लंडनचा गणेशोत्सव


महाराष्ट्र मंडळ लंडनचा गणेशोत्सव “मला गणपती बसवण्याची अनुमती द्या. पुढचे सोपस्कार माझ्यावर सोपवा.” सुधाकर खुर्जेकर यांचे हे उद्गार.

लंडनच्या ‘महाराष्ट्र मंडळा’ची जानेवारी १९८९ मध्ये स्वत:ची वास्तू झाल्यानंतर गणेशोत्सव सुरू करावा असे सर्वांना वाटे, परंतु गणेशोत्सवाचा विषय निघाला, की अनामिक भीती सर्वांना सतावायची, की आपल्याला हे कार्य निभावता आले नाही तर! उत्सवात खंड पडून भलतेच आरिष्ट ओढवण्यापेक्षा ते साहसच करू नये, हे मंडळाचे भय.

पण खुर्जेकर १९९१ मध्ये अध्यक्ष झाले आणि त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली. खुर्जेकर ठाम होते. त्यांनी कार्यकारी मंडळाला आश्वासन दिले, की निर्धास्त राहा. ते म्हणाले, “गणेशोत्सवाची प्रथा काही कारणाने बंद पडण्याची वेळ आली तर त्या वर्षापासून उत्सव माझ्या घरी सुरू होईल!” त्यांच्या उद्गारांनी चिंता मिटली. गणेशोत्सवाला मुळी विरोध नव्हताच. जी भीती वाटत होती ती खुर्जेकरांनी दूर केली. अशा त-हेने १९९१ पासून ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ ह्यांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला.

सुरुवातीपासून, मंडळाचा प्रयत्न लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचा आहे. समाजप्रबोधन तसेच बौद्धिक कार्यक्रमांना अग्रक्रम दिला जातो. ह्या वर्षी डॉ. वासुदेव गोडबोले ह्यांची ‘सावरकरांचा बुद्धिवाद’ आणि ‘श्री गणेशाची पूजा का करावी?’ अशी दोन व्याख्याने झाली.

लहान मुलांनी सादर केलेली नाटिका गेल्या वर्षी, गीतांजली जोशी ह्यांचे ‘वैदिक भारतीय संस्कृती’ हे व्याख्यान होते. त्या व्यतिरिक्त आरोग्यविषयक एक भाषण असतेच. मुलांसाठी ‘बालदरबार’ हा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम म्हणजे छोट्यांच्या साथीने पालकवर्गाचीही कसोटी लागते. चार ते बारा वर्षे वयोगटातील मुलांनी उत्साहाने कार्यक्रम सादर केले. ‘कीर्ती कलामंदिर’च्या विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्य सादर केले. ‘प्रज्ञा’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर श्लोक म्हटले. शिवाय, गणपती जन्म, गणपतीची पृथ्वीप्रदक्षिणा आणि चंद्र गणपतीला हसतो ह्या प्रसंगांवर आधारित नाटिका सादर केली. ‘मुक्तांगण समुहा’ने श्लोक, गाणी आणि वाद्यसंगीत असे विविधरंगी कार्यक्रम सादर केले.

शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या कार्यक्रमात ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून आणि लंडनचे महापौर बोरीस जॉन्सन ह्यांच्या शुभसंदेशांचे वाचन झाले. मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार ह्यांनी उपस्थितांचे स्वागत करून ‘महाराष्ट्र मंडळा’च्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्यानंतर ‘पद्मश्री प्रताप पवार समूहा’ने अप्रतिम कथ्थक नृत्याने सर्वांची मने जिंकली. रागसुधा रापतवार यांनी आदिमाया शक्ती हे भरतनाट्यम नृत्य समर्थपणे सादर केले. मंडळाच्या सदस्यांचे लेझीम आणि कुंतल इंदुलकर ह्यांचे सादरीकरण प्रेक्षणीय होते. ब्रेंटचे महापौर बॉबी थॉमस ह्यांनी कथ्थक नृत्याची प्रशंसा करताना ‘हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा होता’ असे उद्गार काढले. त्यावेळी लॅम्बेथचे माजी महापौर डॉ. नीरज पाटील, कॅमडनचे माजी महापौर डॉ. सदाशिव देशमुख, ‘एशियन व्हॉइस’चे प्रकाशक सी.बी. पटेल, भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील आस्थापना प्रमुख प्रशांत पिसे प्रभृती उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजया काळे यांनी केले.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत शनिवार आणि रविवार ह्या दिवशी ‘अथर्वशीर्ष सहस्रनाम’ होते. दोन्ही दिवशी भरपूर गर्दी झाली होती. सर्व उपस्थित मनापासून प्रार्थनेत सहभागी झाले होते. अथर्वशीर्षाच्या झेरॉक्स कॉपीज उपलब्ध होत्या. अनेकांनी त्या हातात धरून सर्वांसह एकाग्र चित्ताने आवर्तने केली. तेथील सर्व भाविकांत आपल्याला हे म्हणता आले पाहिजे ही जी कळकळ दिसली ती मनाला स्पर्शून जाणारी होती.

सुधाकर खुर्जेकर कार्यक्रम पत्रिकेत प्रत्येक दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी साडेचारपर्यंत गणेशदर्शन असे. इथे प्रत्येकजण नोकरीत आणि इतर व्यापात दंग; पण त्यातूनदेखील त्यावेळेत काही माणसे दर्शनाला येत. अशा वेळी डॉ. गोविंद काणेगावकर, मिलिंद देशमुख, श्रीराम काळे, सन्मती काळे उत्सवस्थळी म्हणजे ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’च्या हॉलमध्ये उपस्थित असायचे.

डॉ. काणेगावकर इंग्लंडच्या ‘नॅशनल हेल्थ स्किम’ ह्या आरोग्य सेवेत घशाच्या कर्करोगाचे विशेषज्ज्ञ होते. निवृत्तीनंतर ते आठवड्यातून तीन दिवस सल्लागार म्हणून त्याच सेवेत काम पाहतात. मात्र गणपतीसाठी ते आणि त्यांची डॉक्टर पत्नी, दोघेजण दहा दिवसांची सुट्टी निवृत्तीपूर्वीपासून घेत आहेत.

मिलिंद देशमुख टेलिकम्युनिकेशन अभियंता आहेत. त्यांनी बी.बी.सी. आणि रॉयल एअरफोर्समध्ये नोकरी केली. ते नोकरी सोडून खाजगी शिकवण्या घेतात. शिवाय, ते मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणा-या मुलांची तयारी करून घेण्याचे त्यांच्या विषयापेक्षा वेगळे काम करतात. ते ‘महाराष्ट्र मंडळा’चे महाव्यवस्थापक आहेत. सर्व त-हेच्या चौकशांना व कामांना सदासर्वकाळ उपलब्ध असणे हे त्यांचे ब्रीद. स्वयंसेवी संस्थेत आपल्यासारखी किमान एक व्यक्ती असावी, असे त्यांचे ठाम मत आहे. स्वयंसेवक फक्त समारंभ आणि उत्सवाच्या वेळी कामाची लगबग करत असलेले दिसतात. देशमुख मात्र सतत कार्यरत असतात. श्रीराम काळे हे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत. ते आणि त्यांची सुविद्य पत्नी गणेशपुजेचे सर्व साहित्य तयार ठेवतात. त्यांचे काम इतके पद्धतशीर असते, की कोणतीही वस्तू चटकन ‘हाजीर’ करतात.

आरती दुपारी दर्शनाला येणा-या मंडळींत आमच्यासारख्या, लंडनमधील मुला/मुलींकडे आलेल्या पालकांचा समावेश असायचा. एक मराठी कुटुंब आले होते, आईवडील मॉरिशसमध्ये, मुलगा लंडनमध्ये, मुलगी ऑस्ट्रेलियात. ते मूळ भारताचे-महाराष्ट्राचे. सर्व एकत्र आले होते लंडनच्या मुलाकडे. ती सर्व मंडळी जाणीवपूर्वक मराठी बोलत होती. गणपतीचा भक्तिभाव त्यांच्या डोळ्यांत दिसत होता. एक तरुण जोडपे आले होते. मुलगा ठाण्यातला, मुलगी स्वीडनची. निवास लंडनमध्ये. दोघेही हॉटेलव्यवस्थापन व्यवसायात. त्यामुळे त्यांच्या शिफ्ट ड्युटी. मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र. कपाळावर टिकली. दोघांनी माथा टेकवून गणपतीला नमस्कार केला. देशमुखांनी त्यांना प्रसाद दिला. दोघांना बसवून गप्पा मारायला सुरुवात केली. डॉ. गोविंद काणेगावकर व्हॅक्युम क्लिनरने कार्पेट साफ करत होते. श्रीराम काळे पती-पत्नी सायंकाळच्या पूजेच्या तयारीत गुंतली होती.

साडेचार वाजता सुरू होणा-या पूजेला आधी नावे नोंदवलेली जोडपी बसायची. कधी एक, दोन किंवा तीन. पौरोहित्य करणारे मंडळातलेच कोणीतरी. ते आवर्जून पीतांबर नेसायचे. चतुर्थीला गणेश प्रतिष्ठापना आणि चतुर्दशीची पूजा करण्याचा मान पदाधिकाऱ्यांपैकी दोन जोडप्यांचा असतो.

प्रत्येक दिवशी पूजेच्या वेळी भक्त निरनिराळे पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करायचे. त्यामध्ये मोदक, लाडू, पेढे इत्यादी पदार्थांचा समावेश असायचा. शनिवारी आणि रविवारी दुपारी महाप्रसाद होता. दोन्ही दिवशी तीनशे ते चारशेचा समुदाय उपस्थित होता.

पूजा पूर्ण झाल्यावर स्वयंसेवक सांगतील त्या रांगेतील मंडळी शिस्तीने उभी राहायची. गणेशमूर्तीच्या पुढे टेबलावर चांदीच्या ताम्हनात ठेवलेल्या चांदीच्या मूर्तीची पूजा करून त्याच क्रमाने प्रसाद आणि महाप्रसाद घ्यायचे. कुठेही गडबड गोंधळ नाही.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी तीन वाजता विजया काळे आणि समीर काळे ह्यांच्या हस्ते पूजेला प्रारंभ झाला. पौरोहित्य करत होते डॉ. काणेगावकर. पीतांबर आणि डोक्यावर पुणेरी पगडी. ते प्रत्येक कृतीमागील हेतू मराठीत आणि इंग्रजीत समजावत होते.

आवाहनम्
आता आपण श्रीगणेशाला आमंत्रण करू...

We invite Ganesha because He is the God of auspicious beginning.

उत्सवाला उपस्थित मंडळी अशा त-हेचे काणेगावकरांचे निवेदन!

यथासांग पूजा झाल्यावर सर्व उपस्थितांनी तीन वेळा अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर आरती. आरतीला शेवटचा दिवस म्हणून ढोल, झांज आणि टाळ ह्यांची साथ होती. लोक फार रंगून आरती गात होते. ‘येई वो विठ्ठले’ ह्या आरतीच्या वेळी स्वर अगदी टिपेला गेला. ‘घालीन लोटांगण वंदिन चरण’च्या वेळी देशमुखांनी शंखध्वनी केला. त्या भारलेल्या वातावरणात आरतीची समाप्ती झाली.

श्री गणेश विसर्जनाची तयारी करताना डी.एन. तळपदे आणि अरुण मंत्री ह्या दोघांनी देवाला भावपूर्णपणे नमस्कार केला. तळपदे गेली तेवीस वर्षे नैसर्गिकरित्या सुकवलेल्या मातीचा गणपती बनवतात. छोटी पूजेची मूर्ती प्रत्येक वर्षी आणि मोठी तीन-चार वर्षांतून एकदा. ते रासायनिक रंगांचा वापर करत नाहीत. तळपदे यांचे मूर्ती बनवण्यात दंग असताना मंडळाच्या सभागृहात सजावटीचे काम सुरू होते. तळपदे आणि मंत्री हे दोघे तरुण कार्यकर्त्यांना साथीला घेऊन दरवर्षी साधी पण आकर्षक सजावट करतात. ते दोघेही आर्किटेक्ट आहेत. तळपदे यांनी काही वर्षे नोकरी केल्यानंतर स्वत:ची ‘डीएनटी डिझाईन सर्व्हिसेस लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली आहे. मंत्री हा नाटकवेडा माणूस. त्यांनी मुंबईत ‘ललित कलाभवन’मध्ये नाटकात काम करण्यास सुरूवात केली. नोकरीनिमित्त लंडनला आल्यानंतरही नाटकाचे वेड कायम राहिले आहे. ‘महाराष्ट्र मंडळा’त त्यांना समविचारी मित्र मिळाले. येथे त्यांनी त्यांची नाटकाची हौस भागवून घेतली. भरपूर नाटके केली. ते उत्तम नेपथ्यकारही आहेत.

ढोल ताशांच्या गजरात गणेशाला निरोप आरती झाल्यानंतर सभागृहाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत मूर्ती आणण्यात आली. ‘निरोपाचे गीत’ गायल्यानंतर ढोल, ताशा, झांज, घंटीच्या गजरात मूर्ती सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आली. ढोल-ताशाचा मराठमोळा नाद आसमंतात घुमला आणि त्या परक्या भूमीवर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. जग किती छोटे होत चालले आहे! माणूस एकमेकांच्या किती निकट येत आहे! संस्कृतिसंगम होत आहे. इथल्या मराठी माणसाने त्याची परंपरा जोपासली आहे...  असे अनेक विचारतरंग मनात उमटले.

ढोलताशाच्या तालावर पावले थिरकू लागली. विसर्जन मिरवणूक पुढे सरकू लागली. आजुबाजूच्या घरांतील गोरे कुटुंबीय कुतूहलाने बाहेर आले. कॅमे-यांचा चकचकाट होऊ लागला. ढोलताशा आणि गणेश विसर्जन ह्यांचे अतूट नाते झाले आहे. पुणे, नाशिक नंतर ते लोण सातासमुद्रापार पसरले आहे. सचिन कदम, शार्दुल कुलकर्णी आणि ऐश्वर्य मुळे हे आळीपाळीने ढोल वाजवत होते. त्यांचे वादन घनगंभीर, त्यात ढगांचा गडगडाट जाणवत होता. रोहन देशपांडे यांचा ताशा म्हणजे जणू मुसळधार पाऊस. दोघांचा समन्वय साधणारी झांज मिलिंद देशमुख यांच्या हातात होती. मिरवणूक ‘महाराष्ट्र भवना’च्या सभोवतालच्या मार्गावर फिरून सुमारे एक तासाने दुस-या रस्त्यावर आली. तेथून पुढे खाजगी बस आणि गाड्या यांनी प्रवास करून सर्व लवाजमा ‘रिचमंड’ येथे थेम्स नदीकिनारी पोचला. तेथे पुन्हा ढोलताशा कडाडला.

थेम्स नदीत श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरण विभागाची अनुमती मिळवावी लागते. ती प्रक्रिया शार्दुल कुलकर्णी ह्यांनी सहा महिन्यांपूर्वी सुरू केली. त्यांनी मंडळाविषयी आणि मूर्तीविषयी पूर्ण तपशिलाचा फॉर्म भरून दिला. मूर्तीचा आकार, वापरलेले रंग, त्यामध्ये रासायनिक रंग आहेत का? इत्यादी माहिती त्या फॉर्ममध्ये द्यावी लागली. त्या विभागाकडून ती माहिती नगरपालिका आणि पोलीस ह्यांच्या स्थानिक कार्यालयात येते. कुठेही खेपा न घालता अनुमती मिळाली. विसर्जनाच्या ठिकाणी त्यांचा अधिकारी उपस्थित होता. त्याने त्याचे काम केले.

ढोलताशा वाजतच होता. पावले थकली होती किंवा निरोपाच्या क्षणी ती जड झाली असावीत. आरती झाली. इंग्लंडच्या बोच-या थंडीत रात्री नऊ वाजता शैलेश देशपांडे, विराज देशपांडे आणि दीपक विधाते हे वीर मूर्ती घेऊन थेम्स नदीत उतरले. ते बघताना किना-यावर उबदार कपड्यांत असूनही आम्ही गारठलो!

गणेशोत्सवाचा हा सर्व सोहळा पहिल्या दिवसापासून अगदी जवळून पाहिला. सतत साधेपणा जाणवला. पावित्र्याची जपणूक जाणवली. निर्मळ भाव दिसला. उत्सवी वातावरण होते पण बेहोषी नव्हती. खुर्चीत बसून आदेश देणारे कार्यकारी दिसले नाहीत. आपुलकीने काम करणारे विश्वस्त आणि स्वयंसेवक पाहिले. अध्यक्षांच्या किंवा इतर पदाधिका-यांच्या पाठीमागे लवाजमा नसायचा. ते स्वयंसेवकच वाटायचे. सार्वजनिक उत्सवाचा थाटमाट, दिमाख नव्हता. जणू घरगुती कार्य, पण त्यात सार्वजनिक भाव होता.

आदिनाथ हरवंदे
९६१९८४५४६०
adharwande@gmail.com

Last Updated On - 13th Jan 2017

लेखी अभिप्राय

Atishay sundar lekh aahe. Sarvapratham tethil marathi baandhavanche sanskruti japalyabaddal abhinandan!
Kaahee shanka asha aahet kee - 1) Dhon Tashe Tal Zanj hya London madhye milatat kee India tun magavilya jaatat?
2) Te vaajavinare London madheel kee India madheel? 3) Dhol Tashe Zanj yaanchya aavajache objection yet naahee kay? 4) Miravanookeela tehee vajat gajat nachat jayala paravangee milate ka?

vilas gawade08/10/2013

nice to know about Ganeshotastav in london

sandhya joshi10/10/2013

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.