बोहाडा - नवरसाचे मुखवटानाट्य


मुखवट्यांचे नृत्यनाट्य म्हणजे बोहाडा. बोहाड म्हणजे मुखवटेधारी सोंगे, परंतु ती  सोंगे नसून स्व +अंग, स्वांग. कलाकार स्वत:च ते व्यक्तिमत्त्व आहोत असे मानून अवतार घेत असतात. बोहाडा ही नृत्यपरंपरा गेल्या दोनशे वर्षांपासून जोपासली गेली आहे. तो आदिवासींचा सण म्हणून ओळखला जातो. तो गावदेवतेचा मुहूर्त साधून गावात उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी गावातून देवी-देवतांची मिरवणूक काढतात. भोवंडा देतात. भोवंडा – भोवाडा – भवाडा – बोहाडा. तो महाराष्ट्रातील ठाणे, नासिक, अहमदनगर या जिल्ह्यांतील महादेव कोळी, भिल्ल, कोकणा, ठाकूर, वारली, कातकरी, डोंगरकोळी इत्यादी समाज प्रामुख्याने साजरा करतात. लोक चैत्र-वैशाखाच्या सुमारास रिकामे झालेले असतात. रानातील, शेतातील किरकोळ कामे संपलेली असतात. नवा सीझन, नवा पाऊस एक-दोन महिन्यांवर असतो. शेतक-याला दिवस मोकळा असतो. त्या मोकळ्या दिवसांत बोहाडा रंगतो. गावोगावी उत्सव, ऊरुस साजरे होत असतात. अशा वेळी गावदेवतेचा मुहूर्त साधून बोहाड्याची सुरुवात होते. पाड्यापाड्यांतून पाच रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत घरोघरी वर्गणी गोळा केली जाते.

बोहाड्यात नवसाची सोंगे, मानाची सोंगे ठरलेली असतात. बोहाड्यात नवीन सोंगाची सुरुवात करायची ठरल्यास ती सन्मानपूर्वक व पूजाविधीने केली जाते. कष्ट करून कमावलेल्या शरीरयष्टीच्या त्या बळकट लोकांतील कलावंत देहभान विसरून उत्सवात भाविकतेने आणि श्रद्धेने नाचतात. कलावंतांनी देवांचे मुखवटे धारण केले, की त्यांच्या अंगात त्या त्या देवाचा संचार झालेला असतो! कलावंत देहभान विसरून मुखवटे नाचवत असतात. बोहाडा हा करमणुकीचा प्रकार गणला जात असला तरी आदिवासींच्या जीवनात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. तो त्याच्या आध्यात्मिक जीवनातील धार्मिक विधी आहे.  तो केला नाही तर त्यांच्या पाड्यावर संकटे येतील, पाऊसपाणी येणार नाही, धनधान्य पिकणार नाही, पाडा नाहीसा होईल असे त्यांना वाटते. म्हणूनच गावच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ‘बोहाडा’ हा उत्सव केलाच पाहिजे अशी त्यांची धार्मिक भावना असते. बोहाड्यात वेशभूषेला फारसे महत्त्व नसते; तर काहींची स्वत:ची वेशभूषा असते. काहीजण झगा, फेटा, गदा, तलवारी, लेहंगा, चाळ, घुंगरू इत्यादी सामान शहरातून भाड्याने आणतात. परंतु सोंगे नाचवताना अमुक एका गोष्टीमुळे अडले आहे असे होत नाही; तर नेहमीच्या कपड्यांतही सोंगे नाचवली जातात. किंबहुना कलावंताने नृसिंहाचे सोंग घेतले आहे; पण त्याने लंगोटी लावूनच रंगमंचावर प्रवेश केलेला असतो!

बोहाडा हा तीन दिवसांचा, पाच दिवसांचा, सात दिवसांचा असतो. काही बोहाडे हे नवसाचे असतात; तर काही ठिकाणी एकाच पाड्यावर दोन-दोन बोहाडे होतात. एका बोहाड्यात कमीत कमी पंचवीस ते तीस कलावंत भाग घेतात. बोहाड्यात सुरुवात थापेने होते. थाप म्हणजे हिंगुळात हाताची पाचही बोटे बुडवून पंजासकट त्याचा ठसा देवळाच्या भिंतीवर उमटवला जातो. तीन दिवसांचा लहान्या बोहाडा तर पाच व सात दिवसांचे मोठाले बोहाडे! लहान्या बोहाड्यात महत्त्वाची म्हसोबा, राक्षस, देवी (जगदंबा) ही सोंगे नाचवत नाहीत. ती सोंगे मोठ्या बोहाड्यात नाचवली जातात. बोहाड्यात देवीचे पूजन मंगळवारी किंवा शुक्रवारी केले जाते. म्हणजे पाच दिवसांचा बोहाडा असला तर थाप शुक्रवारी आणि शेवट मंगळवार, तर सात दिवसांचा बोहाडा असला तर शनिवारी सुरुवात होऊन शुक्रवारी शेवट होतो. चार व सहा दिवसांपर्यंत निरनिराळी सोंगे नाचवली जातात. शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी म्हसोबा व देवी यांच्यासह सोंगे निघतात.

रावणाचा व महिषासूराचा मुखवटा हा अवाढव्य आकाराचा व अजस्र असा असतो. जवळजवळ तीस किलो वजनाचा व सहा x तीन फूट आकाराचा रावणाचा; तर वीस किलो वजनाचा व रेड्याचे तोंड दोन-तीन फूट लांब व त्याची शिंगे पाच फूटांची असा महिषासुराचा मुखवटा! हे असे अजस्र मुखवटे तोंडावर घालून आदिवासी चार-पाच तास नाचतात, लढाई–झगड्याची कृती करतात.

गावातील वृद्ध मंडळी मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होण्याअगोदर काही दिवस बोहाड्यात काम करणाऱ्या नवागत तरुणांची कसून परीक्षा  घेतात; विशेषत: त्यांच्या नाचण्याची तयारी पाहतात. महादेवाची भूमिका करणाऱ्या नटाला नंदीसारखे आणि सरस्वतीचे सोंग वठवणाऱ्याला मोरासारखे तासन् तास न दमता नाचता येणे आवश्यक असते. इतकेच नव्हे तर त्या त्या नटाला त्या त्या प्राण्याचे ओरडणेही साधावे लागते. या कसोट्यांना जे उतरतात, त्यांनाच कार्यक्रमात भाग घेता येतो.

प्रत्यक्ष बोहाड्याच्या दिवशी नटांना वावरण्यासाठी सडकेचा लांबलचक पट्टा आखून घेतात. या सडकेच्या दोन्ही बाजूंना प्रेक्षक दाटीवाटीने बसतात. रात्रीच्या वेळी पलिते पेटवून त्यांच्या प्रकाशात बोहाड्याचा खेळ सुरू होतो. प्रथम सूत्रधार नमन करतो. मग संबळ आणि पिपाण्या यांच्या तालावर विदूषक उड्या मारू लागतो. त्यानंतर भालदार-चोपदार गणपतीच्या आगमनाच्या ललकाऱ्या देतात आणि पाठोपाठ उंदरावर बसलेला गणपती नाचत नाचत पुढे येतो. गणपती गेला, की सरस्वती येते आणि नाचून व आशीर्वाद देऊन परत जाते.

एवढे झाल्यावर बोहाड्याचे मुख्य कथानक सुरू होते व ते ओळीने पाच पाच रात्री चालते. लोकही न कंटाळता, न थकता ते पाहतात. त्यात एका वेळी दोन-दोनशे नट भाग घेतात.

भारतात अनेक ठिकाणी असे ‘बोहाडा’ मुखवटानाट्य सादर केले जाते. बोहाडयातील पात्रे संवाद म्हणत नसल्याने बोहाड्याला संहिता नसते. ते विविध देवतांच्या सोंगदर्शनातून सादर केले जाते. आदिवासी फार वर्षांपूर्वी रानटी प्राण्यांचे मुखवटे धारण करून त्यांची सोंगे आणत; परंतु त्यांचा संपर्क ‘नागरी’ संस्कृतीशी व धर्माशी आल्यावर धार्मिक महत्त्वाच्या देव-देवतांचे मुखवटे बोहाड्यात घेऊ लागले.

ठाणे जिल्ह्यातील मोखाडा गावात होळी पौर्णिमेच्या दुस-या दिवसापासून ‘बोहाडा’ खेळला जातो. पहिल्या दिवशी गणपतीचा मुखवटा घातलेले सोंग येते. (आज वीज असूनही) त्याच्याबरोबर टेंबे (मशाली) घेतलेले लोक असतात, कारण ते तसे परंपरेने चालत आले आहे. ते सोंग रस्त्याच्या विशिष्ट मार्गाने चालत मध्यभागी सजवलेल्या वर्तुळात येते, त्याला ‘चांदणी’ असे म्हणतात. तेथे जमलेली मंडळी, गावकरी गणपतीची आराधना करून ‘या वर्षी चांगला पाऊस झाला नाही, पुढच्या वर्षी तरी चांगला पाऊस होऊ दे, चांगले पीक येऊ दे’ अशी विनवणी करत असतात. गणपती त्यांना ‘तुमचे हे मागणे माझ्या मागून येणारी सारजादेवी (सरस्वती) पूर्ण करेल’ असा आशीर्वाद देतात, पण ते बोलणे गणपतीच्या सोंगाच्या मागे उभा असलेला माणूस बोलतो, कारण मुखवटा घातलेल्या माणसाचा आवाज लोकांपर्यंत पोचत नाही. त्यानंतर दुस-या दिवशी ‘सारजा’देवी येते, ती भक्तांना आशीर्वाद देते, अशा प्रकारे सहा दिवस विविध देव-देवतांची सोंगे येत राहतात.

सातव्या दिवशी थोरला (मोठा) बोहाडा असतो. त्या दिवशी आजुबाजूच्या गावांतील लोक अंथरूण-पांघरूण, जेवणखाण घेऊन संध्याकाळीच मोखाड्यात जमा होतात. प्रेक्षक मंडळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मिळेल ती जागा पकडून बसतात. बोहाडा सुरू होण्यापूर्वी मिरवणूक निघते, त्याला ‘मोहाटी’ असे म्हणतात. बोहाड्याचे यजमान, आयोजक, आदिवासी व बोहाडा पाहण्यास आलेले प्रेक्षक मिरवणुकीत सामील होतात. मिरवणूक देवीच्या देवळापर्यंत येऊन विसर्जित होते. त्यानंतर गणपती, सारजा, राम, रावण असे अनेक मुखवटे धारण केलेली मंडळी एकापाठोपाठ एक येतात. त्यांच्याबरोबर सनई, संबळ, सूर ही वाद्ये वाजवणारे असतात. त्यांच्याबरोबर इतर मंडळीही चालत येत असतात. त्यामध्ये विविध जातिधर्माचे लोक असतात. परंपरेतील एकात्मता बघा, की देवीला चुडा भरण्याचा मान मुस्लिमधर्मीय शेख या कासाराचा असतो. बोहाड्याचे आयोजक काका धारणे येवल्यातून व्यापार करण्यासाठी मोखाड्याला फार वर्षापूर्वी आले. त्यांच्याबरोबर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथूनही काही मंडळी व्यापारानिमित्त आली व ती मंडळी मोखाड्याच्या बोहाड्याचे उत्साहात आयोजन करतात. त्यांनी येथे अंबामातेचे मंदिरही बांधले आहे. त्या देवळाजवळ बोहाडा खेळला जातो.

बोहाड्यात भाग घेणारी मंडळी ज्या दिवशी मुखवटा धारण करायचा असतो, त्या दिवशी उपवास करतात. सोंगे परंपरेने त्या त्या घराण्यात चालत आलेली आहेत. प्रत्येक सोंगाचे वाजवण्याचे ठेके वेगवेगळे असतात. सोंग बदलले, की ठेका बदलतो. अशा त-हेने पहाटेपर्यंत विविध प्रकारचे मुखवटे धारण केलेली सोंगे येत असतात. सूर्याची पहिली किरणे पडली, की देवीचे रूप घेतलेली व्यक्ती (सगळी मुखवटाधारी पात्रे पुरुषच असतात. त्यात स्त्रिया भाग घेत नाहीत.) अंबेच्या देवळात येते. भक्त तिची पूजा करतात. पूजा आटोपल्यावर, देवी बाहेर पडते. मंडपात (चांदणी) आल्यावर तिची गाठ म्हसोबा (महिषासूर) या पात्राशी पडते. त्यावेळी ‘युद्ध होऊन’ देवी म्हसोबाचा वध करते. हातात नारळ घेऊन आजुबाजूला उभी असलेली भक्तमंडळी त्यावेळी नारळ फोडतात. त्यानंतर देवी ‘चांदणी’त येऊन बसते, तेव्हा मंडळी त्यांचे त्यांचे नवस फेडतात, तर काही नवीन नवस बोलतात. दुपारपर्यंत विधी चाललेला असतो. नंतर लोक त्यांच्या त्यांच्या घरी जातात व संध्याकाळी होणा-या कुस्त्यांचे फड पाहण्यास परत येतात. सोहळा एक रात्र व एक दिवस चालू असतो. बोहाड्यावर गेली पंचवीस वर्षे बोरिवली येथे राहणारे ऐंशी वर्षांचे मारुती शिंदे काम करत आहेत. ते आदिवासी कलांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर करतात.

सुरेश चव्हाण

(संकलन , ‘महाराष्ट्राची लोककला आणि लोकनृत्य – लेखक सुधीर राणे’ या पुस्तकावरून)

लेखी अभिप्राय

मी जळगाव,ता.राहाता(शिर्डी),जि.आहमदनगर येथील आसून, आंम्ही स्वत: हाताने नवीन मुखवट्यांचा सर्व संच तयार करून, ही परंपरा चालू ठेवली आहे. मी स्वत: निर्माता आणि दिग्दर्शक आहे.माझा तो छंद आहे
संपर्क- ९१ ७२ ०४ ६८ ०६ धन्यवाद !

रमेश बनसोडे13/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.