एको देव केशव: - गुरुपाडवा


ही आगळीवेगळी कहाणी आहे एका दत्तमूर्तीची आणि तिच्या पूजेची. दत्ताची मूर्ती संत दासोपंतां नी निर्माण केलेली आहे. ती तांब्याची व अंदाजे दहा किलो वजनाची आहे. दासोपंतांना आपला समाधिकाल जवळ येत चालला असे जेव्हा जाणवले तेव्हा त्यांनी ती बातमी भक्तांना व शिष्यांना सांगितली. साहजिकच, शिष्यांना दु:ख झाले. त्यांनी ‘हा दु:खद प्रसंग पुढे ढकलावा’ म्हणून दासोपंतांकडे विनवणी केली. परंतु दासोपंतांनी ‘आज नाही तर उद्या तरी हा प्रसंग घडायचाच आहे. त्यासंबंधी विनाकारण चिंता किंवा दु:ख करण्यात काही अर्थ नाही’ असे समजावले. शेवटी, भक्तांनी ‘आपले सान्निध्य सतत जाणवत राहील अशी वस्तू आपल्या हाताने आम्हांस द्यावी आणि मग वियोग घडावा’ अशी मागणी केली.

आख्यायिका अशी आहे, की त्या सर्वांच्या मागणीनुसार दासोपंतानी नदीकाठातून शाडू आणून त्याची दत्तमूर्ती तयार केली. ती दत्तमूर्ती स्वहस्ते धान्याच्या कणगीत पुरून ठेवली आणि सर्वांना सांगितले, की ‘आजपासून एक महिन्याने ही मूर्ती पितळेची होईल. दुसर्‍या महिन्यात तांब्याची होईल, तिसर्‍या महिन्यात चांदीची व चवथ्या महिन्यात सोन्याची होईल आणि पाचव्या महिन्यात मूर्ती रत्नखचित होईल. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि पाच महिने संपल्यानंतर मूर्ती बाहेर काढा.’

संतकवी दासोपंत यांची अंबेजोगाई येथील समाधी दासोपंतांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर दुसरा महिना संपला आणि एका अतिजिज्ञासू भक्ताने कुणाला न समजता एकांतात कणगीत हात घालून मूर्ती उकरून पाहिली. ती खरोखरीच तांब्याची झाली होती. त्याने आपण मूर्ती पाहिली ही वार्ता गुप्त ठेवली. पाच महिने संपले आणि सर्वांनी समारंभाने मूर्ती बाहेर काढली. पाहतात, तो ती तांब्याची! आणि मग शोधाअंती खरा प्रकार समजला.

अंबेजोगाईला देव्हार्‍यात तांब्याची मूर्ती आहे. दासोपंतांना मिळालेल्या पादुका आणि दत्तमूर्ती यांचाच देव्हारा थोरल्या देवघरी पाहावयास मिळतो. दासोपंत हे सोळाव्या शतकात अंबेजोगाई येथे आले, ते अवधूत रूपातील दत्तमहाराजांनी सांगितले म्हणून. अवधूत हा दत्ताचाच अवतार. (सोळा अवतारांपैकी श्रीविश्वंभर अवधूत व श्री मायासहित अवधूत हे दोन अवतार आहेत) दासोपंतांचे कार्य, लिखाण, अनुष्ठान, सर्व काही त्याच ठिकाणी झाले. दासोपंतांची सतरावी पिढी सद्यकाली तो पूजापाठ तसाच करत आहे. दासोपंतांचे वडील -दामाजीपंत बीदरच्या बादशहाच्या दरबारात सुभेदार होते. दुष्काळ पडला तेव्हा दामाजीपंतांनी धान्याचे कोठार लोकांसाठी खुले केले. बादशाहने लहान दासोपंतांना ओलिस ठेवले. दामाजीपंतांनी जर पैसे जमा केले नाहीत तर त्यांना मुसलमान करणार असे तो म्हणाला. तेव्हाही दत्ताजी पाडेकर या नावाने (अवधूत रूपातील दत्ताने) दरबारात मोहरा भरल्या अशी गोष्ट अनुपमा गोस्वामी यांनी सांगितली.

छोट्या देवघरात दत्ताच्या सोळा अवतारातील मूर्ती आहेत दासोपंतांचा जन्म बीदर परगण्यातील नारायणपेठचे दिगंबरपंत देशपांडे आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या पोटी शके १४७३ भाद्रपद वद्य अष्टमीच्या मध्यरात्री झाला. दासोपंतांनी त्यांच्या चौसष्ट वर्षांच्या हयातीत सव्वा लाख श्लोकसंख्येचा गीतार्णव, नऊ हजार ओव्यांची गीतार्थचंद्रिका, सव्वा लाखांचा पदार्णव आणि इतरही पन्नास-पंचाहत्तराच्या जवळपास ग्रंथरचना केली. इतकेच नव्हे तर लळिते, भारूडे, आरत्या , स्तोत्रे, नामावल्या, पदे, संगीत शास्त्रानुसार भक्तिवेदांतयुक्त रचना या गोष्टी पाहिल्या म्हणजे छाती दडपून जाते.

थोरले देवघरधाकटे देवघरत्यांचे धाकटे देवघर हे वसतिस्थान. तो मोठा वाडा आहे. वाड्यातच दत्ताचे देऊळ आहे. त्याच्या आजुबाजूला गोस्वामी परिवारातील लोक राहतात. दासोपंतांचे वास्तव्य अंबेजोगाईस झाल्यापासून आणि तेथील प्रमुख नागरिकांचे गुरूपद त्यांच्याकडे आल्यापासून त्यांच्या घराला ‘देवघर’ असे म्हणण्याची प्रथा पडली.

तेथील थोरले व धाकटे देवघर या दोन नावांवरून कुणीही अशी कल्पना करील, की वडील मुलाच्या वंशाचे घर ‘थोरले देवघर’ असेल व धाकट्या मुलाच्या वंशाचे ‘धाकटे देवघर’ असेल. परंतु वस्तुस्थिती मात्र याच्या अगदी उलट, म्हणजे ‘धाकट्या मुलाच्या वंशा’चे घर हे ‘थोरले देवघर’ झाले व थोरल्या मुलाच्या वंशाचे घर हे ‘धाकटे देवघर’ झाले. याचे कारणही गंमतीशीर आहे. ज्यावेळी दासोपंतांच्या दोन मुलांत वाटण्या होण्याची वेळ आली, (त्यावेळी रीतीप्रमाणे वडील भावाने इस्टेटीचे दोन समान वाटे करायचे आणि धाकट्या भावाने त्यांपैकी एक स्वीकारून राहिलेला वडील भावाने घ्यायचा) तेव्हा थोरल्या भावाने दूरदर्शित्वाने प्रापंचिक महत्त्वाच्या वस्तू एका भागात ठेवल्या आणि ‘देव्हारा’ दुसर्‍या भागात ठेवला.

प्रत्येक अवतारातील दत्तजन्म हा वेगवेगळ्या महिन्यात होतो धाकट्या भावाने त्या दोहोंपैकी एक स्वीकारताना चाणाक्षपणा दाखवून प्रापंचिक वस्तूंपेक्षा ‘देव्हार्‍या’ला अधिक महत्त्व देऊन तो उचलला. अशा प्रकारे देव्हारा धाकट्या मुलाकडे गेल्याने शिष्यपरंपरेला ते घर अधिक जवळचे झाले आणि म्हणून ‘देव्हारा’ असलेले हे वस्तुत: धाकटे घर ‘थोरले; बनले आणि वडील भावाचे घर हे ‘धाकटे’ बनले.

दासोपंतांचे पहिले व प्रमुख शिष्य म्हणून ‘सीतोपंत देशपांडे’ ओळखले जातात. दासोपंतांचे वास्तव्य जोगाईला झाले. त्यांचे निर्वाणही तेथेच झाले. सीतोपंत देशपांडे यांनी शिष्यत्व पत्करल्यानंतर अंबेजोगाईची सर्व देशपांडे घराणी दासोपंतांची वंशपरंपरेने शिष्य बनली.

गोस्वामी परिवारातील कोणाच्याही घरी देव नसतात. देवळातील श्रीदत्त हाच सर्वांचा देव. देवाचे म्हणून जे काही करायचे, ते सर्व देवळातील श्रीदत्त यांच्यासाठी! त्यांच्याकडे ‘एको देव केशव:’ असे म्हणतात, म्हणजे श्रीदत्त सोडून इतर कुठल्याही देवाची आराधना केली जात नाही. म्हणजे गोस्वामी परिवाराला गौरी-गणपती, महादेव, दिवाळी , चैत्रगौर अशा कुठल्याही सणाचे महत्त्व नाही. सण साजरे करायचे झाले तर समोर दत्ताचाच फोटो ठेवला जातो.

मार्गशीर्ष महिन्यात अंबेजोगाईतील दत्तमंदिरात दत्तजयंती उत्साहात साजरी केली जाते मंदिरात दत्तजयंतीचा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात, थाटामाटात, पारंपरिक पद्धतीने पार पाडला जातो. त्यावेळी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ते मार्गशीर्ष पौर्णिमा असे दत्ताचे नवरात्र असते. षष्ठीसह सप्तमीला नवरात्र बसते. नसता सप्तमीला बसते. नवरात्रात रोज देवाला अभिषेक असतो. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी यंत्रपूजा असते. यंत्र दासोपंतांनी तयार केलेले आहे. त्यावर मंत्र लिहिलेले आहेत. यंत्रपूजा झाल्यावर, नवरात्र असेपर्यंत यंत्राला रोज हळदीकुंकू वाहिले जाते. नवरात्र म्हणून माळ वगैरे नसते. परंतु तेलाचा एक व तुपाचा एक असे दोन नंदादीप अखंड तेवत असतात. पौर्णिमेला नवरात्राची सांगता होते, तेव्हा होमहवन, पुरणावरणाचा नैवेद्य केला जातो.

नवरात्रात देवघर वाड्यातील सर्वांचा धान्यफराळ असतो. घरटी दोघांनी पूर्ण उपवास करायचा. नवरात्रात रोज सवाष्ण व ब्राम्हण जेवायला असतात. त्यांनाही धान्यफराळ वाढला जातो. आणखी एक सवाष्ण, ब्राम्हण अशी जोडी असते. त्यांना उपवासाची जोडी म्हणून उपवासाचे पदार्थ दिले जातात. म्हणजे नवरात्रात घरात खरकटे काही शिजवले जात नाही. दत्ताच्या नवरात्राचे वैशिष्ट्य म्हणजे, रोज पूजा झाल्यावर देवाला उठवतात, बाहेर आणून मखरात बसवतात. तिथेच मुख्य आरती केली जाते. आरतीच्या बाबतीतला वेगळेपणा म्हणजे आधी मंत्रपुष्पांजली व त्यानंतर आरती म्हटली जाते. असे नेहमीच केले जाते. त्यानंतर भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम होतात. ते दुपारी तीन-चार वाजेपर्यंत चालू असतात.

नवरात्रात एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत देवाची पालखी तून मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीचा मार्ग ठरलेला आहे. मुख्य मंदिराच्या बाजूला सोप्याचा वाडा आहे. मुख्य मंदिरापासून निघून, सोप्याच्या वाड्यात जायचे. तिथे देवाची पूजा होते, तिथून देवाला परत मंदिरात आणले जाते. त्याला एक मिरवणूक असे म्हणतात. एकादशीला एक, द्वादशीला दोन, त्रयोदशीला दोन, चतुर्दशीला एक व पौर्णिमेला एक अशा सात मिरवणुका निघतात. मिरवणुकीत सर्वजण दत्ताची पदे म्हणत असतात.

दत्ताच्या अवतारांपैकी दोन अवतारांचा जन्म नवरात्रात होतो दत्ताचे सोळा अवतार आहेत. त्यांपैकी दोन अवतारांचा जन्म नवरात्रात असतो. एक चतुर्दशीला पहाटेच अगदी अंधारात साजरा केला जातो. दुसरा पौर्णिमेस सकाळी आठ वाजता केला जातो. जन्माच्या वेळी देवावर फुले, गुलाल उडवले जातात व तोंडाने ‘आंनदे दत्तात्रेय देव देव, दासोपंत स्वामी महाराज की जय’ असे म्हणतात.

मार्गशीर्ष पौर्णिमेला नवरात्राची सांगता झाली, की दुसर्‍या दिवशी ‘गुरुपाडवा’ साजरा केला जातो, तो गुरुप्रसाद किंवा महाप्रसाद. सर्व परिवार, तसेच उपस्थित शिष्यगण यांना जेवण असते. त्या दिवशी ‘लळित’ करतात. लळित भारुडाप्रमाणे असते. लळिते दासोपंतांनीच रचलेली आहेत. त्यामधून एकनाथी भारुडामध्ये समाजप्रबोधन अभिप्रेत आहे. एकनाथांनी देवाशी जवळीक साधण्यासाठी सखी, मैत्रीण, प्रेयसी म्हणून देवावर प्रेम केलेले आहे. संत दासोपंतांनी त्यांच्या लळितामध्ये मधुरा भक्तीवर जोर दिला आहे. त्यांची लळिते अध्यात्मावर आधारित आहेत. त्यातून देवाला आळवणे, जवळ करणे गृहीत आहे.

गुरुपाडव्याच्या नंतरच्या दिवशी ‘भिवाळं’ असते अंबेजोगाईतच भिवाळ तळे आहे, तिथे पूर्वजांच्या समाधी आहेत. तिथे गोस्वामी परिवार जातो. समाधींचे दर्शन घेताना दही-पोह्याचा नैवेद्य दाखवला जातो.

दत्ताचे वैशाखीचे नवरात्रही असते. तेही वैशाख महिन्यात सप्तमीला बसते. ते सात दिवस असते. पण ते मार्गशीर्ष महिन्यातील नवरात्रापेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरे होते. त्यावेळी रोज देवासमोर फक्त दिवा लावला जातो. देवाला भात, भाजी, पोळी, आमटी असा साध्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवला जातो. सवाष्ण, ब्राम्हण जेवायला नसतात. मात्र नवरात्राच्या शेवटच्या दिवशी, कमीत कमी पाच ब्राम्हणांची पूजा केली जाते. ती वसंतपूजा असते. डाळ व पन्हे यांचा नैवेद्य असतो. त्यानंतर कैरी खायला सुरुवात होते. सोवळ्यात कैरीचे लोणचे, टक्कूही केला जातो. ते पदार्थही देवाला प्रथम दाखवून मगच खायला सुरुवात होते. नवरात्राचे सात दिवस घरातील एक जणाचा धान्यफराळ असतो.

दत्ताचे इतर अवतार दत्ताच्या सोळा अवतारांपैकी, प्रत्येक अवतारातील दत्तजन्म हा वेगवेगळ्या महिन्यात आहे. त्यामुळे गोस्वामी परिवारात त्या सोळा जयंती साजर्‍या केल्या जातात. त्यावेळी कुळधर्म, कुलाचार असतो. जयंती पुढीलप्रमाणे -

१.चैत्र शुद्ध पौर्णिमा, २.वैशाख शुद्ध चतुर्दशी, ३.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ४.आषाढ शुद्ध पौर्णिमा, ५.श्रावण शुद्ध अष्टमी, ६.भाद्रपद शुद्ध चतुर्दशी, ७.अश्विन शुद्ध पौर्णिमा, ८.मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी, ९.मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, १०.पौष शुद्ध पौर्णिमा, ११.माघ शुद्ध पौर्णिमा, १२.फाल्गुन शुद्ध दशमी. उरलेल्या चार जयंती ह्या कार्तिक महिन्यात सलग चार दिवस साजर्‍या केल्या जातात. त्याला देवदिवाळी असे म्हणतात.

कार्तिक शुद्ध द्वादशीला दत्ताला तिळाच्या चिक्कीचा नैवेद्य व आवळ्याची माळ घातली जाते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी नारळाचा नैवेद्य- तिसर्‍या दिवशी केळ्याचा नैवेद्य व चौथ्या दिवशी ऊसाचा नैवेद्य. त्या दिवशी दत्ताला ऊसाच्या रसाने अभिषेक केला जातो.

पूर्वापार चालत आलेल्या सर्व रुढी पाळल्या जातात. नोकरीधंद्यामुळे परगावी असलेली पुढची पिढी, मार्गशीर्ष महिन्यातील, दत्तजयंतीच्या नवरात्रानिमित्त एकत्र जमते -ठरवून. सर्व जण त्या दिवसांत रजा घेऊन येतात. नवीन लग्न झालेल्यांचा दिवाळसण दिवाळीत साजरा न करता, मार्गशीर्षाच्या उत्सवात साजरा केला जातो.

अंबेजोगाईचा गोस्वामी परिवार म्हणजे माझे यजमान पुरुषोत्तम कर्‍हाडे यांचे आजोळ- आईचे माहेरघर. त्यांच्या वाड्याला छोटे देवघर म्हणतात.  

दत्ताचे सोळा अवतार:‘देतो तो दत्त’ व ‘संकटात हाक मारताक्षणी दत्त म्हणून उभा!’ अशी दत्ताची महती आहे. दत्ताचे सोळा अवतार आहेत:

१. श्री योगीराज - हिमालयात तपाचरण करणार्‍या अत्रींनी दर्शन देण्यासाठी एकमुखी व चतुर्भुज रूपात, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला 

२. श्री अत्रीवरद - ऋक्ष पर्वतावर तप करणार्‍या अत्रींना, आशीर्वाद देण्यासाठी, कार्तिक वद्य प्रतिपदेला 

३. श्री दत्त - अत्रींसमोर, बालरूपात प्रगट झाले, कार्तिक वद्य द्वितीयेला

४. श्री कालाग्निशमन - कठोर तपाचरणामुळे अत्रींच्या शरीरात दाह निर्माण झाला, तो शमन करण्यासाठी, मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला.

५. श्री योगीराजनवल्लभ - कालाग्निशमनाच्या दर्शनास अनेक देव आले, तेव्हा, मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला

६. श्री लीलाविश्वंभर - दुष्काळाने पीडित झालेल्या लोकांना अन्न देण्यासाठी, पौष शुद्ध पौर्णिमेला

७. श्री सिद्धराज - हिमालयातील योग्यांचा अहंकार नाहीसा करण्यासाठी, माद्य शुद्ध पौर्णिमेला

८. श्री ज्ञानसागर - सिद्धपुरुषांना अद्वैतज्ञान देण्यासाठी, फाल्गुन शुद्ध दशमीला

९. श्री विश्वंभर अवधूत - साधकांना बोध देण्यासाठी, चैत्र शुद्ध पौर्णिमेला

१०. श्री मायामुक्त अवधूत - भक्तांच्या अंत:करणात प्रेमभाव दृढ होण्यासाठी, वैशाख शुद्ध चतुर्दशीला

११. श्री आदिगुरू - मदालसेचा पुत्र अलवी याला योगाचा उपदेश करण्यासाठी, आषाढ शुद्ध पौर्णिमेला

१२. श्री शिवरूप - श्रावण शुद्ध अष्टमीला

१३. श्री देवदेवेश्वर - भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला

१४. श्री दिगंबर - अश्विन शुद्ध पौर्णिमेला

१५. श्री मायासहित अवधूत - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला

१६. श्री कृष्ण शाम कमलनयन - कार्तिक शुद्ध द्वादशीला

देवघर - अंबेजोगाईला धाकट्या देवघरी दत्तजयंतीचा उत्सव साजरा होतो. धाकट्या देवघराच्या शेजारीच थोरले देवघर आहे. दोन्ही देवघरी गोस्वामी परिवार राहतो. दोन्ही देवघरी दत्तजयंती उत्सव साजरा होतो. परंतु दासोपंत हे धाकट्या देवघरी राहात होते, त्यामुळे धाकट्या देवघरच्या दत्तजयंतीला जास्त महत्त्व आहे.

धाकट्या देवघरी राहणारा गोस्वामी परिवार हा खूप मोठा होता व आहेही. त्यामुळे धाकट्या देवघरी गोस्वामी कुटुंबाची पंचवीस ते तीस घरे आहेत. (मात्र नवीन पिढी नोकरीधंद्यानिमित्त देवघरी राहात नाही) धाकट्या देवघराची जागा अंदाजे एक ते दोन एकर एवढी आहे. तेवढीच जागा थोरल्या देवघराचीही आहे. पण थोरल्या देवघरी, गोस्वामी परिवार खूपच लहान आहे. धाकट्या देवघरातील प्रत्येक गोस्वामी परिवाराची घरे, अंदाजे चार खोल्यांची अशी आहेत.

थोरल्या देवघराच्या दासोपंतांच्या गादीवर सध्या श्री समेरस्वामी दासोपंतस्वामी गोस्वामी आहेत. (आपल्याकडे नावापुढे आदरार्थी ‘राव’ लावतात. त्याप्रमाणे देवघरी सर्वांच्या नावापुढे ‘स्वामी’ लावण्याची प्रथा आहे.) धाकट्या देवघरी दासोपंतांच्या गादीवर श्री ओंकारस्वामी सुहासस्वामी गोस्वामी आहेत.

धाकट्या देवघरी अनेक वाडे आहेत, दत्ताचे मंदिर आहे. सोप्याचा वाडा आहे (तो स्वतंत्र वाडा आहे, तिथे कोणी राहत नाही.) मिरवणुकीनंतर देवांना तिथे नेले जातात, तिथेच कीर्तन-प्रवचन कौरे होते. लादन्या आहेत, गुनीचा वाडा आहे तिथे उत्सवात स्वयंपाक केला जातो. एक आड (विहीर) आहे, त्याचे नाव ‘कमलनयन’ आहे. आडाचीसुद्धा उत्सवाच्या वेळी पूजा केली जाते. धाकट्या देवघरी काशीहूनही ब्राह्मण दर्शनासाठी येत असत. त्यांना जेवणात ‘चिंचेचे सार’ लागायचे. म्हणून त्यांना ‘साराचे ब्राह्मण’ असे म्हटले जाई.

यंत्रे  - दासोपंतांनी दोन यंत्रे तयार केली आहेत. त्यांपैकी एकाची स्थापना मार्गशीर्ष महिन्यातील नवरात्रातील दुसर्‍या दिवशी होते व त्या दिवशी पूजा होते व नंतर रोज हळदीकुंकू वाहिले जाते. दुसर्‍या यंत्राला गुरुयंत्र म्हणतात. त्याची पूजा गुरुपूजेच्या दिवशी म्हणजे गुरुपाडव्याला केली जाते. यंत्र कमळाच्या आकाराचे, तांब्याचे बनवलेले आहे. त्यावर फक्त एक अक्षर सोन्याने लिहिलेले आहे. बाकीची अक्षरे तांब्यातच कोरलेली आहेत.

उपवासाची जोडी - नवरात्रात एक सवाष्ण व एक ब्राह्मण यांना बोलावले जाते. उपवासाला निर्‍हाळ असे म्हणतात. त्यांना निर्‍हाळाचे म्हणून साबुदाणा खिचडी, वरी तांदूळ, दाण्याची आमटी, फळे वगैरे दिले जाते. (जिरे उपवासाला चालत नाही. त्याचप्रमाणे काकडी, लाल भोपळा, सुरण, कोथिंबीर वगैरेही चालत नाही.)

अबदागिरी छत्री नवरात्रातील मिरवणुका - नवरात्रातील मिरवणुका काढण्याच्या अगोदर, देव बाहेर येण्यापूर्वी, दासोपंतांच्या गादीवर सध्या जे बसलेले आहेत, त्या गुरूंना, त्यांच्या घरापासून मंदिरापर्यंत मानाने मिरवत आणले जाते, शिष्यगण व परिवारातील मंडळी त्यासाठी जातात. गुरूच्या डोक्यावर छत्री धरली जाते. तिला अबदागिरी छत्री म्हणतात. त्याचप्रमाणे समोर भालदार, चोपदार म्हणून दोघेजण असतात. त्यांच्या हातात सोन्याचांदीच्या (मुलामा दिलेल्या) काठ्या असतात. गुरूंच्या घरापासून ते देवाच्या ओसरीपर्यंत त्यांना मिरवत आणले जाते. – मान म्हणून (गुरूंची तिथे पूजा होत नाही) व नंतर देव बाहेर आणून मिरवणूक काढली जाते.

गुरुपाडव्याच्या दिवशीचे लळित - गुरुपाडव्याला गुरूपूजा असते. तेव्हा गुरूंच्या गळ्यात फुलांचे हार घालतात- शिष्यगण व इतरही माणसे. मग त्यानंतर लळित होते. पिंगा, मुंडा, फुगडी, टिपरी हे लळिताचे काही प्रकार आहेत. लळित झाल्यावर मग गुरूंच्या गळ्यातील फुलांचे हार हा प्रसाद म्हणून शिष्यांना दिला जातो; इतरही लोकांना जातो.  

लळित झाल्यानंतर, देवाची दृष्ट काढली जाते. त्‍यावेळी महिलावर्गाकडून -
 

कोणाची झाली दृष्ट, माझ्या गं श्री गुरुदत्ताl
लिंब लोण उतरिते, अनसूया माता ll

असे गाणे म्‍हटले जाते. त्यानंतर देवाला आत नेऊन झोपवले जाते.

दासोपंतांची ‘पासोडी- पासोडीची रुंदी चार फूट लांब आणि लांबी चाळीस फूट आहे. संपूर्ण कापडावर मजकूर लिहिलेला आहे. मजकुराच्या चारही बाजूंस एक इंच रुंद अशी चौकट आखण्यात आली असून आत बेलबुट्टी काढलेली आहे. संपूर्ण पासोडीभर ही चौकट आखलेली आहे. कापडाचा मूळ रंग पांढरा असेल, परंतु चारशे वर्षांच्या दीर्घकालाने तो धुरकट आणि मळकट असा झालेला आहे.

पद्मा कर्‍हाडे,
९२२३२६२०२९
padmakarhade@rediffmail.com

लेखी अभिप्राय

Thnax to think maharashtra and team.

onkar goswami10/09/2014

nice creativity

atharv goswami02/12/2014

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.