शबनम

प्रतिनिधी 05/12/2013

शबनम पिशवीसांगलीहून मिरजेला जाताना उजव्या आणि डाव्या बाजूंना कुष्ठरोगातून मुक्त झालेल्यांसाठी काही पुनर्वसन केंद्रे आहेत. त्या केंद्रांमध्ये अनेक वर्षांपासून शबनम बॅगा तयार केल्या जातात. त्या बॅगा सातासमुद्रापार प्रसिद्ध झाल्या आहेत. मिरजेची बॅग म्हणजे सुंदर, दणकट. रंग पक्का आणि कुणाच्याही गळ्यात शोभून दिसणारी. शे-दीडशे बॅगा त्या केंद्रांमध्ये रोज तयार व्हायच्या. प्रत्येक कर्मचा-याला पन्नास ते शंभर रुपये रोजगार मिळायचा. कर्मचा-याला तयार कच्चा माल देऊन बॅगा बनवल्या जायच्या. मीही अनेकदा त्या केंद्रांतील बॅगा घेऊन मिरवल्या होत्या. आपल्याला चांगली बॅग मिळते आणि अप्रत्यक्षपणे का होईना एका सामाजिक कार्यात सहभागी होता येते, असा दुहेरी आनंद त्यामागे असायचा.

शबनम बॅग ही मोठी आनंददायी गोष्ट होती. ती अगोदर बॅग होती. नंतर शबनम बॅग झाली. ‘शबनम' नावाचा चित्रपट आला. त्या चित्रपटावरून बॅग झाली शबनम, असा संदर्भ नरहर कुरुंदकर यांच्या ग्रंथात असल्याचे मला डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अरविंद शिरसाट म्हणाले होते. ‘शबनम' या नावाने दोन चित्रपट आले होते. पहिला ‘शबनम' १९४९ चा, दिलीपकुमार आणि कामिनी कौशल यांचा आणि दुसरा १९६४ चा,  मेहमूद व विजयालक्ष्मी यांचा. पहिल्या ‘शबनम' चित्रपटात निर्वासिताची भूमिका करणारा दिलीपकुमार अशी बॅग वापरत होता... तिथून गळ्यात लटकणारी ही  बॅग शबनम झाली. त्याच चित्रपटात श्रीमंत तरुणीची भूमिका करणारी कामिनी जॅकेटवर शबनम बॅग वापरायची.

शबनम पिशवीशबनम बॅग जन्माला आली या चित्रपटाच्याही अगोदर; राष्ट्रीय चळवळीत आणि अन्य चळवळीतही. ती वाहायला सोपी. खांद्यावर लटकावली,  की काम खल्लास. एक-दोन दिवसांचे कपडे, लुंगी, दाढीचे सामान तिच्यात मावायचे. चळवळी करणारे, तुरुंगात-मोर्चात जाणारे कार्यकर्ते ती वापरायचे. शेवटी शेवटी, बॅगेवरूनच कार्यकर्त्याची ओळख व्हायची. समाजवादी, विद्रोही, आंबेडकरी चळवळीतले लोकही अशा बॅगा वापरू लागले. बॅगेच्या जोडीला वाढलेली दाढी आली. झब्बा आला. पॅंट आली. चपला आल्या. त्या सर्वांतून कार्यकर्त्यांची ओळख तयार होऊ लागली. त्यांची शबनम बॅग ही ओळख होती. कुणी ती भाजीसाठी, कुणी वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी, तर कुणी कवितेची वही ठेवण्यासाठीही वापरू लागले. एस. एम. जोशी, मृणाल गोरे, बाबा आढाव, नामदेव ढसाळ अशा कितीतरी कार्यकर्त्यांच्या गळ्यात बॅग रुळलेली दिसायची. सुटसुटीत, स्वस्त आणि सुंदर... या बॅगेमुळे बरेच काही मिळायचे.

मिरजेच्या शबनम बॅगा आकर्षक, सुंदर, टिकायला मजबूत. त्यांची बांधणी वेगळी, बॅगेचा पट्टाही वेगळा आणि रुंद...गडद निळा, गडद लाल, गडद काळा हे तीनच रंग मिरजेतल्या बॅगांना असतात. कॉम्रेड लाल, आंबेडकरवादी निळा, तर भाई कोणता तरी रंग पसंत करायचे.

पत्रकारांमध्येही शबनम प्रिय झाली. पत्रकार तीत डायरी, कागद, पेन अशा वस्तू ठेवायचे. जुने पेपर आणि कात्रणं ठेवायचे. निवेदनं ठेवायचे. खुलासे-प्रतिखुलासेही ठेवायचे. 'सिंहासन' चित्रपटात दिगू टिपणीस ह्या पत्रकाराची भूमिका करणारे निळू फुले यांच्या गळ्यातील शबनम आठवून बघा. ट्रेड युनियनमधल्या नेत्याची बॅग आठवून बघा... महिला चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्या, असंघटित क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या बॅगा आठवून बघा...खरे तर, शबनम म्हणजे एक युग होतं, देवा...

शबनम या शब्दाचा अर्थ चकाकणारा, मोत्यासारखा दवबिंदू...गळ्यात अडकावायच्या बॅगेने ते नाव घेऊन टाकले की हायजॅक केले, ते माहीत नाही;  पण बॅग शबनम झाली. खादी ग्रामोद्योग केंद्रात, खासगी संस्थांत ती तयार होऊ लागली. बाबा आमटे यांच्या ‘आनंदवना’तही अशा बॅगा तयार होऊ लागल्या. तीत बदल म्हणून कुणी सूत, कुणी सुतळी, कुणी वेत, कुणी पोत्याचा तुकडा वापरूनही बॅगा बनवू लागले. त्या आदिवासींपर्यंतही पोचल्या. बॅगेत काही सुधारणाही होऊ लागल्या. कुणी तिला चेन लावली, कुणी बटणे लावली, कुणी तिच्या पोटात कप्पे-चोरकप्पे तयार केले. कुणी बॅगेच्या चेह-यावर खिसा केला. कुणी बॅगेच्या पट्टीसाठी सुतळीसारखा नायलॉनचा कठीण दोर वापरू लागले. एकूण शबनम विस्तारत गेली. प्रतीक बनत गेली. मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग, कार्यकर्ते आदी तिचे ग्राहक झाले. पुढे काळाने पलटी मारली. बॅग मागे पडू लागली. हॅंडबॅग, ब्रीफकेस, ऑफिस बॅग, एअर बॅग, हंगिंग बॅग असे करत करत सॅकपर्यंत प्रवास येऊन पोचला. महानगरात लोकलमधून प्रवास करताना शबनम गैरसोयीच्या वाटू लागल्या. शबनम बॅगा आधुनिकतेला नकार देतात, असेही सांगितले जाते. माणसाच्या हातात वस्तू कोणती आणि ती किती किमतीची आहे, यावरून त्याची भौतिक प्रतिष्ठा मोजली जाते.

मला स्वतःला या बॅगेने खूप मदत केली. मी खूप महत्त्वाचे दौरे हीच बॅग घेऊन केले.

अनेकांकडे सुंदर सुंदर शबनमचा संग्रह आहे. कवी सतीश काळसेकर त्यांपैकी एक. ही सारी सुंदर बॅगेची परंपरा आता संपणार की काय, असे वाटायला लागले...कारण मिरजेच्या एका बॅगनिर्मिती केंद्रात संप सुरू झाला आहे. खादी ग्रामोद्योगाने बॅगनिर्मितीत हात आखडता घेतला. एका बॅगेची किंमत आता १४० रुपये झाली आहे. पंधरा – वीस वरून किंमत तिथपर्यंत वाढत गेली...

उत्‍तम कांबळे
uttam.kamble@esakal.com

लेखी अभिप्राय

अप्रतिम लेख ...अत्यंत interesting माहिती

उमा दीक्षित 04/07/2016

छानच माहिती. बौध्दगयाला आजही वेगळ्या पध्दतीच्या शबनम मिळतात. या बॅगेला विविध कप्पे असतात. भिक्खूच्या चिवरच्या रंगाच्या बॅग मस्तच वाटतात.

श्रीकांत पेटकर…04/07/2016

Article was good and innovative information.

Dr. Raviraj Furade06/07/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.