माण-खटाव पर्यटनक्षेत्र?

प्रतिनिधी 21/03/2013

दुष्काळी दौरे अन् कृतीकार्यक्रमांचा दुष्काळंसध्याच्या भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींचे माण-खटाव तालुक्यांतील दौरे वाढले आहेत! शरद पवार यांच्यापासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दुष्काळी पाहणी दौरे दोन वेळा होऊनही माण-खटावमध्ये अद्याप दुष्काळ निवारणासाठी शासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. माण-खटाव हा कायम दुष्काळी असणारा भाग शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावा, अशी मागणी त्या भागातील दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी केली आहे.

सरकारी दौरे आणि हतबल जनतामाण-खटाव तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती १९७२ पासून सलग दहा वर्षांनी प्रत्येक वेळी उद्भवल्याचा इतिहास आहे. १९७२, १९८२, १९९२...  त्यानंतर २००० ते २०१२ या वर्षांमध्ये तर प्रत्येक वर्षी माण-खटाव तालुक्यांत दुष्काळ पडला. परंतु २०१२ च्या चालू दुष्काळाने तर शेतकरी, व्यापारी, जनता पुरी हतबल झाली आहे आणि त्या भागात पडलेल्या दुष्काळाची चिंता राज्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याच्या आविर्भावात राज्यकर्ते दुष्काळी भागाचे पाहणी दौरे करत आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे नेते गेले सहा महिने आळीपाळीने त्या भागाचा दौरा करत आहेत. ते दौरे करून नेमके काय साधणार हे त्यांचे त्यांनाच समजलेले नाही, तर मग जनतेला काय कळणार?

राजकीय पक्षांची नेतेमंडळी पाहणी दौर्‍यात त्या भागातील जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देतात. पाण्याची पातळी परिस्थिती काय आहे ते पाहतात. एकेका नेत्याने दोन दोन वेळा पाहणी दौरे करून पाहिले आहेत. परंतु राज्यकर्त्यांनी अद्यापपर्यंत दुष्काळ निवारणासाठी ठोस पावले उचललेली नाहीत. मग दुष्काळ दौर्‍याचा फार्स कशासाठी असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

माण-खटाव भागात गेली दोन वर्षे पाऊसच नाही.माण-खटाव भागात गेली दोन वर्षे पाऊसच नाही. त्यामुळे शेतीपाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पाचवीला पुजलेला आहे. शेतकर्‍यांची परिस्थिती शेतात पीक नाही, जनावरे छावणीत आहेत, कर्ते पुरुष-स्त्रिया ऊसतोडीवर गेल्या आहेत, तर वृद्ध मंडळी जनावरांबरोबर छावणीत राहत आहेत. गावेच्या गावे ओस पडली आहेत. मग राज्यकर्ते येऊन दुष्काळी भागाची काय पाहणी करतात? पाहणी दौरा करून त्यांना काय साध्य करायचे आहे? जणू दुष्काळी भागाचा पाहणी दौरा हा राज्यकर्त्यांचा फॅशन शो झाला आहे!

तसे पाहिले तर त्या भागाचा दौरा निष्क्रिय राज्यकर्त्यांपेक्षा दानशूर, दानवीर व्यक्तींनी करणे गरजेचे आहे. कारण ज्यांच्याकडे माणुसकी आहे त्यांनीच खरोखर त्या भागात येऊन तेथील जनता कशी जगत आहे ते पाहिले तर त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता वाटते. पण ज्यांना सामान्य जनतेच्या अडचणी, दु:ख दूर करायच्या नाहीत अशा निगरगट्ट राजकीय पुढार्‍यांनी त्या भागाचा दौरा करून काय उपयोग?

(केसरी, ४ मार्च २०१३च्या अंकावरून, सातार्‍याच्या वार्ताहराकडून)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.