कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!


 भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांति‍पर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या नद्यांचे रक्षण, संवर्धन करणे हाच राजाचा धर्म आहे.”
 

कोरडी पडलेली आटपाडी तालुक्यातील माणगंगा  नद्यांचे महत्त्व महाभारत काळापासून विशद केले जात असले, तरी नद्यांबाबत आपण आणि आपले राज्यकर्ते म्हणावे तेवढे जागरूक नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहणा-या माणगंगा या ऐतिहासिक नदीचे देता येईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली , सोलापूर आणि सातारा या तीन सुजलाम्-सुफलाम् जिल्ह्यांतील दुष्काळी भाग म्हणजे माणदेश. पाऊसमान कमी म्हणून समृद्धता नाही आणि समृद्धता नाही म्हणून विकास नाही. या दुष्टचक्रात अडकलेल्या माणदेशी माणसांचे स्वप्न आहे विकासाचे. पण शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याला पारख्या असलेल्या त्या माणसांवर निसर्गानेच अन्याय केला आहे. त्या भागातून जाणारी माणगंगा नदी पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर कायम कोरडी असते.
 

 स्वातंत्र्य आले, सरकारे बदलली पण तेथील जनतेचे दुष्काळाचे भोग काही सुटत नाहीत. माणदेशी पट्टयातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असूनही, वेळीअवेळी पडेल तेवढ्या पावसाच्या भरवशावर तेथील लोक दिवस ढकलतात. विशेष म्हणजे मान्सूनचा मुख्य पाऊस त्या भागात न पडता, तेथे, परतीचा मान्सून म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर या काळात तो सक्रिय असतो. तेथे जास्तीत जास्त पन्नास-साठ सेंटिमीटर, तर कमीत कमी पंधरा सेंटिमीटर एवढा पाऊस पडतो. कधी कधी तर सलग पाच – पाच वर्षे पाऊसच पडत नाही! पाऊस घेऊन निघालेले काळेभोर ढग बर्‍याच वेळा माणदेशावरून पुढे जातात व तेथे सांगली-कोल्हापूरात बरसतात. त्यांचा माणदेशवर रुसवा का ते कळत नाही. हवामान शास्त्रज्ञांनाही ते कोडे वाटते. माणदेशचे हवामान समशीतोष्ण असले तरी उष्ण आणि निम शुष्क किंवा कोरडे असे आहे. सरासरी कमाल तापमान एप्रिल-मे मध्ये पंचेचाळीस अंश सेंटिग्रेड तर डिसेंबर-जानेवारीत पंधरा-सतरा अंशापर्यंत खाली घसरलेले आढळते. खरीप पिकांची शाश्वती तेथे देता येत नाही. पावसाच्या चार-दोन झडींवर थोड्याफार रब्बीच्या पेरण्या झाल्या तरी निसर्ग पुढच्या पावसाची हमी कधीच देत नाही!
 

आटलेली येरळा नदी माणगंगा नदी ही कायम कोरडी ठणठणीत असते, त्यातच अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर होत असलेला वाळू उपसा, नदीपात्रात वाढत चाललेले अतिक्रमण आणि भूगर्भातून सुरू असलेला अमाप पाणीउपसा अशा कारणांनी माणगंगा नदीचे भविष्य धोक्यात आले आहे. कमी पर्जन्यमानाच्या भागातून उगम पावणा-या माणगंगा नदीला पाणलोट क्षेत्र कमीच लाभले आहे. उगमापासून म्हणजे कळस्करवाडी (तालुका माण, जिल्हा सातारा) ते सरकोली (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर) या ठिकाणच्या भिमा नदीच्या संगमापर्यंत माणगंगेला एकशेऐंशी किलोमीटर लांबीच्या अंतराच्या पट्टयात एकूण बेचाळीस लहान-मोठे ओहोळ, ओढे आणि उपनद्या मिळतात. पैकी तीस प्रवाह डाव्या बाजूने तर तेवीस प्रवाह उजव्या बाजूने मिळतात. उजव्या बाजूने येणारे अठरा प्रवाह लांब व रुंद असून त्याच्या (प्रवाहाच्या) दोन्ही काठांवर शेती केली जाते. एक वाघजाई नदी सोडली तर अन्य कुठलाही प्रवाह माणगंगा नदीला डाव्या बाजूने मिळत नाही. मुळात माणगंगेला पाणी नसते, तर तिच्या उपनद्या - प्रवाहांना पाणी कुठून असणार? त्यामुळे सबंध माणदेशातील माण-दहिवडी, खटाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, सांगोला आणि मंगळवेढा या सात तालुक्यांतील तीनशेअकरा गावांचा आणि एकोणीस लाख लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
 

अग्रणी नदी  एखादी व्यक्ती जन्मतः अपंग असेल तर तिच्यावर योग्य शस्त्रक्रियेची गरज असते. तशीच माणगंगा, अग्रणी आणि डोरळा नद्यांना योग्य शस्त्रक्रियेची गरज आहे. ती गोष्ट लक्षात घेऊन माणगंगा या नदीला बारमाही वाहती करण्यासंदर्भात गेल्या दहा-बारा वर्षांपासून अनेकांकडून अभ्यास सुरू आहे. त्यातून त्या नदीला बारमाही करण्यासाठी अनेक पर्याय व उपाययोजना सुचवल्या गेल्या आहेत. प्रारंभीच्या टप्प्यात म्हसवडचे (जिल्हा सातारा) बाळासाहेब माने, राजेवाडीचे शंकर पाटील, दिघंचीचे बळीआण्णा मोरे, नंदकुमार मोरे , अजय शेटे (सर्व जिल्हा सांगली), मंगळवेढ्याचे रमेश जोशी आणि सोलापूरचे स्थापत्य अभियंता एस.डी. पाटील यांनी त्यांच्या अभ्यासानंतर माणगंगा नदीला भीमा किंवा कृष्णा नदीच्या खो-यातील पाणी उताराने आणणे शक्य आहे हे मांडले.
 

परंतु भीमा नदी ही कृष्णा नदीच्या खो-यातील नदी असल्याने त्या नदीचा विचार स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. कृष्णेच्या पाण्याचा विचार करता त्या नदीच्या सर्व पाण्याचे वाटप यापूर्वीच झाले आहे. अतिरिक्त पाण्याच्या संदर्भात आंध्र आणि कर्नाटक या राज्यांबरोबर महाराष्ट्राचे तंटे सुरू आहेत. अशा स्थितीत कृष्णा खो-यातच अतिरिक्त पाणी आणून पुढे ते पाणी अनुक्रमे येरळा, अग्रणी आणि माणगंगा या दुष्काळी तालुक्यांतील नद्यांना कमी खर्चात आणि कमी वेळेत कसे देता येईल याचा अभ्यास सुरू झाला. पाटबंधारे अभियंता डी.डी.पवार, माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे (आटपाडी) अभियंता एच.एस. पाटील, निवृत्त पाटबंधारे कर्मचारी पी.ए.पाटील आणि पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये एरियल फोटोग्राफी करणारे अमोल पवार यांच्या पथकाने तो अभ्यास केला. त्या पथकात मीही सहभागी होतो. सुरूवातीला, सावित्री या महाबळेश्वरातून उगम पावणा-या नदीची उपनदी ढवळी नदीचे पाणी उताराने येऊ शकते असा आराखडा तयार करण्यात आला. महाबळेश्वरच्या माथ्यावर पडणारे प्रचंड पाणी पावसाळ्यात कोकणात मोठ्या प्रमाणावर वाहून जाऊन अरबी समुद्रात अक्षरशः वाया जाते. त्या अभ्‍यासातून पुढे आला कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प.
 

कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प

 

विजय लाळे यांचे या प्रकल्पातील सहकारी अभियंता बी. डी. पवार सर्वेक्षण करत असताना  पथकाने सर्वेक्षण केल्यानुसार, कृष्णा नदी जिथून उगम पावते त्‍या महाबळेश्वरच्या डोंगर रांगांत दरवर्षी सरासरी सहा हजार चारशे मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे अनेक वेळा कृष्णेला महापूर येतो. त्या पुराचा फटका सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णाकाठच्या अनेक गावांना बसतो. मात्र त्याच वेळी माणगंगा, येरळा आणि अग्रणी नद्यांच्या खो-यात दुष्काळी परिस्थिती असते. केवळ पावसाळ्याच्या काळातील, म्हणजे ३० जून ते १५ सप्टेंबरपर्यंतचे पाणी जरी दरवर्षी मिळाले तरी तो भाग सुफलाम होईल.
 

 माणगंगा ही भीमानदीची उपनदी असली तरी भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. त्‍यामुळे माणगंगेसह अग्रणी आणि येरळा या तिन्ही नद्या कृष्णा नदीच्या खो-यात येतात. त्यामुळे कृष्णेचे पाणी या तिन्ही नद्यांना नैसर्गिक न्यायाने मिळाले पाहिजे. म्हणून कृष्णा लवादाच्या वाटपाअतिरिक्त पावसाळ्यातील ४.५२ टी.एम.सी. पाणी कृष्णा नदीत उपलब्ध आहे. त्या शिवाय कोयना धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ वळण बंधारा बांधून ते पाणी धोम धरणात आणि तेथून उताराने थेट दुष्काळी भागाकडे आणण्‍यात येणार आहे.
 

असा हा प्रकल्प आराखडा

 

माणदेशातील नद्यांचे स्थान दर्शवणारे रेखाचित्र कोयना धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रातील सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ एक वळण बंधारा बांधून ८.७६ किलोमीटर लांबीचा पहिला बोगदा काढण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर त्या बोगद्यातून धोम धरणाकडे (कृष्णा नदीवरील त्‍या धरणाची साठवण क्षमता १४ टी.एम.सी.आहे) चौर्‍याण्णव घनमीटर प्रती सेकंद विसर्गाने ३.५० टी.एम.सी. पाणी आणण्‍यात येणार आहे. त्‍या धरणाची पूर्ण संचय पातळी ७४७.७० मीटर इतकी आहे. त्‍या धरणातून पूरकाळातील १९७९-१९८० ते २००७-२००८ पर्यंतच्‍या प्रत्‍यक्ष सांडव्‍यातून पाण्‍याचा विसर्ग लक्षात घेता सरासरी ४.५२ टी.एम. सी. पाणी उपलब्ध होईल. असे दोन्ही मिळून या प्रकल्पासाठी एकूण ८.०२ टी.एम.सी. पाणी मिळणार आहे.
 

 सोळशी ते धोम धरणाच्या डाव्या काठापासून (उत्तरेकडून) ते दबई नाला (तालुका आटपाडी, जिल्हा सांगली) या दरम्यान एकशेसतरा किलोमीटर लांबीचा दुसरा मुख्य बोगदा काढण्‍यात येणार आहे. त्‍या बोगद्याला धोमपासून शहात्तर किलोमीटरवर दरुज-वाकेश्वरजवळ पूर्वोत्तर दिशेला पंधरा किलोमीटर अंतरावर असणा-या पिंगळी नदीला जोडणारा आणखी एक उपबोगदा काढण्‍यात येणार आहे. ही पिंगळी नदी गोंदावले बुद्रुकजवळ माणगंगेला मिळते. ते अंतर साधारणत: साडेचार किलोमीटरचे आहे. त्यामुळे गोंदावले बुद्रुकपासून माणगंगेवरील सर्व मध्यम, लघू पाटबंधारे, तलाव आणि कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे यांना पाणी मिळेल.
 

 दरम्यान, धोम धरणातून दुस-या मुख्‍य बोगद्याद्वारे पाणी दबई नाल्‍यात येईल. जवळच्‍या जांभुळणी नाल्‍यातून पुढे चार किलोमीटरवर घाणंद संतुलन तलावात आणण्‍यात येणार आहे. तेथून पुढे टेंभू योजनेच्या अस्तित्वात असलेल्या सर्व वितरण प्रणालीचा (म्हणजेच कालव्‍यांचा) वापर करण्यात येणार आहे. दुसरीकडे जांभुळणी तलावातून बाहेर पडलेले पाणी थेट आटपाडी तलावाकडे जाईल. तो तलाव भरल्यानंतर पुढे शुक ओढ्यामार्गे आटपाडी शहराच्या पूर्वेस माणगंगा नदीला जाईल. तिकडे पिंगळी नदीतून राजेवाडी तलावामार्गे आटपाडी तालुक्याच्या उत्तर भागातून फिरून एकत्रितपणे आलेले पाणी माणगंगेतून सोलापूर जिल्ह्याकडे जाईल.
 

 इकडे घाणंद तलावापासून निघालेला टेंभूचा कालवा (सांगोला शाखा) नेलकरंजी, मानेवाडी, हिवतड या मार्गे सांगोल्याकडे जात असताना चिंचाळे, खरसुंडी, कानकात्रेवाडी, माळेवस्ती, तळेवाडी या गावांतील ओढ्यातून त्या खालच्‍या करगणी, पात्रेवाडी, बनपुरी, कचरेवस्ती, शेटफळे आदी गावांना आणि परिसरातील सर्व लहानमोठ्या तलावांना पाणी मिळेल आणि ते सर्व पाणी टेंभू योजनेच्या या शाखेला कवठेमहांकाळकडे जाणा-या बाणुरगड बोगद्यातून उताराने जाऊन सर्व ओढे, नाले व त्यावरील बंधारे, तलाव आपोआप भरतील. तसेच, ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवण योजना आहेत त्या पूर्ण क्षमतेने भरून उर्वरित पाणी खालच्‍या बाजूस माणगंगा नदीला मिळणार आहे.
 

येरळा ही कृष्णेची उपनदी असली तरी मुळात माणदेशातील आहे. माणगंगा ज्या महादेवाच्या डोंगररांगांतून उगम पावते, त्याच डोंगराच्या अलिकडच्या, म्हस्कोबाच्‍या डोंगरातून येरळेचा उगम होतो. माणगंगा उगमस्थान आणि येरळा उगमस्थान यांत फक्त चौदा किलोमीटरचे हवाई अंतर आहे. नदीच्‍या एकूण शंभर किलोमीटर लांबीपैकी या प्रकल्पातून वडूज ते ब्रम्हनाळ अशा अडुसष्ट किलोमीटरच्‍या पात्राला थेट पाणी मिळणार आहे. धोम धरणातून आलेल्‍या एकशे सतरा किलोमीटर लांबीच्या मुख्य बोगद्याला पंचाऐंशी किलोमीटरवर शंभर मीटर लांबीचा आणखी एक पोटबोगदा काढून वडूजजवळ लेंडूर ओढ्याजवळ पाणी येरळवाडी तलावात सोडण्‍यात येणार आहे. ते पाणी पुढे येरळेला मिळणार आहे.
 

 अग्रणी या कृष्णेच्या आणखी एक उपनदीलाही प्रकल्पाव्दारे प्रवाहित करता येणार आहे. अग्रणी नदी खो-याची लांबीपंचाहत्तर किलोमीटर इतकी आहे. नदी भूड (तालुका खानापूर, जिल्हा सांगली ) येथील भिवघाटाच्या समांतर उत्तरेला असणा-या डोंगरातून उगम पावते. धोममधून आणलेले पाणी जांभुळणी तलावातून टेंभू योजनेच्या, सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कालव्यांव्दारे पुढे नेलकरंजी (तालुका आटपाडी) फाट्यापासून पाच किलोमीटरचा बोगदा काढून अग्रणी नदीला वायफळे गावाच्‍या अलिकडे यमगरवाडी रस्त्याजवळ (तालुका तासगाव) अग्रणीला पाणी देता येईल. अग्रणीला पाणी चार मीटरच्‍या नैसर्गिक उताराने नेलकरंजीहून बोगद्याद्वारे मिळेल. अग्रणी नदी तासगाव आणि कवठेमहांकाळपासून पुढे कर्नाटकातील खिळेवाडी(जिल्हा बेळगाव)च्या पलीकडे जाऊन कृष्णा नदीला मिळते. अशा रीतीने माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना पाणी मिळणार आहे.
 

‘बारमाही माणगंगा’ या ब्लॉगला ‘ब्लॉग माझा’ मिळालेले प्रमाणपत्र  माणदेशातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे या हेतूने विजय लाळे आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी गेल्‍या काही वर्षापासून माणगंगा, येरळा, अग्रणी आणि पिंगळी या नद्या बारमाही वाहत्या कशा होतील या दृष्टीने अभ्यास करून ‘कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प’ शासनाकडे सादर केला. त्‍या प्रकल्पाला मान्यता मिळाली, परंतु त्‍यावर अंमलबजावणी झाली नाही. ते प्रयत्‍न लोकांसमोर आणण्‍यासाठी विजय लाळे यांनी ‘बारमाही माणगंगा’ हा ब्लॉग सुरु केला. त्‍यास वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्‍या ब्‍लॉगची ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीकडून आयोजित करण्‍यात आलेल्या ‘ब्‍लॉग माझा’ या स्पर्धेत ‘बारमाही माणगंगा’ या ब्‍लॉगची उत्तेजनार्थ निवड करण्‍यात आली आहे.
 

असा असेल बोगदा

 

 या प्रकल्पांत प्रस्तावीत असलेल्या 180 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा आराखडायोजनेत एकूण १४५.८६ किलोमीटरपैकी १३९ किलोमीटर आणि ६.८६ किलोमीटर खोल खोदकाम आहे. बोगद्यातील माल (दगड-माती) बाहेर काढण्‍यासाठी दर पाच किलोमीटर अंतरावर पंचवीस उभे झरोके ठेवण्‍यात आले आहेत. तळाची रूंदी = नऊ मीटर. वरचा अर्धगोलाकार भाग = सव्वा दोन मीटर. उंची = साडेचार मीटर इतकी आहे. या आकाराच्या बोगद्यातून प्रती सेकंदाला ११६० घनफूट पाणी वाहणार आहे. पाच टीएमसी पाणी पन्नास दिवसांमध्ये म्हणजे दररोज शंभर दशलक्ष घनफूट प्रमाणे वाहणार आहे. हे परिमाण राजेवाडीसारख्या ०.७ टी.एम.सी. साठवण क्षमता असलेला तलाव सात दिवसांत भरून वाहण्याइतपत आहे आणि ०.३ टी.एम.सी.क्षमतेचा आटपाडी तलाव केवळ तीन दिवसांत गुळणी टाकेल!
 

 माणगंगा पाणलोटातील लाभक्षेत्र :
 

मध्यम प्रकल्प :  राजेवाडी (म्हसवड तलाव, तालुका माण), संख तलाव (तालुका जत), बुध्दी हाळ तलाव (तालुका सांगोला ).

लहान प्रकल्प : आटपाडी तालुका -जांभुळणी, घाणंद, अर्जुनवाडी, माळेवाडी, निंबवडे, दिघंची व आटपाडी - जत तालुका- भिवर्गी

कोल्हापूर पध्दतीचे बंधारे- आटपाडी तालुका :  लिंगिवरे, दिघंची (२), लोणारवाडी, कौठुळी, बनपुरी, शेटफळे, देशमुखवाडी, पांढरेवाडी.

सांगोला तालुका- लोटेवाडी, खवासपूर, कमळापूर, वासुद- अकोले, वाढेगाव, बलवडी, नाझरे, आलेगाव, कडलास (२), चिनके, वाटंबरे , सावे, मेथवडे, जवळे (२), सोनंद (२), मांजरी (३).

जत तालुका : अंकलगी, बेळुंडगी, जालीहाळ बुद्रुक, मोरबगी, माणिकनाळ, सोन्याळ (२), निगडी कारंडेवाडी, बालगाव.

मंगळवेढा तालुका- गुंजेगाव. त्या शिवाय उभारण्यात येणा-या काही प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे. त्यामध्ये लघु पाटबंधारे तलाव -अंकलगी व शेगाव (तालुका जत),

कोल्हापूर पध्दतीचे बंधारे- सिंगन हळ्ळी(तालुका जत), बामणी, उदनवाडी ,जवळे (तालुका सांगोला), बोंबेवाडी (तालुका आटपाडी) यांसह जत तालुक्यातील उमदीचे आणखी दोन आणि मोरबगीचा एक अशा तीन लहान प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे.
 

अग्रणी नदीच्‍या काठावरील लाभक्षेत्रातील गावे –
 

तासगाव तालुका :  वायफळे, सिद्धवाडी, बिरणवाडी सावळज, अंजनी, वज्रचौंडे.

कवठेमहांकाळ तालुका : बोरगाव, शिरढोण, मोरगाव, देशींग, शिंदेवाडी, कवठेमहांकाळ, हिंगण गाव, विठुरायाची वाडी, करोली-टी, अग्रण-धुळगाव , रांजणी, लोणारवाडी आणि कोंगनोळी. 

येरळा नदीकाठच्या एकूण चौसष्ट गावांना थेट पाणी मिळणार आहे. ही गावे अशी –

खटाव तालुका : येरळवाडी, कुमठे, उंबरडे, गुरसाळे, काळेवाडी, गोरेगांव, बनपूरी, धोंडेवाडी, आंबवडे, शेनवडी, चितळी, मायणी, म्हासुर्णे, ल्हासूर्णे, चोराडे, गुंडेवाडी, शिरसवडी, होळीचा गांव, पळसगाव ,पिंपरी, शितोळेवाडी आणि सुर्याचीवाडी.

खानापूर तालुका : चिखलहोळ, हिंगणगादे, कळंबी, ढवळेश्वर, पंच लिंगनगर,भाळवणी,कमळापूर आणि तांदुळवाडी.

कडेगाव तालुका : कान्हरवाडी, येतगाव, तुपेवाडी, भिकवडी,हणमंत वडिये, नेवरी, आंबेगाव, येवलेवाडी, वडियेरायबाग, शिवणी, शेळकबाव, शिरगाव आणि रामापूर.

तासगाव तालुका : निंबळक, बोरगाव, विसापूर, ढवळी, निंमगाव, तासगाव, नागाव, बेंद्री आणि शिरगाव -कवठे.

पलुस तालुका : वाझर,आंधळी, मोराळे,राजापूर,बांबवडे, बुर्ली, नेहरु नगर, जुळेवाडी, हजारवाडी, माळवाडी, वसवडे, खटाव आणि ब्रम्हनाळ.
 

कृष्ण-माणगंगा नदी जोड प्रकल्प

प्रकल्पाची वैशिष्‍ट्ये

 

* पिंगळी, येरळा आणि अग्रणी अशा चार नद्या जोडण्यात येणार.

* भारतातील नंबर दोनच्या व महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या अति-अति तुटीच्या भागाला हक्काचे पाणी मिळणार

* पाणी नैसर्गिक उताराने येणार असल्यामुळे विजेचा प्रश्न नाही.

* कोठेही पाणी उचलायचे (लिफ्ट करायचे) नसल्याने वाढीव विजेचा प्रश्न उद्भवणार नाही.

* बोगद्याच्‍या एकूण शंभर फूट उताराचा उपयोग किमान सात ते आठ मेगावॅट वीज निर्मिती करण्‍यासाठी शक्‍य.

* सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कायमस्वरूपी दहा दुष्काळी तालुक्यांतील शेकडो गावांचा आणि खेड्यापाड्यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटून टँकर्स, चारा छावण्यांसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. दुसरीकडे वाई शहरासह कृष्णाकाठच्‍या गावांना महापूराचा धोका राहणार नाही.

* योजनेसाठी फक्त बोगद्यांसाठी किंवा आवश्यक तिथे कालव्यांसाठी लागणारी जमीन शासनाला संपादित करावी लागणार. ती बहुतांशी जमीन शासकीय आहे. त्यामुळे गाव उठवावे लागणार नाही आणि पुर्नवसनाचा प्रश्नही निर्माण होणार नाही.

*एकशे साठ किलोमीटर लांबीच्या माणगंगा, येरळा आणि अग्रणी या नदी पात्रांच्या अंतराचा नैसर्गिक कालवा म्हणून उपयोग होऊन या तिन्ही नद्यांच्या काठावरील एकूण साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.

* या भागातील झाडे-झुडपे वाढून वातावरणातील आर्द्रता वाढून भविष्यातील तापमानवाढीचा धोका टळेल.

* दरवर्षी पाणी वाहिल्यामुळे तिन्ही नदीकाठच्या विहिरी जिवंत होतील; तसेच, नैसर्गिकरीत्या भूगर्भपातळी वाढेल.

*माणगंगेवरील सध्याचे बत्तीस व येरळेवरील दहा बंधारे आणि भविष्यात उभारण्‍यात येणा-या बंधार्‍यांमुळे नद्यांत कायमस्वरूपी पाणी राहील.

*माणगंगा नदी सरकोली जवळ (तालुका पंढरपूर) भीमेला मिळते. तेथून पुढे औज आणि टाकळी बंधार्‍यांत पाणीसाठा वाढल्‍याने सोलापूर शहराचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल.
 

कृष्णा-माणगंगा नदीजोड बहुउद्देशीय प्रकल्प
 

नैसर्गिक रचना.....(समुद्र सपाटी पासूनची उंची)

* सोळशी नदी = ७५० मीटर (कोयना पाणलोट, धनगरवाडी गावाजवळ)

* धोम धरण = ७४६.९५ मीटर ( कृष्णा नदी, ता.वाई,जि.सातारा)

* जांभूळणी = ७१६ मीटर (ता. आटपाडी जि.सांगली)

* गोंदावले(बुद्रूक)= ७१६ मीटर (पिंगळी नदी, ता. माण, जि.सातारा)

* दरूज (ता.वडूज) = ७१२ मीटर (लेंडूर ओढा-येरळा नदी,जि.सातारा)

* नेलकरंजी (ता.आटपाडी) = ७११ मीटर

(आटपाडी-भिवघाट रस्‍त्‍याजवळील टेंभूचा कालवा)

* अग्रणी नदी = ७०८ मीटर (यमगरवाडी, सिध्देवाडी तलावाजवळ)
 

दुष्काळी भागासाठी कृष्णेचे अतिरिक्त उपलब्ध पाणी वळवून माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना कमी खर्चात व कमी वेळेत आणता येईल, यासाठी बारमाही माणगंगा नावाने सातत्‍याने लिखाण करत गेल्‍या चार वर्षांपासून पाठपुरावा केला. कृष्णा-माणगंगा नदीजोड प्रकल्प राज्‍य शासनाच्‍या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ - पुणे यांच्‍या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, आरफळ कालवे विभाग, करवडी(कराड) यांनी तयार करून जलसंपदा विभागाकडे पाठवला आहे. त्यास शासनाच्‍या अनेक उच्चस्तरीय अधिका-यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गरज आहे, सामुहिक प्रयत्नांची. आपसातील राजकीय आणि प्रादेशिक मतभेद बाजूला ठेवून या बहुउद्देशीय प्रकल्पाला पाठिंबा मिळण्याची.
 

विजय लाळे
जय आनंद अपार्टमेंट,
नेवरी रोड, संभाजीनगर,
विटा शहर, जिल्‍हा सांगली ४१६३११
मोबाइल ८८०५००८९५७

लेखी अभिप्राय

It's good to see someone thniking it through.

Jayanthi23/04/2014

किती काळ लागेल प्रकल्प पुर्ण होण्यास . . . . . कोणास ठाउक . . पण अतिशय गरजेचा आहे . . आपल्या विचाराला कृतीची जोड नक्की मिळो . . साई राम . .

मनोहर शिंदे कॊपरगाव27/06/2014

आपल्या मांडलेल्या योजनेला सलाम. मी मूळचा सातारा जिल्ह्यातील असून माण तालुक्याची दुर्दशा ऐकण्यात आमचे लहानपण गेले. कोयना, धोम, कण्हेरपासुन ते सांगली जिल्ह्यापर्यंत सारा प्रदेश सुजलाम सुफलाम आणि तिन्ही त्रिकाळ आलसाम् अशी हेटाळणी व्हायची. पण माणदेशाला ना पाणी ना शेती. ना काम ना धंदा. अशी अत्यंत वाईट गत. सोलापुरात काॅलेजला असल्याने ह्या भागातून वर्षांत चार वेळा एसटीने प्रवास होई. दिवसा प्रवास करणे नको एवढा अतिरेकी रुक्ष भाग. मैलोनमैल पाण्याचा टिपूसही नाही. शेती लांब राहिली साधं झुडूप दिसलं तर शपथ. गवत सोडल्यास काही पिकत असेल की नाही शंकाच. सरकारतर्फे रोहयोमधली योजना या भागात झाल्याचे सांकेतिक उदाहरण म्हणून दहिवडीजवळ सार्वजनिक वनविकास प्रकल्प दिसे. अन्यथा पाटबंधारे विभागाचे अस्तित्व नजरेच्या टप्प्यात दूरदूरपर्यंत नसे. पंधरा मिनिटांचा धुवाधार पाऊस ज्यांना नदीपूल म्हणणं अवघड अशांना पोटात घेऊन त्याबरोबर कैक गाईगुरांना वाहून नेत असे. क्वचित प्रसंगी फारच मोठा पाऊस राहिला तर चोविस चोविस तास एस.टी. पाणी सरण्याची वाट बघत थांबून रहात असत.
जाणता राजा साखरपट्ट्यात आणि माणदेश पाटबंधार्‍यावाचून तडफडतोय अशी दशकानुदशके विदारक स्थिती बदलण्याची प्रख्यात शेतीतज्ञ माजी कृषीमंत्र्याला आणि त्याच्या भाचराला गरजही वाटू नये ही आश्चर्याची बाब आहे. आपल्या ह्या वाखाणण्याजोग्या प्रकल्पामागे सरकारी यंत्रणेची देखील कदाचित मदत झाली असेलच. बारामतीकरांचा देखिल त्यात हातभार लागला असेल. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, की एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना हे महत्त्वाचे प्रकल्प कागदावर का होईना दिसायला एवढा काळ लागावा.
आपले शतशः अभिनंदन आणि हे महत्वाचे देशकार्य करत असल्याबद्दल धन्यवाद.

आशिष पेंढारकर13/09/2015

खूप चांगला प्रकल्प आहे. परंतु लवकर होणे गरजेचे आहे.

हेमंत यादव(पें…10/10/2015

नदी जोड प्रकल्प होने अवश्य आहे परंतु ह्या कडे सरकार चे लक्ष्य नाही नदी जोड प्रकल्पझाला तर सगळी कडील गरीब हाटेल सरकार ने लवकर निर्णय घ्यावा हि नम्र विनंती

प्रसाद सूर्यका…07/08/2016

He yojna changli ahe yacha sarvana fayda honar ahe lavkar purna vavi evdech

Sagar pawar02/09/2016

कल्याणकारी योजना.

विजय पाटील मोर…09/10/2016

कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी अतिशय गरजेचे काम आहे. सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान न देता तो निधी या कामाला वापरावा काही सधन शेतकऱ्यांनी लोकवर्गणी जमा करायला पण काहीच हरकत नाही ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी जनलढा ऊभा राहीला पाहीजे. त्यासाठी राजकारण गट तट विसरून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

Dr.Namdeo Deshmukh03/08/2019

मी पुण्यात राहतो. हा प्रकल्प सुरू झाला तर खूपच छान होईल. शेतकऱ्यांना खूपच फायदा होईल. माझे म्हणने आहे, की कृष्णा नदीवर एक मोठे धरण बांधायला पाहिजे. महाराष्ट्रात कृष्णा नदीवर एकपण मोठे धरण नाही. जर धरण बांधले गेले तर कर्नाटक सरकारला. सांगलीत जत या भागात पाणीपुरवठा करायला विनंती करायची गरज भासणार नाही. कृष्णा नदीवर सातारा. कोल्हापूर. सांगली. या तिन्ही जिल्ह्यात एकही मोठे धरण बाधले गेले नाही. जर धरण बांधले गेले तर महाराष्ट्राला याचा खूप मोठा फायदा होईल. सातारा, कोल्हापूर, सांगली, जिल्ह्यातील सतरा नद्यांचे पाणी कर्नाटकात जाते. त्या पाण्याचा उपयोग महाराष्ट्राला होईल.

Santosh kamble25/11/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.