महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई!चोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्‍ट दिवस...  सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी उभे राहून अनेक किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर उत्तर एकच - महाराष्ट्रातील सर्वोच्च माथा, कळसुबाईचं शिखर! ती सारी मजा शिखरावर उभे राहून अनुभवता येते.

कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. शिखराची उंची पाच हजार चारशे फूट म्हणजेच एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर. सह्याद्रीच्‍या रांगेत पाच हजार फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्‍यांपैकी ‘घनचक्कर’च्‍या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. दुस-या क्रमांकावर ‘साल्हेर’वर असलेले ‘परशुराम मंदिरा’चे शिखर (१५६७ मीटर) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर'! तो ट्रेक तीन तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. शिखरापर्यंत पोचण्यासाठी ट्रेकिंग आणि पादचारी असे मार्ग आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून सहा किलोमीटरवर असलेल्‍या बारी गावापासून सुरू होतो. नाशिक - इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. कळसुबाई पुण्‍यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला रंधा धबधबा आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे समुद्र नाला हे घनदाट जंगलही त्याच भागात आहे.

ऑफिसला शुक्रवार-शनिवार सुट्टी होती. शनिवारी कळसुबाईला जाण्‍याचे नक्की केले. ऑफिसचा मित्र कल्याण सोबत येण्‍यास तयार झाला. शुक्रवारी रात्री बारा वाजता कल्याणला कुशीनगर एक्स्प्रेस पकडली. दरवाज्यात उभे राहत इगतपुरीकडे प्रवास सुरू झाला. उत्तर भारतात जाणारी कुठलीही लांब पल्ल्याची गाडी कसारा-इगतपुरीला थांबते. एसटीची सेवाही पुणे-नाशिकहून इगतपुरीपर्यंत उपलब्ध आहे. पहाटे अडीच वाजता इगतपुरीला पोचलो आणि पंधरा मिनिटांवर असलेला एस.टी. स्टँड गाठला. इगतपुरी-पुणे एस.टी. पहाटे पाच वाजता पकडली.

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई!भंडारदरा मार्गावर असलेल्या बारी गावात अर्ध्या तासात उतरलो. थंडी कडाक्याची होती. बाहेर अंधार होता. चांदण्या छान दिसत होत्या. सूर्योदय सात वाजता झाला आणि कळसुबाई शिखराचे बारी गावाच्या मागे दर्शन झाले. पायथ्याच्या बारी गावातून शिखराची उंची अंदाजे नऊशे मीटर आहे. त्यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. आम्‍ही लगेच चालायला सुरुवात केली. शिखराचे वेगवेगळ्या ‘लूक’ने फोटो काढत बारी गाव पार केले, छोटासा ओढा ओलांडला, शेतांमधून वाट काढत चढाईला सुरुवात केली.

बारी गावातून थोडे अंतर पुढे गेल्यावर वाटेत हनुमानाचे मंदिर लागते. त्‍या मंदिरापाठीमागील मार्गाने शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग सुरू होतो. दक्षिणेकडून जाणारी गुरांची वाट, तसेच उत्तरेकडील इंदुरे गावातून शिखरावर जाण्यासाठी वाटा आहेत.

कुठलेही प्रदूषण नाही, आवाज नाही, त्यामुळे चालताना मजा येत होती. वातावरण प्रसन्न होते. चढाई करताना सुरुवातीलाच दगडी पायऱ्या लागतात. त्‍यांची उंची साधारण ढोपराएवढी आहे. तीस पायऱ्या पार करत, शेतांमधून वाट काढत शंकराच्या मंदिराजवळ येऊन पोचलो. बाजूच्या वड-पिंपळाच्या झाडांवर पक्ष्यांचा चिवचिवाट अखंड  सुरू होता. अशी सकाळ बऱ्याच दिवसांनी अनुभवत होतो!

पायथ्यापासून शिखरमाथ्यावर पोचायला साधारण तीन तास पुरतात. थेट शेवटच्या टप्प्यात विहीर आहे तेथेच पाणी मिळू शकते. वाट अवघड नव्हती. चांगली मळलेली पायवाट पकडली आणि डोंगराला भिडलो! दगडांमधून वाट काढत हाश्श-हुश्श करत चढाई सुरू राहिली. मधेच मागे वळून बघितले तर धुक्याबरोबर लपाछपी करत असलेले  बारी गाव दिसले. त्याचे फोटो काढत पहिल्या शिडीपाशी येऊन पोचलो. कळसुबाईचा डोंगर चढण्यास सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसुबाईचे नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी ते मंदिर बांधलेले आहे. त्‍यामुळे चढाईपूर्वी आणि चढाईनंतर अशा दोन्‍ही वेळेस कळसुबाईचे दर्शन होते.

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई!महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई!शिखरावर जाण्यासाठी असलेल्या एकूण चार शिड्या साधारण वीस वर्षांपूर्वी लावल्या आहेत. त्याच्याही आधी अनेक लोक ट्रेकच्या निमित्ताने किंवा कळसुबाई देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने शिखरावर जात. तो प्रवास किती कठीण होता, किती कसरत करावी लागत असेल असा विचार करत आम्ही पहिली शिडी पार केली. शिड्यांच्या पायऱ्या काहीशा अरुंद असल्याने गर्दी न करता, त्या अतिशय शांतचित्ताने चढाव्या व उतराव्या लागतात. वाटेत आंबा, करवंद आणि जांभूळ यांची अनेक झाडे लागतात. त्या मार्गावर अवघड ठिकाणी किंवा वळणावर रेलिंग, तर काही ठिकाणी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्‍यामुळे चढाई अधिक सोपी आणि जलद होण्यास मदत झाली आहे. दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत. ती कळसुबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे.

गावांतील काही लोकांकडून असे ऐकले, की दोन वर्षांपूर्वी शिखरापर्यंत जाण्यासाठी कच्चा छोटा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. त्यासाठी काही निधीही जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला होता. मात्र शिखरापर्यंत कच्चा छोटा रस्ता तयार करणे अवघड असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेण्याची गरज आहे असे लक्षात येताच काम सोडून देण्यात आले. मंजूर निधीचा वापर कड्याच्या ठिकाणी रेलिंग लावणे आणि पायऱ्या तयार करणे यासाठी झाला.

तीन शिड्या आणि अनेक अवघड वळणे पार केल्यावर आम्हाला शिखराचे दर्शन झाले. गंमत म्हणजे पदभ्रमण करणाऱ्याने बारी गाव सोडल्यावर शिखराचे दर्शन होत नाही व त्यामुळे अजून किती चालायचे असा प्रश्न त्याला पडत राहतो. शेवटच्या टप्प्यात मात्र माथा दिसतो. चढाची आणखी एक मजा म्हणजे, तो सर्व चढ डोंगराच्या एका बाजूने आहे. म्हणजे खाली उभ्‍या असलेल्या व्‍यक्‍तीला गिर्यारोहक शेवटपर्यंत दिसू शकतो.

माथा दिसल्याने आमचा चालण्याचा वेग वाढला आणि आम्ही अचानक थबकलो. कारण चक्क खमंग भज्यांचा वास येत होता! विहिरीच्या समोर छप्पर असलेल्या एका आडोशामध्ये एक वृद्ध गृहस्थ भजी तळत होते. तिथेच बसकण मारली आणि चांगली दोन प्लेट गरमागरम भजी हाणली. फ्रीजमधील पाण्याचा थंडावा कमी वाटेल एवढे थंड विहिरीतील पाणी प्यायलो, फ्रेश झालो आणि भराभर शिखराच्या दिशेने पावले टाकत गेलो.

अखेरची शिडी उंच होती, पण ती झपाझप चढत माथा गाठला. आजुबाजूला दूरवर जे दृश्य दिसत होते त्यामुळे थक्क झालो. दूरवर पूर्वेकडे विश्रामगड, बितनगड आणि सह्याद्रीतील सर्वात कठिण ट्रेकचे त्रिकुट अलंग-मलंग-कुलंग दिसत होते. उत्तरेकडे औंढा, पट्टा, रामसेज, हरिहरगड, ब्रम्हगिरी, अंजनगिरी, घरगड, बहुला, त्रिंगलवाडी, कवनाई हे गड आहेत. त्याच्या बाजुला पसरलेली पवनचक्क्यांची रांग... दक्षिणेकडे दूरवर हरिश्चंद्रगड, रतनगड, पाबरगड, घनचक्कर डोंगर, कात्राबाईचा डोंगर, खुट्टा सुळका आणि आजुबाजूचा डोंगर आहे. शिखरावरून भंडारदऱ्याचा विस्‍तीर्ण जलाशय लक्ष वेधून घेतो. जोडीला ऑर्थर जलाशय आणि परिसरही दिसतो. अचला अहिवंत, माहुली हे किल्ले दिसतात म्हणे! अर्थात त्यासाठी वातावरण स्वच्छ पाहिजे.

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई!शिखरावर कळसुबाईचे मंदिर आहे. त्‍याचा आकार एकावेळी तीन व्‍यक्‍ती मावतील एवढा छोटा आहे. शिखरावर मंदिराशेजारी खडकात रोवलेला त्रिशुळ आणि शेजारी खांबाला बांधून ठेवलेल्या अनेक घंटा दिसतात. मंदिरात स्‍थानिक पुजा-याकडून दर मंगळवार-गुरुवार पूजा केली जाते. नवरात्रीत शिखरावर उत्‍सव साजरा केला जातो. उत्‍सवकाळात देवीच्‍या मूर्तीची सजावट केली जाते. त्‍यावेळी वर येताना वाटेने अनेक मोहोरीची पिवळी फुले, रानफुले दिसतात. त्या शिखराविषयीची दंतकथा प्रचलित आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती राहाळात राहत होती. कामाच्या निमित्ताने ती इंदुरे गावात आली. इंदुरे गावात ती पाटलाच्या घरी काम करू लागली. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती, की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा, पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला केरकचरा काढण्यास व भांडी घासण्यास लावली. त्यामुळे कळसू चिडून डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसुबाईचा डोंगर होय. तिने भांडी घासली ती जागा थाळेमेळ आणि केरकचरा काढला ती जागा काळदरा या नावाने ओळखतात. काही दंतकथांमध्‍ये, कळसूने शिखरावर देहत्‍याग केला. त्‍यामुळे ते शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्‍यात आले असा उल्‍लेख आढळतो. त्या शिखरासंबंधी असणारी आणखी एक कथा म्हणजे १८६० साली आर्चडीकन गेल या इंग्रजाने रात्रीच्या वेळेस शिखरावर चढाई केली. गेलने पहाटेच्या समयी शिखरावरून सूर्योदय पाहिला. त्‍या दृश्‍याने प्रभावित झालेल्या गेलने कळसुबाई शिखराला ‘दि किंग ऑफ द डेक्कन हिल्स’ असे म्हटले!

याच भागात कळसुबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्‍य आहे. तेथे बिबट्या, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू, रानमांजर, चिंकारा, उदमांजर, तरस असे अनेक प्राणी आढळतात. सोबत मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरूड, धोबी, शिंपी, खाटीक, सुगरणी, बगळे, करकोचे, रंगीत करकोचे, खंड्या, बंड्या. स्थानिक आणि स्थलांतरित असे शंभर प्रकारचे पक्षीही पाहण्‍यास मिळतात. नोव्‍हेंबर ते मे हा तेथे फिरायला जाण्‍याचा योग्य काळ आहे.

आम्‍ही परिसराचे फोटो काढले, कळसुबाईचे दर्शन घेतले. थोडे खाऊन घेतले आणि माथ्यावर चारी बाजूंनी फेरफटका मारण्यास सुरुवात केली. प्रवेशाची बाजू सोडता सर्व बाजूंनी रेलिंग टाकण्यात आले आहेत. ते काम एवढ्या उंचावर करणाऱ्यांना मनातून सलाम ठोकला. मागील बाजूला कोकण कडा आहे. मोठी खोल दरी आहे. शिखरावर सावलीलाही झाड नाही. आम्ही मंदिराच्या छोट्या सावलीत शांतपणे डुलकी काढण्यास पडलो. वारा वाहत होता, त्यामध्ये थंडावा असल्याने थंडी वाजू लागली. आम्ही आमचा डेरा उन्हात टाकला आणि अर्धा तास छानपैकी पडून राहिलो. आकाश एवढे निळेभोर दिसत होते, की त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. स्वच्छ वातावरण असल्याने निळ्या रंगाची गडद छटा नजरेत भरत होती.

एव्हाना दुपारचा दीड वाजला होता, चला आता निघुया म्हणत तेव्हा उठलो आणि तेथे दोन चक्क वृद्ध स्त्रियांना बघून घेरीच यायची वेळ आली! त्या त्यांच्या दोन नातवंडांसह संगमनेरजवळच्या कोठल्याशा गावातून आल्या होत्या. का? तर देवीच्या दर्शनाला! तेही पायात चप्पल न घालता. किती वेळ लागला तर म्हणाल्या, अकराच्या एस.टी.ने आलो. म्हणजे फक्त अडीच तासांत त्या वर पोचल्या होत्या! बरोबर फक्त पाण्याची बाटली. शिखरावरील वेगवेगळ्या लोकांचे अनुभव मनात ठेवत, परिसराची दृश्ये डोळ्यांत साठवत उतरण्यास सुरुवात केली.

- अमित जोशी

(छायाचित्रे - अमित जोशी)

Last Updated On - 25th Sep 2018

लेखी अभिप्राय

Khup chan. Thanks for information

Antariksha surve21/06/2014

TETHUN GHATGHAR HYDROPOWER STATION CHA NAZARA DISATO KA?

SURUL PETKAR13/07/2014

खुपचछान

Yogesh magar15/12/2014

VERY VERY SMART

NIKAM SURYAKAN…18/05/2015

agdi chan warnan kele aahe vachtanna pratyaksh kalasubai yethe aslyacha bhas hoto

suresh kote Latur16/06/2015

सुंदर वर्णन लिहीले आहे, वाचून केव्हा एकदा पाहून येतो असे वाटते आहे.

चंद्रकांत22/11/2015

Very very interesting. Thank's a lot for giving so good information. Tempted to visit.

Samuel I. Kaley.04/04/2016

Khup chan varnan aani savistar pan. Akda nakki jayin

suvarna patil08/04/2016

खूप छान. आता तर केव्हा शिखर पाहतो असे झाले.

महेश19/06/2016

क्षमा असावी सर. शंकरचे मंदिर नाही बारी गावात. तुमचा काही तरी गैरसमज झालाय.

dasharath khade30/06/2016

We are visit that place but very bad experience. No sign board put that place from MH Govt. Even village people are not helpful to tourist. In rainy season can't see anything like falls, mountain etc.

jigar mewada04/07/2016

जय शिवराय!!!

खुप छान प्रवास वर्णन मांडलात, ,,वाचताना आम्हीही आपणासोबत आहोत असं वाटलं ______ दिवाळीत आम्ही प्लॅन करतो, आपला अनुभव सोबत घेऊन!!! धन्यवाद!!!

श्रीकांत जंगम17/08/2016

कळसुबाई शिखरावर नविन जाणारांसाठी खुपच मार्गदर्शक माहीती आहे .

गणपत नारायण पांगारे23/08/2016

1 च नम्बर

रवि साबळे 08/10/2016

AAPLYA HYA UPKRAMA MULE SHIKAR PAHANYACHI AANI MAHARASHTRA MADHIL SHIKRANCHI MAHITI MILALI
THANK YOU.

SANDIP & SUMANT12/10/2016

खुपच छान वर्णन केलय सर

लक्ष्मण शिंदे 29/10/2016

महाराष्टातील एकूण शिखरे व उंची

दिपक चहाण28/11/2016

Very nice blog...& good information along with photography. Hey, i want to see Kalsubai in Rainy season (Mid of July), so just curious, is it safe to go to Kalsubai now?

Dinesh Nikumbh10/07/2017

धन्यवाद...सर
मी कळसुबाई येतील मूळ रहिवशी आहे सर मस्त माहिती दिली सर मी आता पर्यटक लोकांनी जेवणाची सोय होत नसल्याने आम्ही घरगुती जेवण आमचे मोठे बंधूराज श्री तानाजी काळू खाडे मो 9765640983 यांनी केली आहे
पत्ता कळसुबाईं माची मंदिर शेजारी
बारी ता अकोले जिल्हा अ.नगर
पिन 422604

दशरथ खाडे21/10/2017

धन्यवाद

रोमन07/02/2018

खरच मला खुपच छान वाटले आयुष्यात मि पहिल्यांदाच आशि ट्रेकिंग केलि.
20/07/2018

राजेंद्र शिरकांडे 22/07/2018

खुप छान वर्णन केले आहे.वाचुन असे वाटले की स्वताह जाऊन आलो आहोत. धन्यवाद

RAMESH MADURE16/08/2018

खूपच छान लेख आहे.
ट्रेकचे वर्णन अप्रतिम

प्रा. नितीन जाधव 19/12/2018

अतिशय छान. प्रवास वर्णन.

Sunil Kshirsagar09/06/2019

खुप छान माहिती दिली.

Kapil kumbhar28/11/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.