कॅमे-याचे संग्रहालय


पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन केंद्र

हाजी फरीद शेख स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून जपलेली स्वतःची अशी खास आवड म्हणजे छंद. छंदांचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. काहींचे छंद स्वतःपुरते मर्यादित असतात. तर काहींच्या छंदांना संग्रहालयाचे स्वरूप प्राप्त होते. असेच छंदातून निर्माण झालेले हाजी फरीद शेख आमीर यांचे फरीदस् कॅमेरा म्युझियम हे आग्नेय आशियामधील पहिले कॅमेरा संग्रहालय आहे. पहिल्या कार्डबोर्ड बॉक्स कॅमे-यापासून आजच्या कॉम्प्युटराईज्ड कॅमे-यापर्यंतचे सात हजार प्रकारचे कॅमेरे त्यांच्या संग्रहालयात आहेत.

फरीद म्हणाले, की फोटोग्राफी हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय. आमचा ‘न्यू रॉयल फोटो स्टुडिओ’ खडकीत १९२० पासून आहे. माझे वडील हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे व लष्कराच्या सदर्न कमांडचे अधिकृत फोटोग्राफर होते. त्यांच्या मृत्यूनंतर मी ते काम पाहू लागलो. आता, माझी मुले ते काम पाहतात.

माझे बालपण हे कॅमे-यांच्या सहवासात गेले. शाळेतून आल्यावर, माझे वडील मला दुकानात थोडा वेळ बसवत. त्यावेळी माझ्या मनात कुतूहल निर्माण होत असे, की पूर्वीचे कॅमेरे कसे होते? कॅमे-यांचा वापर केव्हा सुरू झाला? आणि त्यातूनच, मी दुकानात दुरुस्तीसाठी येणारे कॅमेरे वडिलांना सांगून विकत घेऊ लागलो. माझे वडीलसुद्धा त्यासाठी मला पैसे देत. अर्थात त्या काळात किमतीसुद्धा कमी होत्या. एखाद्या व्यक्तीकडे जुना कॅमेरा आहे असे कळले तर मी तेथे जाऊन कॅमेरा पाहत असे. ती व्यक्ती तो कॅमेरा विकणार असेल तर तो विकत घ्यायचा; अन्यथा तो कुठे मिळेल याची चौकशी करून तो त्या ठिकाणाहून मिळवायचा अशी सवय मला लागली. काही वेळेला प्रयत्न करूनही जुने कॅमेरे मला विकत मिळत नसत, पण पुढे कधी तरी ते मला सहज गवसत.

फरीद शेख संग्रहालयातील कॅमे-यांसोबत मी जुन्या बाजारात रोज जात असे. शिवाय, आमच्या व्यवसायासाठी सुद्धा नवनवीन कॅमेरे लागत. अशा प्रकारे, एकेक करत बरेच कॅमेरे माझ्याकडे जमले. ते कॅमेरे रोज कपाटातून काढायचे, पुसायचे, मोजायचे व पुन्हा ठेवायचे, असा माझा हौसेचा उद्योग सुरू झाला. माझ्या वडिलांचे निधन १९५३ मध्ये झाले आणि व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. गिऱ्हाईकांशी माझा प्रत्यक्ष संबंध येऊ लागला. त्यांना माझ्या  छंदाविषयी कळले आणि त्यातील आवड असणारे लोक माझ्याकडे येऊन जुने कॅमेरे पाहू लागले; कौतुक करू लागले. पुढे पुढे, कॅमेरे इतके जमले, की ते घरात कुठे ठेवायचे असा प्रश्न निर्माण झाला.  त्यातून संग्रहालयाची कल्पना मनात आली. मग जागेसाठी शोधमोहीम सुरू झाली.

जागेच्या किमती ऐकून माझे संग्रहालय हे स्वप्नच राहणार असे वाटू लागले. पण माझ्या पत्नीने त्यासाठी मोठा पुढाकार घेतला व तिने तिचे दागिने विकून पैसा उभा केला. त्या पैशांत कोंढवा बुद्रुक येथील जागा विकत घेतली. जागेवर इमारत बांधण्यासाठी, माझ्या मिळवत्या मुलांनी मदत केली व आस्ते आस्ते पाच मजली इमारत उभी राहिली! प्रथम कॅमेरे तसेच ठेवले व नंतर एकेक काचेची कपाटे बनवून त्यात कॅमेरे ठेवले. संग्रहालय १९९४ पासून सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले केले.

जुळ्या भिंगाचा कॅमेरा या संग्रहालयात सातशे कॅमेरे, पंचेचाळीस प्रोजेक्टर्स व दोनशे एनलार्जर आहेत. संग्रहालय दुस-या मजल्यापासून सुरू होते आणि चौथ्या मजल्यावर संपते. वर्षाप्रमाणे कपाटात कॅमे-यांची मांडणी केलेली असून, १८१० - १८९४ सालांच्या सर्वांत जुन्या कॅमे-यांचा त्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे कोडॅक, रोलिफ्लेक्स या कंपन्यांच्या पहिल्या कॅमे-यांपासून ते आताच्या नव्या मॉडेलपर्यंतच्या सर्व कॅमे-यांचा त्यात समावेश आहे. सर्व कॅमेरे चालू स्थितीत आहेत, उत्तम रिझल्ट देतात. त्यातील कोणताही कॅमेरा मी चालवून दाखवू शकतो! अॅ्बस्क्युर कॅमेरा, पिनहोल कॅमेरा, बॉक्स कॅमेरा, फिल्ड कॅमेरा, रिफ्लेक्स कॅमेरा, जुळ्या भिंगाचा कॅमेरा, हातात धरण्याचा प्रेस कॅमेरा, स्टॅँड कॅमेरा, एरिअल कॅमेरा, पोलारॉईड कॅमेरा, स्पाय कॅमेरा, पाण्याखालील कॅमेरा, द्रुतगती कॅमेरा हे आणि असे बरेच कॅमेरे माझ्या संग्रहात आहेत. शिवाय Hoe-Hohre हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा पहिला कॅमेराही येथे आहे. तो मोठ्या ट्रंकेसारखा आहे. बीकानेरच्या महाराजांच्या कॅमे-याचाही माझ्या संग्रहात समावेश आहे. माझा हा छंद थांबलेला नाही. मी कॅमेरा मिळवण्यासाठी धडपडत असतो. कॅमे-यांना लागणा-या लेन्सेस, फिल्म ठेवण्याचे डबे, फिल्म धुण्याचे ट्रेदेखील कपाटांतून ठेवलेले आहेत. ते संग्रहालय पाहिल्यावर कॅमेऱ्याच्या तंत्रात कसकसे बदल होत गेले ते पटकन लक्षात येते.

मी कॅमे-याचा शोध घेत असताना मला एनलार्जरही मिळाले. मी तेही जमवू लागलो, असे सांगून फरीद म्हणाले, ‘दीडशे वर्षांपूर्वीच्या जुन्या एनलार्जरपासून अगदी नव्या एनलार्जरपर्यंतचे सर्व एनलार्जर माझ्याकडे आहेत. त्यांची संख्या दोनशे आहे. शिवाय पंचेचाळीस प्रोजेक्टर आहेत. पाथे कंपनीचा फ्रान्समधील पहिला प्रोजेक्टर व Pillard bolex हा स्वित्झर्लंडमधील प्रोजेक्टरसुद्धा माझ्याकडे आहे. त्यांचे दालन वेगळे आहे.’

पोलारॉईड कॅमेरा फरीद पुढील योजनांच्या विषयी बोलताना म्हणाले, ‘संग्रहालयाच्या पाचव्या मजल्यावर मोठा हॉल आहे. तो हॉल छायाचित्रांचे प्रदर्शन, पेंटिग्ज, ग्रीटिंग्ज कार्डस् अशा प्रदर्शनांच्यासाठी विनामूल्य देण्यात येईल. नवोदित कलाकारांना हॉलचे भाडे परवडत नसल्याने त्यांना प्रदर्शन भरवता येत नाही. अशा हॉलमुळे त्यांची गैरसोय दूर होईल. शिवाय, ज्यांना कुणाला फोटोग्राफी शिकायची असेल ते लोक जर गटाने आले तर मी त्यांना विनामूल्य शिकवेन. त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय काढू शकतील. कुणालाही सहज वापरता येणा-या कॅमे-यांमुळे फोटोग्राफीची सर्वांना आवड लागली आहे. त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले तर अधिक उत्तम रीतीने ते करता येईल. कोणाला फोटोग्राफी किंवा कॅमे-याविषयी काही शंका असेल तर त्यांना मी मदत करेन. ज्ञान हे पुढील पिढीला मुक्त हस्ताने दिले पाहिजे तरच त्याची प्रगती होईल. आमच्या व्यवसायातून मी हा महागडा छंद जोपासला व त्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी ही विनामूल्य सेवा मी देतो.

बॉक्स कॅमेरा एक इच्छा अशी आहे की, पुणे महानगरपालिकेने जर टॅक्समध्ये सूट दिली तर ते पैसे संग्रहालय अधिक संपन्न करण्यासाठी वापरता येतील व पाच मजली इमारतीसाठी लिफ्टही करून घेता येईल. जेणेकरून जिने चढता येत नाही म्हणून कोणीही विन्मुख जाऊ नये! कोणाला कॅमे-यांविषयी अधिक माहिती असेल,कोणाकडे एखादा जुना कॅमेरा असेल तर ते या संग्रहालयात ठेवू शकतील. संग्रहालय माझ्या सहासष्ट वर्षांच्या छंदातून निर्माण झाले असले तरी ते या छंदात व विद्याशाखेत आस्था असणाऱ्या सर्वांचे आहे, हीच माझी भावना आहे.

अनुपमा मुजुमदार
१८७, कसबा पेठ, पुणे – ११
दूरध्वनी – ०२० - २४५७९३६४

संग्रहालयाचा पत्ता
फरीदस् कॅमेरा म्युझियम,
फरीद मंजिल,
कोंढवा बुद्रुक,
साई सर्व्हिस स्टेशनशेजारी,
पुणे : ४८.
मोबाइल : ९३७१२६८२९०, दूरध्वनी – ०२० २६९३४३९६

लेखी अभिप्राय

आवर्जून भेट देणार

मनोज कानिटकर 30/09/2013

खूपच छान..

विनय सामंत02/10/2013

Great such hobby leads to historical documentations,wish him good health.

ranjan raghuvi…16/10/2013

Mi aaj udya bhet denar ahe he nakkich

Avdhut Joglekar21/12/2013

ही बातमी वाचून खुपच आनंद झाला. अशा प्रकारचे संग्रहालय भारतात आहे आणि ते सुद्धा पुण्यात म्हटल्या वर खूप कौतुकास्पद. ह्या संग्रहालयाला केव्हा एकदाची भेट देईल असे झाले.

मिलिंद देशमुख30/11/2015

खरोखर अतुलनीय प्रवास आहे. त्यासाठीच्या तुमच्या तपाला नमस्कार! शिवाय तुमच्या मनी पुढच्या पिढी साठी योगदान करण्याचा जो मानस आहे, ती एक सुंदर आणि निस्वार्थ भावना आहे. त्यासाठी मनापासून शुभेच्‍छा!

मनोज देशमुख …02/12/2015

संग्रहालयाची संकल्पना फार सुन्दर! परंतु हा महागडा संग्रहालय, दुर्मिळ कॅमेरे, तसेच कॅमे-याची देखभाल ही सर्वात महत्त्वाची व तितकिच कटकटीची. या सा-या गोष्टी समतोल सावरून. तारेवरची जणू कसरतच ती! सारा प्रपंच निव्वळ सेवाभावी, निस्वार्थी भावनेने! आव्हानच, लष्कराच्या भाक-या भाजण्याचाच हा प्रपंच! या कामी त्यांना दीर्घायुष मिळो ही प्रार्थना. लवकरांत लवकर त्यांच्या संग्रहालयाला भेट देतो.

गंगाधर नि. हलनकर20/03/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.