लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण


लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाणपाच सुलोचनांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला. सर्वात पहिली ‘इंपीरियल मुव्हीटोन’ची नायिका रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना, मराठी - हिंदी चित्रपटांची नायिका साहेबानू लाटकर ऊर्फ सुलोचना, नायिका सुलोचना चटर्जी, पार्श्वगायिका सुलोचना चोणकर (संगीतकार अविनाश व्यास यांची पत्नी) आणि नंतरच्या काळातील लावणीसम्राज्ञी सुलोचना कदम-चव्हाण!

सुलोचना चव्‍हाण यांचा जन्‍म १७ मार्च १९३३ रोजी मुंबई येथे झाला. कदम कुटुंब मूळ कोल्हापूरचे, पण सुलोचनाचे बालपण ठाकूरद्वारच्या फणसवाडी परिसरात चाळसंस्‍कृतीत गेले. सुलोचनाला जवळचे लोक प्रेमाने माई म्हणून संबोधतात. माईच्या आईचा व्यवसाय फुलविक्रीचा होता. माई बालपणापासून नियमित असे गाणे शिकली नाही. ती घरचा रेडिओ आणि ग्रामोफोन यांवरून जे काही कानावर पडेल ते तन्मयतेने ऐकून गात असे. तिचे कोणी गुरू नाहीत; तसेच, तिचे कोणी शिष्यही नाहीत.

त्याकाळी मुंबईत अनेक मेळे होते. माईच्या घरीच एक मेळा होता. त्‍याचे नाव ‘श्रीकृष्ण बालमेळा’. त्‍या मेळ्यात माईसोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. तो मेळा म्‍हणजे माईचे कलाक्षेत्रातील पहिले पाऊल म्‍हणता येईल. माई लहान असताना वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली ‘सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची’ ही लावणी गुणगुणत असे. तिने त्यासाठी आईकडून भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे तिच्या आईला वाटायचे. माईला हिंदी, उर्दू व गुजराती भाषा अवगत आहेत. तिने हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केल्या आहेत.

माई १९४६-४७ पासून हिंदी चित्रपटात पार्श्वगायन करू लागली. ‘श्रीकृष्ण बालमेळ्या’मधील रंगभूषाकार दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. माई त्यांच्यामुळे संगीत दिग्दर्शक श्यामबाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे पहिले गाणे गायली. त्‍यावेळी तिचे वय होते केवळ नऊ वर्षे. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता. त्‍याचे नाव होते ‘कृष्ण सुदामा’. ‘त्‍या गाण्‍याच्‍या रेकॉर्डिंगसाठी आपण फ्रॉकमध्ये गेलो होतो’ अशी आठवण माई सांगते. त्‍यानंतर तिने मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. तिच्या नैसर्गिक आवाजाने अण्णासाहेब (सी. रामचंद्र), मुश्ताक हुसेन, ज्ञानदत्त, एस. के. पाल, पी. रमाकांत, निसार बझ्मी, प्रेमनाथ, पंडित शामसुंदर यांच्यासारखे संगीतकार प्रभावित झाले. तिने त्यावेळेस ‘सी. रामचंद्र’ यांसोबत ‘जो बिगड गयी वो किस्मत हूँ, नजर से नजर लड गयी, जिगर में छूरी गड गयी, हाय राम’ अशी द्वंद्वगीते गायली. माईला मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर पार्श्वगायनाची संधी मिळाली. तिने वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत ‘भोजपुरी रामायण’मध्‍ये गीत गायले.

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाणमाई हिंदीतून मराठी चित्रपटात आली ती ‘ही माझी लक्ष्मी’ (१९५१) या चित्रपटाद्वारे. त्‍याचे संगीतकार होते वसंत देसाई. माईने त्‍या चित्रपटासाठी गायलेली लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली. माईने १९५३-५४ च्या सुमारास ‘कलगीतुरा’ या चित्रपटासाठी राजा बढे यांनी रचलेल्या काही लावण्या गायल्या. शामराव चव्हाण यांनी त्या चित्रपटाचे दिग्‍दर्शन केले होते. पुढे शामराव चव्हाण यांच्‍यासोबत माईचे लग्न झाले आणि त्‍या सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. शामराव चव्हाण यांनी सुलोचनाबाईंना शब्‍दोच्‍चारांचे तसेच कुठल्या शब्दावर जोर द्यायचे त्याचे शिक्षण दिले. माईंच्‍या लावणीला त्याचा मोठा फायदा झाला.

दिनकरराव अमेंबल यांनी माईला रेडिओवर गाण्याची संधी दिली. यंग इंडिया, कोलंबिया, ट्वीन, एच.एम.व्ही. या रेकॉर्ड कंपन्यांनी तिच्या आवाजावर लुब्ध होऊन तिच्या आवाजात खाजगी ध्वनिमुद्रिका काढल्या. ती बेगम अख्तरच्या गझला, सुंदराबाईच्या बैठकीच्या लावण्याही त्याच ढंगाने गात असे. पन्नासच्या भगीनींची सद्दी असतानाही माईची अनेक गाणी तूफान लोकप्रिय झाली होती. उदाहरणार्थ, ‘भलते बोलू नका मला सासुबाई तुमच्या बोलण्याला मुळी बाई ताळ नाही’

मधुकर पाठक यांनी लिहिलेली मुंबईची लावणी -

मला मुंबईची गंमत दाखवा हो,
मला मुंबईची गंमत दाखवा हो
चौपाटीची हवा थंड चाखवा
बोरीबंदरचा गर्दीचा नाका
कस चालावं जीवाला धोका
काळ्या घोड्याचा झोक लई बांका हो
पालव बंदरच्या बाकावर बसवा

लोकप्रिय हिंदी सिनेमातील गाण्याच्या चालीवर मराठी गाणी होत असत. त्यातील लोकप्रिय गाणे होते, राजकपूरच्या श्री - ४२० मधील ‘इचक दाना बिचक दाना’ चालीवर रचलेले, माईने लताला तोडीस तोड असे गायलेले.

माझ्या हाती माणिक मोती घालीते
उखाणा ठणठणाना
घरचा मोती आता झाला माझा हा
उखाणा ठणठणाना
पाऊस नाही, पाणी नाही, रान कसे हिरवे
कात नाही चूना नाही तोंड कसे रंगले
ओऽऽ खातो मोती,
पितो पाणी गातो हा दीवाना ....
हा उखाणा, बोला ! पोपट !

माझे वडील हरिभाऊ पुराणिक हार्मोनियम वादक असल्याने त्यांची व माईची चांगली ओळख होती. त्यांनी मांगलवाडीतील आमच्या द्विज विहार चाळीत माईच्या गाण्यांचा कार्यक्रम १९५७ साली सार्वजनिक गणेशोत्सवात ठेवला होता. त्यावेळी माई लावणीसम्राज्ञी झाली नव्हती, तरी कार्यक्रमाला गर्दी होती. तबल्यावर माणिकराव पोपटकार साथ करत होते. माईने तो कार्यक्रम विविध प्रकारची गाणी गाऊन तीन तास रंगवला. शमशाद बेगमसारखा खुला, दाणेदार आवाज! त्या आवाजात जोश होता, तारुण्याची मस्ती होती, नखरा होता, प्रणयाची धुंदी होती, जोडीला भाबडेपणाही होता. खणखणीत बंद्या रुपयासारखा तो आवाज कुठेही पडला तरी वाजला पाहिजे असा! त्यातील कोल्हापूर लवंगी मिरचीचा ठसका ऐकताना मन हरखून जात असे. तिची गायकी श्रोत्यांच्या हृदयाला भिडे. पंडित शामसुंदर यांच्यासारख्या प्रतिभावंत संगीतकाराला तिच्या आवाजाची भुरळ पडली. ‘‘गाण्‍यात अंतरे कसेही असोत, पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे’’ असे माईचे ठाम मत होते. त्‍याचा प्रत्यय तिने गायलेल्या लावण्यांतून येतो.

माईने मराठीव्यतिरीक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषांमध्ये भजन, गझल असे विविध प्रकार हाताळले आहेत. मात्र सर्वसामान्‍यतः माईच्‍या लावण्या ऐकताना संगीतातील तिची इतर मजल थोडी दुर्ञलक्षित झाल्‍याचे दिसते. तिचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी माईला जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. माईच्या आयुष्यातील ती महत्त्वाची आठवण. माईचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना मोठे आश्चर्य वाटले होते!

माईच्या आवाजाची योग्य दखल फक्त रेडिओ सिलोनने घेतली. तिची जवळपास पाऊणशे हिंदी गाणी आहेत हे रेडिओ सिलोनमुळे संगीत श्रोत्यांना कळले! पाकिस्तान, बलुचिस्तान, ब्रह्यदेश इतक्या दूरदेशांतून श्रोते तिच्या गाण्यांची फर्माईश देत असतात.

तिच्या गायन कारकिर्दीला १९५५ मध्ये अनपेक्षित वळण मिळाले. निर्माता - दिग्दर्शक शामराव चव्हाण यांनी ‘कलगीतुरा’ या तमाशापटाची निर्मिती केली. कथा-पटकथा, संवाद प्रबोधनकार ठाकरे यांचे होते तर संगीत दत्ता कोरगावकर यांचे. माईने पार्श्वगायन केलेला तो दुसरा मराठी चित्रपट! शामराव चव्हाणांनी माईच्या गळ्यातील नजाकत अचूक ओळखून तिच्याकडून लावणी गाऊन घेतली. माईचा ग्रामीण ढंगातील गावरान बाज जनतेला भावला आणि सुलोचना चव्हाण यांची लावणी गायिका म्हणून ओळख निर्माण झाली.

रणजीत देसाई यांच्या, तबलजींच्या जीवनावरील कथेवर हरिभाऊ रहातेकरांनी सहकारी तत्त्वावर ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची निर्मिती १९६२ मध्ये केली. कोल्हापूरचा नवीन देखणा नट अरुण सरनाईक त्या चित्रपटाचा नायक होता. सर्वांच्या आवडीचा मालमसाला म्हणून त्या चित्रपटात लावण्या, गझला व नाट्यगीते असे संगीताचे वेगवेगळे प्रकार होते. लावणीत वसंत पवार यांचा हात कुणी धरू शकत नसे. ‘रंगल्या रात्री अशा’मध्ये त्यांनी गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रथम संधी देऊन त्यांच्याकडून लावण्या लिहून घेतल्या आणि त्या लावण्यांचे चित्रिकरण राधाबाई बुधगावकर यांच्या तमाशा बारीवर केले. खेबुडकरांनी लिहिलेल्या पहिल्याच लावणीचा मुखडा होता ‘नाव गाव कशाला पुसता? अहो, मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची.’ कोल्हापूरच्या गीतकार व नायकाप्रमाणेच लावणी गायिकाही कोल्हापूरची असावी असा विचार करून वसंतरावांनी ती लावणी सुलोचना चव्हाण यांच्याकडून गाऊन घ्यायची असे ठरवले. वसंतराव सुलोचनाबाईंना त्यांच्या घरी मुंबईला जाऊन भेटले. त्या भेटीचे वर्णन सुलोचनाबाईंच्या शब्दांत...

‘‘...मी घरात होते. अचानक दार वाजले, मी दार उघडले, बघते तर बाहेर गबाळ्या कपड्यातील, केस विस्कटलेले एक गृहस्थ उभे! मी म्हणाले, ‘आपण कोण?’ ते म्हणाले, ‘मी वसंत पवार. सुलोचनाबाई तुम्हीच ना? तुमच्याकडून लावणी गाऊन घ्यायची आहे.’ मी थक्कच झाले. साक्षात वसंत पवार, मराठीतील एवढे मोठे नामवंत संगीतकार, माझ्या दारात उभे! त्यांनी खिशातून कागद काढला. त्यांनी घडी घातल्यामुळे पार चुरगाळल्या गेलेल्या त्या कागदावरची लावणी वाचून दाखवली. दुपारच्या भोजनाची वेळ झालेली होती. मी त्यांना ‘जेवणार का?’ म्हणून विचारले. वसंतरावांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते सद्गदित आवाजात म्हणाले, ‘लोकांनी आजपर्यंत मला फक्त पिणार का? म्हणून विचारले. तुम्ही प्रेमाने दोन घास खाणार का? असे कुणीच विचारले नाही.’’

‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपट मुंबईला मॅजेस्टिकमध्ये लागला होता. तबलावादक अल्लारखॉ, नर्तिका मिनू मुमताज, गायक छोटा गंधर्व, पार्श्वगायिका आशा भोसले व सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या कलाकौशल्याने बोलपटात अक्षरश: नवरंग उधळले होते. पडद्यावर राधाबाई बुधकरांच्या संगीत बारीचे चित्रण बघताना प्रेक्षक अस्सल तमाशाचा अनुभव घेऊन धुंद होत. गायन-वादन, ताल-सुर, गळा-हात यांचा इतका सुरेख मिलाफ ‘रंगल्या रात्री अशा’पूर्वी क्वचित झाला असेल.

कथा-पटकथा लेखक रणजीत देसाई, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार वसंत पवार व पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण हा यशस्वी फॉर्म्युला अनंत माने यांच्या ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातही होता. त्या चित्रपटाद्वारे माया जाधव यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यातील सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या, ‘कसं काय पाटील बरं हाय कां?’ व ‘सोळावं वरीस धोक्याचं गं’ या दोन लावण्यांनी कहर केला. महाराष्ट्रभर त्या लावण्या गाजल्या.

‘सवाल माझा ऐका’चा रौप्य महोत्सव आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या आर्यन टॉकिजमध्ये १० एप्रिल १९६५ रोजी थाटामाटात साजरा झाला. त्याच कार्यक्रमात अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांना लावणीसम्राज्ञी हा किताब बहाल केला.

पुण्याच्या राम कर्वे व राम देवताळे यांच्या ‘मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद व दिग्दर्शन दिनकर द. पाटील यांचे होते तर गाणी ग. दि. माडगुळकरांनी लिहिलेली होती. वसंतरावांनी दोन तासांत त्यातील सर्व गाण्यांना चाली लावल्या. ढोलकीची साथ बबन काळे यांनी केली होती. त्यातील सुलोचनाबाईंनी गायलेल्या,

‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा,

आई मला नेसव शालू नवा’

आणि

‘फड सांभाळ तुर्‍याला गं आला,

तुझ्या ऊसाला लागंल कोल्हाsss’

या दोन लावण्यांचे ध्वनिमुद्रण राजकमल स्टुडिओत चालू होते. लावण्या इतक्या सुरेख रंगल्या होत्या, की त्या ऐकायला ध्वनिमुद्रक मंगेश देसाई स्वत: जाऊन शांतारामबापूंना घेऊन आले. त्‍या चित्रपटाच्‍या गाण्‍यांच्या पार्श्‍वगायनासाठी १९६५ साली माईला महाराष्‍ट्र राज्‍य पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. ‘मल्हारी मार्तंड’चे ध्वनिमुद्रण हे वसंतरावांच्या आयुष्यातील शेवटचे ध्वनिमुद्रण ठरले. वसंतराव गेल्याचा फार मोठा धक्का माईला बसला. ती काही काळ मुकी झाली. तिने गाणी गायली नाहीत, पण नंतर तिच्या ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘कळीदार कपुरी पानं’ यांसारख्या काही लावण्या गाजल्या.

सुलोचना चव्हाण यांच्‍या आवाजाची मीना शोरीच्या आवाजाशी गट्टी जमली होती. तिने हुस्नलाल भगतरामच्या ‘फर्माईश’मध्ये ‘मोहे आता नही है चैन, ला दे टेबल फॅन कि मौसम गरमी का’ हे धमाल नृत्यगीत गायले आहे. ‘काले बादल’ मधील ‘तेरी नजरने मेरी नजर से कहा दी दिलकी बात’ गाण्यातील तिच्या कोवळ्या भाबड्या आवाजाचे अनेक दीवाने आहेत. शाम सुंदरच्या ‘ढोलक’मधील (१९५१) गाण्यांनी तर तिला लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर बसवले. ‘मगर ऐ हसीना - ए – बेखबर’ या सुरील्या युगल गीतात ती रफीला तोडीस तोड गायली आहे.

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण‘मौसम आया है रंगीन’ व ‘चोरी चोरी आग - सी दिल में लगाकर चल दिए हम तडपते रह गए वो मुस्कुराके चल दिए’ ही हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील गाजलेली गाणी आहेत. कोणत्याही पंजाबी गायिकेपेक्षा माईची गायकी काकणभर का होईना सरस आहे, रंजनक्षम आहे. माई हिंदी चित्रपटातच राहिली असती तर शमशाद बेगमची जागा घेऊ शकली असती. तिच्याकडे अष्टपैलू गायनक्षमता असूनही लावणीसम्राज्ञी हा शिक्का बसल्यामुळे तिची गायकी महाराष्ट्रात बंदिस्त झाली. तिच्या गाण्यांचा आस्वाद संपूर्ण देशाला मिळायला हवा होता. कदाचित त्‍यासाठीच माईंनी 'माझं गाणं माझं जगणं' हे आत्मचरित्र लिहिले असावे.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्‍यानंतर माई मनोगत व्‍यक्‍त करण्‍यासाठी जेव्‍हा प्रेक्षकांसमोर उभी राहिली तेव्‍हा तिने लावणीच सुरू केली. 'फड सांभाळ तुऱ्याला गं आलाsss ' तिने पहिलीच ओळ इतक्या तडफदार आणि सुस्पष्ट आवाजात म्‍हटली, की क्षणभर माईचं वय ८१ आहे यावर विश्‍वासच बसू नये.

माईच्या गळ्यात नजाकत आहे, नैसर्गिक देणगी आहे, तशी तिच्या विजूच्या धाकट्या मुलाच्या बोटांत नजाकत आहे. त्याने ‘नटरंग’मध्ये वाजवलेली ढोलकी त्याची साक्ष आहे. पण त्यानेसुध्दा फक्त लावणीत अडकून न पडता त्याची वादनकला समृध्द करून जोपासण्याची गरज आहे. पुरुषाच्या यशांत स्त्रीची मोठी भूमिका असते. इथे उलट आहे, माईच्या यशात शामरावांची भूमिका मोठी आहे.

अरुण पुराणिक
arun.puranik@gmail.com
९३२२२१८६५३, (०२२) ८३४४२५१

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.