कोकणातील नमन – खेळे


नमन-खेळे हा लोककला प्रकार ‘यक्षगान’ या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो  नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून होत असावेत. खेळ्यांच्या काही गीतांतून राघोबादादांच्या नावाचा उल्लेख आढळतो. १७२८ साली शामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे दोन भाग होऊन एक ‘दशावतार’ म्हणून दक्षिण रत्‍नागिरी जिल्‍ह्यात (सिंधुदूर्ग) प्रसिद्धी पावला व ‘नमन-खेळे’ उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले. तो समाज अशिक्षित व आर्थिक दृष्ट्या मागासलेला. त्यामुळे नमन-खेळे यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली नाही, म्हणून तो लोककला प्रकार दुर्लक्षित राहिला आहे.

 तो कलाप्रकार नृत्य, नाट्य व संगीत यांनी परिपूर्ण असा आहे. त्‍याचे ‘यक्षगान’ या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य आहे. दोन्हींकडे पायघोळ झगे वापरले जातात. रामायण-महाभारताचे गायन कोरसच्या साह्याने केले जाते व पात्रे त्‍यावर अभिनय करतात. अंगसोंगे व लाकडी सोंगे याबाबतीत खेळ्याचे साम्य लळिताशीही आढळते.

 दोन्हींमध्ये ब्राह्मण, गावचा पाटील, सरकारी अधिकारी अशांची सोंगे आणून, त्यात टिंगलटवाळी, शब्दांच्या कसरती व अंगविक्षेप करून लोकांना पोटभर हसवले जाते व त्यांची करमणूक केली जाते. दोन्हींमध्ये चेह-यांवरील भावदर्शनाला वाव असतो. खेळ्यांतील मुखवटा-नाट्याचे साम्य भवाड्यातील मुखवटा-नाट्याशी आढळून येते, मात्र भवाड्यातील पात्रे मूक असतात, तर खेळ्यांतील पात्रे बोलतात. ती मौखिक परंपरा आहे. खेळे लिखित स्वरूपात फारसे आढळून येत नाहीत.

नमन-खेळेंची प्रथा कुणबी समाजात आढळते. कुणबी समाज फाल्गुन महिन्यात होळीच्या सुमारास गावच्या देवीच्या नावाने नमन-खेळे प्रारंभ करतो. त्याचे प्रयोग वैशाख महिन्यापर्यंत वेगवेगळ्या गावांतून चाललेले असतात. गावातील देवीची पालखी आणि खेळे कलावंत बरोबर बाहेर पडतात. म्हणून त्‍यांना ‘देवीचे खेळे’ असे संबोधले जाते. प्रत्येक गावची ग्रामदेवता व तिची पालखी स्वतंत्र असते. देवींची नावेही वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, सोमजाई, चंडिका, जाखामाता वगैरे. रवळनाथ हा देव मात्र सगळीकडे आढळून येतो. ते खंडोबाचे नाव असून दोहोंच्या मूर्तीतही साम्य आढऴते. ग्रामदेवता या मातृदेवता म्हणून ओळखल्या जातात.

देवीची सजवलेली पालखी गावातील प्रत्येक घरात ढोल-ताशांच्या गजरात फिरवली जाते. यजमान पुढे होऊन पालखी खांद्यावर घेऊन पालखीचे स्वागत करतो. पालखीबरोबर आलेला गुरव (पुजारी) प्रथम पालखीची पूजा करतो. नंतर घरातील मंडळी पूजा करतात. त्याचवेळी देवीचे नवस दिले जातात, नवीन नवस बोलले जातात. त्या वेळेस गावातील बलुतेदार देवीला गा-हाणे घालण्यासाठी उपस्थित असतात. गावातील तरुण वर्ग हौसेने ढोलांच्या तालावर पालखी नाचवत असतो.

पालखी गेल्यावर खेळे येतात. पायघोळ झगे, उपरणी, डोक्यावर पगड्या, हातात टाळ अशी वेशभूषा केलेली दहा-बारा मंडळी अंगणात येऊन देवीची नमने म्हणायला सुरुवात करतात. त्या वेळेस मृदुंगवादक , संखासूर व स्त्रीवेशातील पुरुष (कोळीण) खेळ्यांपुढे नाचत असतात. काही नमने झाल्यावर यजमानांकडून आरती व दक्षिणा घेऊन मंडळी पुढील घरी जातात. आरती व दक्षिणा खेळ्यांचा मान समजला जातो.

रंगमंचावर नमन-खेळे सादर करत असताना  ग्रामदेवता हे गावाचे दैवत असते. देवी गावाचे रक्षण करते ही समजूत. गावावर कुठली आपत्ती आली, रोगराई आली तर देवीचा कौल घेतला जातो. देवी जो कौल देईल तो गावाला बंधनकारक असतो. खेळ्यांनी त्यांचा पोशाख अंगावर चढवला, की ते देवीचे खेळे होतात ही समजूत; त्यामुळे खेळ्यांनाही नवस बोलण्याची प्रथा आहे.

 खेळे करणारी मंडळी घरोघरी जातात तेव्हा त्यांना फिरतीचे खेळे असे म्हणतात. परंतु लग्नकार्य, पूजा, नामकरण विधी अशा प्रसंगी किंवा गावातील प्रतिष्ठित पुढारी मंडळींकडे वर्षांतून एकदा रात्रभर खेळे करण्याची पद्धत आहे. त्याबद्दल त्यांना मानधनही दिले जाते. त्या ठिकाणी धार्मिक विधीपेक्षा करमणुकीवर जास्त भर असतो. ज्‍या ठिकाणी खेळे आपला खेळ सादर करणार असतात, त्या घरासमोरील अंगणात मंडप घातलेला असतो. तो आंब्याच्या डहाळ्यांनी, नारळाच्या झावळ्यांनी व रंगीत कागदांच्या पताकांनी सुशोभित केलेला असतो. रात्रीची जेवणे आटोपून गावातील लहानथोर मंडळी खेळे पाहण्यासाठी घरासमोरील अंगणात जमू लागतात. खेळे करणारी मंडळी संध्याकाळीच यजमानाच्या घरी आलेली असतात. त्यांची जेवणे आटोपल्यावर खेळे सजायला सुरुवात होते. त्यातील कलावंत स्वत:ची मुखसज्जा स्वत: करतात. सात्त्विक पात्रांची रंगभूषा लाल, काळ्या रंगांची असते. मंडपाच्या एका कोप-यातून खेळे कलावंत मृदुंग वाजवत येऊ लागले व अंगणात उभे राहिले, की त्या ठिकाणी आपोआप रंगमंच तयार होतो. ग्रीक थिएटरमधील human wall  सदृश अशी ही मानवी भिंत. विजय तेंडूलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातही त्या तंत्राचा वापर केला आहे.

 नमनाची सुरुवात करण्यापूर्वी दोन बाजूंला दोन मृदुंगवादक उभे असतात, मध्यभागी सूत्रधार असतो व त्याच्यामागून इतर मंडळी त्याच ओळींची आवर्तने करतात. उदाहरणार्थ,

देव पयला नमान, देव गणेस देवाला!
देव आगाशी मेघाला, देव पाताली शेषाला!

 नमन-खेळेमध्ये रामायण-महाभारतातील कथांचा समावेश असतो.अशा त-हेने बारा नमने होतात. त्यात देवादिकांबरोबर चंद्र, सूर्य, समुद्र, गावचा पाटील व प्रेक्षक यांनाही अभिवादन असते. बारा नमनांनंतर संखासूर प्रवेश करतो. त्याला ‘असूर’ म्हणून खेळ्यात म्हटले जात नाही. त्याचा पोशाख दशावतारातील संखासुरासारखा असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. तिने त्याचा संपूर्ण चेहरा झाकला जातो. दिसण्याकरता दोन छिद्रे ठेवलेली असतात. तो मूकपणे नृत्य करत असतो. कधीकधी त्याच्याबरोबर स्त्री वेशातील पुरुषही नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा संखासूर, मृदुंगवादक व कोळीण (स्त्रीवेशातील पुरुष) यांच्या, गाण्याचा व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो.

त्यानंतर गणपतीचे सोंग आणले जाते. जवळजवळ सर्व लोककलांतून सुरुवातीला गणपतीची आराधना केली जाते. सूत्रधार गणपतीच्या जन्माची कथा गीतांतून सांगत असतो. प्रेक्षकांसमोर पडदा धरला जातो (यक्षगानातही तो पात्राच्या आगमनापूर्वी धरला जातो.) सूत्रधाराच्या गणपती स्तवनाबरोबर पडद्आड मृदुंगाच्या ठेक्यावर मुखवटा दिसू लागतो. गाण्याच्या व मुदुंगाच्या ठेक्यावर मुखवटा डोलू लागतो. साधारण गाण्याचे बोल असे असतात –

देव नाचत आले गणपती हो
देव पायी पौलेर वाजती हो
देवा डोक्या मुगुट सोबती हो

 गणपतीच्या निर्गमनानंतर ‘नटवा’ हे लौकिक पात्र प्रवेश करते. जो नटतो तो नटवा. म्हणून नटवा या पात्राने माणसाचा मुखवटा घातलेला असतो. सूत्रधार त्याला अनेक प्रश्न विचारतो. त्यामध्ये तो कोठून आला असे विचारता, तो देशावरुन आल्याचे सांगतो. नटवा आणि सूत्रधार यांचे संवाद हे नटव्याने देशावरुन (घाटावरुन) कोकणात केलेल्या प्रवासावर आधारित असतात व त्यातून हास्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न असतो.

 खेळ्यातील ‘गवळण’ व तमाशातील ‘गवळण’ यांत थोडे साम्य आढळते. खेळ्यातील गवळणी म्हणजे स्त्रीवेश धारण केलेले पुरुष असतात. ते मथुरेच्या बाजाराला निघतात. बरोबर मावशी असते. पेंद्या गवळणींना अडवतो. गवळणी व पेंद्या यांच्या संवादांतून विनोदनिर्मिती होते. श्रीकृष्ण व गवळणी यांचे संवाद पद्यमय असतात. ती पात्रे त्‍यांची ओळख गीतांतून करून देतात. उदाहरणार्थ,

आम्ही गरीब गवळ्यांच्या नारी हो
देवा करु नका मस्करी हो

 त्यानंतर अंगसोंगे येतात. त्यामध्ये दोन-तीन कलावंत मिळून एखाद्या घटनेवर उत्स्फूर्त संवादांतून नाट्य उभे करतात व त्यातून करमणूक साधण्याचा प्रयत्न असतो. इथे पूर्वार्ध संपतो.

 उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथानकाचा समावेश असलेले एखादे आख्यान लावले जाते. त्यामध्ये रामायण-महाभारतातील कथांचा समावेश असतो. सूत्रधार गाण्यातून कथाभाग जोडत जातो व कथानक पुढे नेत असतो. देवादिकांची व प्राण्यांची सोंगेही लाकडी मुखवटे घालून आणली जातात. शेवटी रावणाचे सोंग येते. दहा तोंडांचा मुखवटा घालून रावण प्रेक्षकातूंन ढोलताशांच्या तालावर नाचत, आरोळ्या ठोकत प्रवेश करतो. राम-रावण युद्ध होते व रावण मारला जातो. रावणवधानंतर खेळ्याचा मुख्य सूत्रधार यजमानाकडून आरती घेतो. खेळे देवाची आरती म्हणतात व रात्रभर चाललेला हा खेळ उजाडता उजाडता समाप्त होतो. कथा सादर होताना त्यातील नाट्य पूरेपूर फुलवण्यासाठी गद्य-पद्य मिश्रित निवेदनशैलीचा वापर केला जातो. तालवाद्यांची (टाळ-मुदुंग) अखंड लय हे प्रयोगाचे वैशिष्ट्य असते.

सुरेश चव्‍हाण

Last Updated On - 23rd May 2016

लेखी अभिप्राय

khup chan lihil aahe.

अज्ञात24/08/2013

shimgyachi athvan yete

sanjay m jadhav30/01/2014

Khup chan

Ganesh Chogale27/07/2014

Hello. Hw R U ? I like your site n information. Hope you remember M.

Rashmi Mhambrey17/10/2015

Naman lokprakarakade durlaksh zalel aahe. Tyamule ha lokkalaprakar japnyasathi v vadhvanyasathi aapan prayatn karane garjeche aahe. Aapan varati dileli mahiti atyant surekh aahe. Khup chhan. Naman baddal mahiti milali. thanks.

Ganesh Chogale20/01/2016

आम्ही चिपळूण तालुक्यात कोंढे येथे साई भंडा-या निमित्त नमन स्पर्धा आयोजन करताना तुमच्या माहितीचा खुप उपयोग झाला.

संतोष प्रभाकर…26/03/2016

mazya gavi shimgyamade asach prakare ratri devacha tamashya ( khele ) asatat.
Manesh Ghubade
Dumdev, dapoli, Ratnagiri

manesh ghubade28/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.