंकू, फुले, अक्षता वाहून नैवेद्य दाखवून ती उतरवण्याची पद्धत आहे.

गुढीला कडुलिंबाची डहाळी लावली जाते. पुराणातील कथेप्रमाणे - समुद्रमंथनातून वर आलेला अमृतकुंभ मिळवण्यासाठी देव-दानवांत झटापट झाली. त्या झटापटीत अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातून कडुलिंबाचे रोप तयार झाले. कडुलिंबाला ब्रम्हदेवाचे प्रतीक मानतात. कडुलिंबामुळे हवा शुद्ध होते. ते एक उत्तम कीटकनाशकही आहे.

पाडव्याला पंचांगपूजन व वाचन करतात. त्या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात. चैत्र महिन्यात रोज सकाळी अंगणात एक चौकोन सारवून त्यावर विशिष्ट प्रकारची रांगोळी म्हणजेच ‘चैत्रांगण’ काढतात. चैत्रांगणाला हळदकुंकू व फुले वाहतात. देवीचे वासंतिक नवरात्र व श्रीरामाचे नवरात्रही गुढीपाडव्यापासून सुरू करतात. तो कुलाचाराचा भाग आहे. 

गुढीपाडव्याला काही धार्मिक विधी पार पाडले जातात. त्यात ब्रम्हपूजा हा महत्‍त्‍वाचा विधी असतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने त्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवउपक्रमांचा प्रारंभ ठरवून केला जातो.

गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत काळानुसार बदलत गेली आहे. गुढीपाडव्याला सकाळी ठिकठिकाणी मिरवणुका काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक पोशाखात स्त्री-पुरुष स्वागतयात्रांत सहभागी होतात. त्याशिवाय समाजप्रबोधन करणारे चित्ररथ साकारले जातात. मिरवणुकींमध्ये लेझीम, ढोल, झांज, कीर्तन अशा विविध पथकांचा समावेश केला जातो. सोबत लाठीकाठी, दांडपट्टा आणि भाला फिरवणे अशी प्रात्यक्षिके दाखवली जातात. ज्या मार्गावरून स्वागतयात्रा जाणार असतात, तेथील चौकाचौकांत भव्य रांगोळ्या आणि उंच गुढ्या उभारल्या जातात. अशा मिरवणुका, चित्ररथ आणि शोभायात्रांसाठी गिरगाव-ठाणे-डोंबिवली यांसारखी मुंबई इल्याख्याजवळील ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्राबाहेर विखुरलेली मराठी मंडळी त्यांच्या राहत्या ठिकाणी गुढीपाडवा साजरा करतात. दिल्लीत काही लाख मराठीजन आहेत. त्यामुळे तेथे अनेक ठिकाणी गुढीपाडव्याचा उत्सव दिसून येतो. जनकपुरी येथील दत्तविनायक मंदिरात सकाळी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. मंदिरावरील ध्वजही दरवर्षी गुढीपाडव्याला बदलला जातो. पश्चिम दिल्लीतील आनंदवन मराठी सहनिवास, चौगुले विद्यालय, मध्य दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदन अशा अनेक ठिकाणी गुढीपाडवा साजरा होतो. इंदूर संस्थानाला देवी अहिल्याबाईंसारख्या धर्मपरायण व कुशल प्रशासकीय गुण असलेल्या महिलेचे नेतृत्त्व लाभल्यामुळे तेथे मराठी संस्कृती अधिक जोमाने फुलली आणि फळली. त्यामुळे महाराष्ट्रातील सणवार तितक्याच श्रद्धेने अन् दणक्यात साजरे करण्याची परंपरा तेथे आजतागायत सुरू आहे. सामान्य जनतेप्रमाणेच होळकर राजघराण्यातही गुढीपाडवा हा सण विधीपूर्वक साजरा केला जाई व अद्यापही त्या घराण्याच्या वंशजांमार्फत साजरा होत असतो. पूर्वी होळकर राजे किंवा त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रतिनिधींद्वारा व सध्या राजपुरोहितामार्फत त्या परंपरेची पूर्तता होत असते. नव्या पिढीने त्या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले आहे. जुन्या राजवाड्यासमोरील उद्यानात व इतरत्रही नव्या वस्त्रालंकाराने सजलेले स्त्री-पुरुष सूर्योदयाच्या वेळी सूर्याला सामूहिक अर्घ्यदान करून नव्या वर्षाचे स्वागत करतात. त्या सोहळ्यात मराठी भाषिकांबरोबरच स्थानिक हिंदी भाषिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात. तो सोहळा प्रेक्षणीय असतो. ‘सानंद न्यास’ संस्थेच्या वतीने प्रात:कालीन संगीत सभेच्या माध्यमातून सुमधूर संगीत लहरींनी नव्या वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे.

- आशुतोष गोडबोले

 

लेखी अभिप्राय

अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद.

आनंद गायकवाड 08/04/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.