कडव्या वालाची कथा आणि पोपटी


मोड आलेले कडवे वाल वालाच्या पीकाला जमीन काळी कसदार व पोयदा प्रकारची, म्हणजे तिच्यात पाणी साचणार नाही किंवा पाण्याचा निचरा त्वरित होईल अशा त-हेची लागते. मात्र जमिनीत थोडा ओलावा असावा लागतो. साधारणत: वालपेरणीचा काळ हा गणपती विसर्जन झाले, की पाऊस कमी झाल्यावर असतो. वाल भाताच्या उभ्या पीकात हाताने टाकतात. भाताच्या पीकाचा उबदारपणा वालाच्या पीकास पोषक ठरतो. दुसरा प्रकार –वालाची पेरणी साधारणत: भाताच्या पीकाची कापणी झाली, की मग जमीन नांगरून करतात.

 फोकण पद्धत म्हणजे वाल हाताने शेतात फेकणे व टोकत पद्धत किंवा चेपणीचा वाल म्हणजे काठीने वाल जमिनीत चेपणे. या प्रकारात जमिनीत काठीने भोके पाडून त्यात एका वेळेस दोन वाल चेपून म्हणजेच दाबून लावले जातात.

 वाल फुलायचा तसेच कोवळ्या व तयार शेंगा येण्याचा हंगाम (मौसम) हा संक्रांतीच्या जवळपास असतो. संक्रांतीच्या पूजेत वालाच्या व बांधावरच्या घेवड्याच्या शेंगा ठेवतात. त्या दोन्ही शेंगांची (दाण्याची) उसळ संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी करतात.

 वालाच्या स्वतंत्र पीकात कोथिंबीर , मुळा , मोहरी वगैरे पेरतात. वालाच्या पीकातील कोथिंबीरीला येणारा छान वास हा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे ती कोथिंबीर विशेष प्रसिद्ध आहे.

वालाच्या शेंगांपासून पोपटी तयार केली जाते  वालाच्या शेंगांची पोपटी ही पेण-रायगड भागात प्रसिद्ध आहे. देशावरच्या हुरडा पार्टीप्रमाणे ती उत्तर कोकणातील लज्जत. पोपटी तयार करताना वालाच्या ओल्या शेंगा काढून, त्या धुऊन घेतात. पाणी निथळू दिले जाते. बटाटे-कांदे घेऊन त्यांना उभ्या-आडव्या चिरा देऊन त्यात तिखट, मीठ, मसाला (गोडा) भरला जातो. जुने मडके (माठ) घेऊन त्याच्‍या तळाशी आधी भांबुर्डीचा पाला आणि मग थोड्या शेंगा पसरल्‍या जातात. एक थर झाला, की थोडे मीठ व काही बटाटे, कांदे त्या थरावर पसरतात. असे दोन थर लावले जातात. शेवटी पुन्‍हा भांबुर्डीचा पाला पसरला जातो. या पाल्‍याच्‍या गंधामुळे पोपटीची लज्जत वाढते. सोबत, थोड्या ओव्‍याचीही पखरण केली जाते. कारण वाल हा वातवर्धक असतो. त्यात सोबतीला कांदे बटाटे! मडके भरले, की त्याचे तोंड झाकून त्यावर उभ्या-आडव्या दोन बारीक शिपट्या (काठ्या) नीट खोवून ठेवतात. मग तीन विटांवर ते मडके उलटे ठेवून सर्व बाजूंनी बारीक फाटी थोडी व पालापाचोळा मडक्याच्या वरपर्यंत लावला जातो. मग जाळ पेटवला जातो. अर्ध्या तासाने परत त्यावर पालापाचोळा रचतात. मडके लालबुंद होते. जाळ विझला, की पोपटी तयार झाली आहे याची चाचणी घेऊन मडके खाली उतरवले जाते. त्यावेळी शेंगांचा घमघमाट सुटलेला असतो. मग समजावे, की पोपटी तयार झाली! शेंगांबरोबर ओल्या खोब-याचे तुकडे चवीला घेऊन मस्त पोपटी खावी. पोपटी म्हणजे वालाचे शिजवलेले खमंग ओले दाणेच ते! जमिनीत खड्डा खणून काही ठिकाणी पोपटीची भट्टी लावली जाते. डहाणू परिसरातील गावांमध्‍ये पोपटीचा उल्‍लेख 'गड' असा केला जातो.

पोपटी तयार करताना मडक्याच्या तळाशी ठेवलेला भांबुर्डीचा पालामडके उपडे करून भाजले जातेवाफलून तयार झालेली पोपटी वाल काढण्याचा हंगाम महाशिवरात्रीच्या नंतर असतो. वालाचे टहाळे म्हणजेच वालाचे पूर्ण तयार झालेले रोप. ते उपटून शेतात तयार केलेल्या खळ्यावर (वालाचे टहाळे झोडण्याची जागा) काठीने झोडून, शेंगांतून वाल बाहेर काढला जातो. वाल झोडण्याची वेळ दुपारचे २ ते ४ पर्यंत चांगली समजली जाते. त्या दरम्यान ऊन भरपूर व कडक असल्याने शेंगा तापलेल्या असतात. त्‍यामुळे शेंगांतून वाल (दाणे) बाहेर काढण्यास सोपे जाते.

कडवे वाल टिकवण्यासाठी त्‍यांना नऊ ऊन्हे देण्याची गरज असते. नंतर त्यांना तांबड माती लावून ठेवतात, त्यासाठी वाल रांजणात किंवा डब्यात भरून ठेवणे उपयुक्त ठरते. काहीजण त्यावर बिब्बा ठेवून, मग कागदाने बंद करुन झाकण लावतात. कीड लागू नये म्हणून हे नियोजन केले जाते. वाल निवडून ठेवला जातो. निवडताना त्यातील चहाड, मुकण्या बाहेर काढल्या जातात. चहाड म्हणजे कठीण व लगेच न शिजणारा वाल. मुकण्या म्हणजे बारीक वाल. त्याची डाळ करतात. वालाची डाळ घरटीवर केली जाते. घरटी म्हणजे मोठे जाते . जाते फिरवताना बायका (स्त्रिया) ओव्या म्हणतात.

वालाचे निरनिराळे पदार्थ, भाज्या केल्या जातात. बिरडे किंवा डाळिंब्या. वालाचे दाणे भिजत टाकून, सुके किंवा ओले, दोन्ही प्रकारच्या डाळिंब्या किंवा उसळ केली जाते. त्यावरची साल काढून टाकली जाते. वालाचे नाक (मोड) बाहेर आले, की मग त्याच्या डाळिंब्या करतात. वाल भाजून त्यांना उकडतात व त्यावरचे पाणी काढून, त्यांत थोडे ताक मिसळून जिर्‍याची फोडणी देऊन त्यात तिखट, मीठ टाकतात. त्याला वालाचे कढण म्हणतात.

तापवलेले वाल घरटीवर भरडतात व मग ती डाळ निवडून चाळतात. तेव्हा बारीक भरडा निघतो. त्याचीही उसळ किंवा वरण केले जाते. भरड्याला काही जण कळणा म्हणतात. कळण्याच्या वड्याही केल्या जातात. त्यासाठी तांदूळ व भरडा, तसेच मुगाची किंवा चण्याची डाळ घेतात. हे सर्व भाजून मग त्यात तिखट, मीठ, आले वगैरे मिसळून त्याच्या वड्या बनवतात. वालाची डाळ किंवा वाल भारंगीच्या भाजीत, कुड्याच्या शेंगात, फणसाच्या भाजीत टाकून भाजी करतात.

खोपोलीपासून पुढे घाटावर व इतरत्र जो वाल होतो तो थोडा गोड असतो. उग्र किंवा तुरट नसतो. म्हणून नागोठणा–मेंढ्याकडच्या वालास कडवा वाल म्हणतात. ह्या वालाची चव वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणूनच रोहा तालुक्यातील वालाचा खप (विक्री) जास्त आहे. त्‍या वालांची किंमत (दर) काही वेळा जास्त असते. सध्या गावाकडे तो दीडशे रुपये किलो अशा दराने मिळतो. मुंबईत तो किलोला चारशे रुपयेपर्यंत असतो.

शेतातून वालपीक काढल्यावर त्याचे बी (वाल) शेतात पडते. त्यापासूनही पावसाळ्याच्या सुरूवातीस मोरव येऊन वालाची रोपे दिसतात, त्यालाही बिरडे असे म्हणतात. त्याचाही भाजीसाठी उपयोग होतो.

(कडव्‍या वालाचे छायाचित्र. सौजन्‍य - दिनेश शिंदे)

महाजालावरील इतर दुवे –

कडव्‍या वालाच्‍या पाककृती

नारायण पराडकर,
मु. पो. मेढे, ता. रोहा,
जिल्‍हा रायगड,
भ्रमणध्‍वनी – ९२७२६७७९१६
दूरध्‍वनी ०२१९ -४२५८०८६
इमेल -nrparadkar9@gmai.com

लेखी अभिप्राय

Chan mahiti..lahanpanche divas pathvale..popatimadhye..rsyali.vange..batata..pandhre kande shevgyachya shenga pan takatat.

sandhya joshi30/11/2015

मी रोहा येथे नोकरीला असताना पोपटीची मजा घेतली आहे. फारच छान!

shrikantpetkar30/03/2016

Mast lekh .aavdala

Sand13/08/2018

माहिती सुंदरच आहे. आपणाकडे वाल विक्रीस आसतात का?आसेल तर कृपया सांगणे Mob.no 9822065973 Pune

आशुतोष क. पत्की18/05/2020

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.