गांधी विचारांचा जागर


शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी 'हिंद -स्वराज्य' या पुस्तकात मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत आहेत, याचा मागोवा घेण्यासाठी झालेल्या चर्चासत्रावरचा डोळस कटाक्ष...

परिचर्चेतील मुख्‍य वक्‍ते - (डावीकडून) सु. श्री. पांढरीपांडे, डॉ. अभय बंग, मोहन हिराबाई हिरालाल आणि विवेक सावंतमोहनदास करमचंद गांधी या तरूणानं १९०९ साली भारतीय समाजाच्या जीवनशैली संदर्भातले आपले तात्विक विचार पुस्तकरूपानं मांडले. 'हिंद-स्वराज्य' या पुस्तकात ज्या काळात त्यांनी हे विचार मांडले तो शंभर वर्षांपूर्वीचा काळ आणि २०१३ सालचा आजचा काळ, या दरम्यान देशात बरीच सामाजिक, नैतिक, राजकीय उलथापालथ झाली आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या कालप्रवाहात पूलही वाहून गेला की काय अशी शंका वाटावी अशी स्थिती आहे.

महात्मा गांधींनी 'हिंद -स्वराज्य'मध्ये मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत किंवा अप्रस्तुत आहेत; किती उपयोगी किंवा निरूपयोगी आहेत यावर परिचर्चा घडवून आणण्याचा एक चांगला उपक्रम अलीकडेच पुण्यात पार पडला. 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' आणि 'गांधी स्मारक निधी' या संस्थांच्या वतीनं आयोजलेल्या दोन दिवसांच्या या चर्चासत्रात समाजातल्या विविध क्षेत्रातल्या अभ्यासकांनी, समाजसेवकांनी भाग घेतला. काही विद्यार्थीही या चर्चासत्राला उपस्थित होते.

महात्मा गांधींचं जीवनविषयक तत्त्वज्ञान मान्य असो वा नसो, पण गांधी-विचार मुळातून समजून घेण्यासाठी आदर्श समाजव्यवस्थेची गांधीजींची संकल्पना जाणून घेण्यासाठी प्रत्येकानं 'हिंद-स्वराज्य' पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तकाच्या पहिल्या पानावरच मोहनदास करमचंद गांधी म्हणतात- 'माझा उद्देश केवळ देशाची सेवा करण्याचा, सत्य शोधण्याचा आणि त्यानुसार आचरण करण्याचा आहे. म्हणून विचार चुकीचे ठरले तरी त्यांना चिकटून राहण्याचा माझा आग्रह नाही.' दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 'हिंद-स्वराज्य'मधल्या विचारांवर चर्चा करायला जमलेल्या धुरिणांच्या विवेचनाचा रोख 'हिंद -स्वराज्य'मधले गांधीजींचे विचार विस्तारित रूपात मांडण्यावर होता. आजच्या संदर्भात त्यांचा अन्वय लावण्याचे फार प्रयत्न परिचर्चेत झाले नाहीत. चर्चा गांधी गौरवासाठी निश्चित नव्हती. पण हे भान भल्याभल्यांपाशी नव्हतं.
आजच्या आर्थिक उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या वादळात सर्वच मूल्यांची मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. गांधींच्या विचारासंदर्भात बोलायचं तर गांधींजींच्या स्वप्नातला भारत आज आहे कुठं? आजच्या तरूणांच्या विश्वात महात्मा गांधी आणि त्यांचं तत्त्वज्ञान यांना काय आणि कितीसं स्थान आहे? महात्मा गांधी त्यांच्या विचारांसह आज आऊटडेटेड झाले आहेत काय? हे सारे प्रश्न या विचारवंतांना पडू नयेत, याचं आश्चर्य वाटलं. आजच्या तरूण पिढीला तरी हे प्रश्न पडतात की नाही कोण जाणे. गांधीच त्यांच्या विचारविश्वात नसतील तर त्यांनाही ते पडत नसतील. परिचर्चेत हा आजचा तरूण केंद्रस्थानी नव्हता; गांधीच्या 'हिंद-स्वराज्य' मधल्या वैचारिक संकल्पनांची आजच्या वास्तवातून केलेली साक्षेपी समीक्षाही परिचर्चेत केंद्रस्थानी नव्हती.

परिचर्चेत विचार मांडताना अवधूत परळकर. सोबत (डावीकडून) 'थिंक महाराष्‍ट्र'चे मुख्‍य संपादक दिनकर गांगल आणि एम.के.सी.एल.चे अध्‍यक्ष विवेक सावंतआजच्या पिढीच्या नजरेतून 'हिंद-स्वराज्य'कडे पाहिलं तर कदाचित या पुस्तकातले गांधी विचार बरेचसे भाबडे, स्वप्नरंजनात्मक वाटतील. पाश्चात्य सभ्यतेविषयी गांधींनी 'हिंद-स्वराज्य' मध्ये कठोर भाष्यं केली आहेत. ती करताना त्यांनी पाश्चात्यांचं संशोधनकार्य, पाश्चात्यांची शिस्त, अभ्यासूपणा, तत्त्वज्ञान आणि कलाक्षेत्रातील त्यांची भरीव कामगिरी वगैरेकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. पाश्चात्य जीवनशैलीतले दोष आणि त्रुटी मात्र वकिवली बाण्यानं दाखवून दिल्या आहेत. आज पाश्चात्य सभ्यता नावाच्या गोष्टीचे भयावह रूप काही क्षेत्रात दिसू लागले आहे हे खरे आहे. त्यामुळे गांधीजींच्या पाश्चात्य संस्कृतीवरल्या या टीकेला आज सर्वसामान्य नागरिकांची दाद मिळूनही जाईल. पण 'हिंद -स्वराज्य'मध्ये पाश्चात्य सभ्यतेबद्दल लिहिताना गांधीजी नाण्याची केवळ एक बाजू दाखवताहेत हे नजरेआड करून चालणार नाही.

गांधीजींनी हिरिरीनं पुरस्कार केलेला निसर्गोपचार, हा काही सर्व विकारांवरचा इलाज ठरत नाही. अनेक गंभीर रोगांवर पाश्चात्यांनी विकसित केलेली उपाययोजनाच उपयोगी ठरत आली आहे. स्वत: गांधीजींना आपल्या एका विकारावर इलाज म्हणून ऑपरेशन करून घ्यावं लागलं होतं. आदिवासींच्या आजारावर आपल्याला आधुनिक औषधं आणि उपकरणं वापरावी लागतात अशी कबुली डॉ. अभय बंग यांनी आपल्या विवेचनात दिली. अभय बंग यांच्याप्रमाणे परिचर्चेच्या मूळ संकल्पनेशी बांधिुलकी ठेवून आपले अनुभवकथन करायची कामगिरी मोहन हिराबाई हिरालाल यांनी चांगल्याप्रकारे बजावली. मेंढालेखात ग्राम स्वराज्य कल्पना राबवण्याचा यशस्वी प्रयोग हिरालाल यांनी केला असल्यानं त्यांचं निवेदन महत्त्वपूर्ण होतं. उद्घाटकाच्या भूमिकेत असलेल्या सु.श्री. पांढरीपांडे यांनी चर्चेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं. नंतरचे वक्ते त्या वैचारिकतेच गुंतून पडल्यासारखे वाटले. गांधीचे विचार आजच्या संदर्भात प्रस्तुत आहेत की नाहीत, याविषयी स्पष्ट बोलायला कोणी तयार नव्हतं.

परिचर्चेचा आढावा घेताना ज्ञानदा देशपांडे यांनी मात्र नियोजित विषयाला थेट भिडण्याची धीटाई आणि बौध्दिक चमक दाखवली. या संदर्भातला अंतर्विरोध स्पष्ट करणारा कळीचा प्रश्न सर्वांसमोर उभा केला आणि चर्चेचा आढावा घ्यायला सुरवात केली. जी सभ्यता गांधीजींनी नाकारली, ती आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे, या विसंगतीकडे ज्ञानदा यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. पाश्चात्य सभ्यतेतून तयार झालेल्या गोष्टींचे फायदे दैनंदिन व्यवहारात आपण सारे घेत आहोत. सुरवातीलाच ज्ञानदा यांना बोलायला दिलं असतं तर, परिचर्चेचा सूर आणि नूर बदलला असता असं वाटत राहिलं.

आजच्या भाषेत बोलायचं तर... नव्या जमान्यात गांधींचं काय करायचं? हा प्रश्न चर्चेच्या मुळाशी होता. या प्रश्नाला भिडण्याची इच्छा काही अपवाद वगळता सन्माननीय वक्त्यांपाशी आढळली नाही, हे पुन्हा पुन्हा नोंदवावसं वाटतं. चर्चेत सहभाग घेणाऱ्यांची वैचारिक पातळी आणि प्रत्यक्ष कार्यानुभव पाहता दोन दिवसांच्या या चर्चासत्रातून बरंच काही मिळेल अशी अपेक्षा होती. तिची पूर्ती झाली नाही. विवेक सावंत यांनी गांधीविचारामागची प्रेरणा लक्षात घेऊन नवं तंत्रज्ञान स्वावलंबीपणासाठी कसं राबवता येईल, याविषयी उद्बोधक विचार मांडले. चर्चा समेवर आणायचं काम ज्ञानदाच्या समारोपानं प्रभावीपणे केलं. चर्चेत अशा काही जमेच्या गोष्टी होत्याच.

बाहेरच्या जगात, भोवतालच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वातावरणात आज गांधीविचार आणि आचारातलं नेमकं काय शिल्लक आहे; अस्तंगत होऊ घातलेले प्राणी म्हणून आज गांधीवाद्यांकडे पाहिलं जात आहे का? या प्रश्नांचा उच्चार सभागृहात झाला असता; आजच्या वैचारिक पर्यावरणाचं भान वक्त्यांच्या मांडणीत आढळलं असतं, तर परिचर्चा अधिक अर्थपूर्ण झाली असती ही गोष्ट वेगळी. शाब्दिक चर्चांना कृतीची जोड हवी याबद्दल संयोजक आग्रही आहेत, ही मात्र दिलासादायक गोष्ट आहे. उपक्रमामागील संयोजकांच्या प्रामाणिक हेतुंबद्दल शंका घेता येणार नाही. गुणवत्तेचा मुद्दा हा शेवटी व्यक्तिगत मानसिकतेशी निगडित असतो. तेव्हा तो बाजूला ठेवून बोलायचं तर या प्रतिकूल वातावरणात 'हिंद-स्वराज्य'वर आणि त्या अनुषंगानं गांधी विचारांवर चर्चा घडवून आणल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद द्यायला हवेत.

सरतेशेवटी मनाला कायम छळणारा एक विचार या उपक्रमांच्या आयोजकांपुढं मांडावासा वाटतो -

साठी-सत्तरीच्या विद्वजनांनी आणि समाज कार्यकर्त्यांनी थोर राष्ट्रपुरुषांच्या चांगल्या वाईट विचारांवर आपसात खल घालून नेमकं काय साधतं? त्यापेक्षा, ज्या पिढीकडे उद्या या देशाची सूत्रं जाणार आहेत ती पिढी या थोरांच्या विचारांकडे कशी पाहते आहे; पौर्वात्य-पाश्चिमात्य नाही तर एकूणच मानवी सभ्यतेबद्दल या पिढीतील तरूणांचे काय विचार आहेत; प्रशासनाच्या त्यांच्या काय कल्पना आहेत, याबद्दल जाणून घेतलं तर ते अधिक उपयुक्त होणार नाही का? हे तरूण व्यासपीठावरून त्यांचे विचार मांडताहेत आणि ज्येष्ठ नागरिक त्यांचे विचार ऐकताहेत, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताहेत असा एखादा उपक्रम हाती घेता नाही का येणार?

अवधूत परळकर
awdhooot@gmail.com
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्‍ट्र टाइम्‍स, १ डिसेंबर २०१३)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.