हेमाडपंती स्थापत्यशैली


त्र्यंबकेश्वर येथील मंदिरही हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे चुन्याच्या किंवा कसल्याही पदार्थाच्या साहाय्यावाचून केवळ एका ठरावीक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा पाडून हे बांधकाम केले जात असे. मंदिरांच्या शिखरांची घडण हे ह्यांचे मुख्य वैशिष्ट्य. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच प्रकारची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक बनते. (आमलक: आवळा). प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या ह्या इमारतींच्या पायांची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर बसवल्यावर ही सर्व लहान लहान शिखरे रचूनच मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते तळापासून कळसापर्यंत केलेल्या भित्तिकोनांच्या रेषांमुळे भासणारा बांधणीचा उभटपणा वेगवेगळ्या थरांच्या अडवटींनी कमी झाल्यासारखा वाटतो.

कोणतीही इमारत बांधायची तर तिचे दगड किंवा विटा एकमेकांस घट्ट चिकटून राहाव्यात म्हणून माती, चुना, सिमेंट इत्यादींपैकी काही वापरावे लागते. पण हेमाडपंती देवळे ह्याला अपवाद आहेत. ह्या देवालयांचे चिरे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून ते एकमेकांत इतक्या कुशलतेने बसवलेले असतात की त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुस-याचा आधार मिळून छत बिनधोक राहू शकते. अशी मंदिरे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात व चौदाव्या शतकात बांधली गेली. हेमाद्री किंवा हेमाडपंत ह्याने ह्या पद्धतीचा पुरस्कार केला, म्हणून त्याच्या नावाने ही बांधकाम शैली ओळखली जाते.

अमृतेश्वर मंदिराची भिंत आणि अलंकृत खांब हेमाडपंती देवालयांची रचना सामान्यत: अशी असते :

गाभारा चौकोनी व सभांडपाला अनेक अलंकृत खांब. खांबांवर व छत्तावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली असतात. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला आधार दिलेला असतो. दर्शनी भाग भोजमंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात असते. देवालये पूर्वाभिमुख असतात. अशा देवालयांवर प्राचीन शिलालेख आढळतात.

कोपेश्वर मंदिरात काही ठिकाणी हेमाडपंथी शैलीही दिसून येते. इसवी सन १००० ते १३५० हा यादवांच्या कारकिर्दीचा वैभवशाली कालखंड. यादवांचा मुख्य प्रधान म्हणजे, ‘हेमाडपंत’. ते एक विद्वान वास्तुविशारद होते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे जंगलात, पठारावर किंवा कुठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करून, इतर कोणताही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करून मंदिरे बांधण्याची कला त्या वास्तुविशारदाने प्रचलित केली.

चुना न वापरता दगडावर दगड विशिष्ट प्रकारे ठेवून मंदिर बांधण्याची पद्धत हेमाडपंतांपूर्वीही अस्तित्वात होती. तथापि, ह्या पद्धतीचे श्रेय हेमाडपंताला मिळाले, ह्याचे कारण त्याने अशा पद्धतीची विपुल मंदिरे बांधली हे असावे. त्याच्या काळात महानुभाव पंथांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. हेमाडपंत हा सनातनधर्माचा कट्टर पुरस्कर्ता. त्यामुळे अशी देवळे मोठ्या प्रमाणात बांधून त्याने महानुभाव पंथाला विरोध प्रदर्शित केला.

हेमाडपंती देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात. पण ह्याला एक अपवाद आहे. नाशिकजवळ घोडांबे ह्या गावी असलेल्या विष्णुमंदिराचा. गावाच्या मध्यावर मोकळ्या जागेत एकाला एक लागून शिवमंदिर व विष्णुमंदिर आहे. विष्णुमंदिरात स्त्रियांची शिल्पे असली तरी ती शृंगारिक नाहीत. ती आहेत हाती शस्त्रे घेऊन लढायला सज्ज असलेल्या स्त्रियांची! काही वीरांगना घोड्यांवर, उंटांवर तर काही हत्तींवर आरूढ झालेल्या आहेत.

संदर्भ: १. भारतीय संस्कृति कोश, खंड चौथा, पृ. ४७९
२. तत्रैव, खंड दहावा, पृ. ४०२
३. रानडे फिरोज, इमारत, मौज प्रकाशन, मुंबई, १० फेब्रुवारी २००९, पृ. ३०-३६

- सुरेश वाघे
दूरध्वनी: (022) 28752675

लेखी अभिप्राय

माहिति

पांडुरंग काशिनाथ कडव05/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.