अलौकिक क्षण!


एक दिवसीय क्रिकेट सामन्यांत अनेकांनी दीड शतकाच्या पलीकडे मजल मारली. पण गेल्या एकोणचाळीस वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतकाच्या पायरीला कोणाला शिवता आलेले नाही. सचिनने ग्वाल्हेरला 24 फेब्रुवारीला 147 चेंडूंत दोनशे धावांचा वर्षाव करताना प्रबळ इच्छाशक्तीचा प्रत्यय आणून दिला. सचिन तेंडुलकरने फलंदाजीला वैभवाच्या शिखरावर नेताना अनेक विक्रम केले. ते पाहताना क्रिकेट रसिकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. विक्रमवीर मनस्वी असतात. जे अशक्य आहे असा सर्वसाधारण समज असतो त्याच्यावरच ते झेप घेतात.

शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत दहा सेकंदांचा अडसर दूर करण्याची ईर्षा महान धावपटू बाळगत असे. 1964 पासून रॉबर्ट हेस, जिमी हाइन्स, कार्ल लुइस ह्यांनी हे शिवधनुष्य पेलले. हे सर्वसाधारण मानवी क्षमतेच्या पलीकडचे आहे. उसेन बोल्ट ह्याने तर वादळी वा-याच्या वेगाला आव्हान दिले. त्याने म्हटले, ''हा आश्चर्यकारक विक्रम करून सचिनने आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वीस वर्षे टिकणे हीच मुळी उत्तुंग कामगिरी आहे!''

सचिनने आंतरराष्ट्रीय स्तरावर अलौकिक कामगिरी करणा-या खेळाडूंच्या पंक्तीत केव्हाच स्थान मिळवले आहे! लान्स आर्मस्ट्राँग ह्याने फ्रान्समधील जगप्रसिध्द शर्यत सलग सात वेळा जिंकली. मायकेल शुमाकरने एफ वन मोटार शर्यत पाच वेळा जिंकली. पिट सॅम्प्रसचा चौदा ग्रँड स्लॅम विजयाचा पराक्रम पुन्हा होणे नाही अशी धारणा होती; रॉजर फेडररने ती फोल ठरवली! त्याने आत्तापर्यंत सोळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. खेळाडूच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा मापदंड कसा ठरवायचा?

ग्वाल्हेर येथील दक्षिण आफ्रिकेविरुध्द एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला तेव्हा त्या दिवशी काही अलौकिक घडणार आहे ह्याची सुतराम कल्पना नव्हती. मात्र तेंडुलकरने शतक पूर्ण केले तेव्हा बावीस षटके बाकी होती. पहिल्या शतकासाठी नव्वद चेंडूंचा सामना करणा-या सचिनने दुस-या शतकाचा उंबरठा फक्त सत्तावन्न चेंडूंत ओलांडला. त्यावेळी आक्रमक फलंदाजीचा झंझावात पाहायला मिळाला.

दोनशे धावांच्या खेळीत सचिनने पंचवीस चौकार आणि तीन षटकार यांची आतषबाजी केली. त्याचे अप्रतिम कव्हर ड्राइव्ह्ज, नाजूक लेटकट्स, थरारक हूक्स, सनसनाटी पूल्स, मनगटांची लवचीकता दाखवणारे फ्लिक्स, शक्तिशाली स्लॅश अशा अनेक फटक्यांनी स्टेडियमवरील आणि चित्रवाणी संचांसमोरील प्रेक्षकांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही.

ह्या द्विशतकापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या अनेक दैदिप्यमान खेळी पाहायची संधी रसिकांना मिळाली आहे. त्यांपैकी शारजा येथील एप्रिल 1998 मध्ये कोका कोला कप स्पर्धा जिंकताना ऑस्ट्रेलियाविरूध्द लागोपाठच्या सामन्यांत फटकावलेल्या दोन शतकांचा विसर पडणे अशक्य आहे. त्यांपैकी पहिल्या सामन्यात सचिनची फलंदाजी सुरू असताना वाळूचे वादळ आल्यावर काही काळ खेळ थांबला होता. सचिन पुन्हा खेळ सुरू होण्याची प्रतीक्षा करताना ड्रेसिंग रूममध्ये न जाता सीमारेषेनजिक खुर्चीत बसला. तो मनाने आणि शरीराने मैदानातच उपस्थित होता! पुन्हा खेळ सुरू झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर सचिन नावाचे वादळ घोंगावले. सचिनचा रुद्रावतार पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सचिनने शेन वॉर्नसह सर्व गोलंदाजांना झोडपले आणि क्षेत्ररक्षकांना सळो की पळो केले.

न्यूझीलंडविरुध्द हैदराबाद येथे नोव्हेंबर 1999 मध्ये दीडशे चेंडूंत 186 धावा करताना सचिनने शक्तीचा वापर न करता तंत्र आणि कौशल्य यांचे दर्शन घडवले. वीस चौकार आणि तीन षटकार मारताना त्याने बिलकूल जोखीम पत्करली नाही; तशीच नजाकतयुक्त खेळी त्याने मार्च 2004 मध्ये लाहोर येथे पाकिस्तानविरुध्द केली होती.

काही पराक्रम अचंबित करणारे असतात. मात्र ते पराक्रम व्यर्थ ठरतात. कारण त्यावर विजयाचा मुकुट विराजमान होत नाही. इंडियन प्रिमियर लिगच्या (आयपीएल) तिस-या स्पर्धेत राजस्थान रॉयलच्या युसुफ पठाणने सदुतीस चेंडूंत शतक झळकावले. एका चेंडूवर सरासरी 2.70 धावा ठोकणा-या पठाणने आयपीएल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला; मात्र त्याचा हा आनंद टिकाऊ ठरला नाही. तो शंभर धावांवरच धावचित झाला. त्याचे आणखी दुर्दैव म्हणजे तो खेळणा-या फलंदाजाच्या समोरील टोकाला असताना धावचित झाला! गोलंदाज सतीशने चेंडू टाकल्यानंतर पठाण नैसर्गिकपणे क्रिझच्या पुढे आला. फलंदाज डोग्राने तटवलेला चेंडू थेट सतीशच्या दिशेने आला. त्याने चपळाईने पठाणला धावचित केले! आठ षटकार आणि नऊ चौकारांची आतषबाजी करणारा पठाण त्या डावात असाच बाद होऊ शकला असता, इतके चापल्य त्याच्या बॅटला तेव्हा लाभले होते!

वीस षटकांत सहा बाद 212 धावांची मजल मारणा-या मुंबई इंडियन्सला प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सची 9.2 षटकांत चार बाद 66 अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सला पठाणी हिसका पाहायला मिळाला. पठाणच्या खेळीचे तीन टप्पे होते. त्याने पहिल्या पंधरा धावा केल्या, त्या अवधीत त्याने फक्त एक षटकार ठोकला. पाच चेंडू निष्फळ ठरले. बारा चेंडूंच्या तिस-या टप्प्यात त्याने दोन षटकार आणि तीन चौकार यांच्या साहाय्याने एकतीस धावा ठोकल्या. सर्वांत घणाघाती होता मधला टप्पा. पठाणने फक्त अकरा चेंडूंत चौपन्न धावांचा वर्षाव केला. सहा चौकार! पाच उत्तुंग षटकार!! एकही चेंडू निष्फळ नाही!

पठाणचे शतक पूर्ण झाल्यावर विजय समोर दिसू लागला होता. सतरा चेंडूंत चाळीस धावा! पठाण बाद झाला मात्र, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना हुरूप आला. राजस्थान रॉयलच्या फलंदाजांनी पठाणची लढाई व्यर्थ ठरू नये असा चंग बांधला. ही झुंज पाहताना प्रेक्षक बेभान झाले. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता अशी दोलायमान अवस्था निर्माण झाली. प्रेक्षकांच्या डोळयांसमोर जावेद मियांदाद तरळू लागला. गोलंदाज मलिंगाच्या जागी चेतन शर्माचा भास होऊ लागला. शारजा येथील भारत-पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या चेंडूवर, मियांदादने चेंडू बॅटच्या टोल्याने प्रेक्षकांत भिरकावून (हुकमी षटकार मारून) पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता! राजस्थान रॉयल्सच्या मस्कारेन्हासला ती करामत करता आली नाही. मुंबई इंडियन्स चार धावांनी जिंकले. मात्र मलिंगाचा अखेरचा चेंडू पडेपर्यंत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा, स्टेडियमधील प्रेक्षकांचा, चित्रवाणीला चिकटलेल्या चाहत्यांचा आणि हो! प्रेक्षकांचा एक नवीन वर्ग उदयास आलाय; चित्रपटगृहात मोठया पडद्यावर टी-20 सामना पाहणारा प्रेक्षक, ह्या सर्वांचा श्वास थांबला होता.

फलंदाज आणि गोलंदाज सामना फिरवतात हे सर्वश्रुत आहे. पण क्षेत्ररक्षकाने सामन्याला कलाटणी दिलेले काही क्षण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जाँटी ऱ्होड्स हा असा एक क्षेत्ररक्षक. 14 नोव्हेंबर, 1993 रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर हिरो कप स्पर्धेतील सामना सुरू होता. प्रतिस्पर्धी होते दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीज. त्या सामन्यात जाँटी ऱ्होड्सने एकापाठोपाठ एक पाच आश्चर्यकारक झेल घेऊन वेस्टइंडीजला पराभवाच्या खाईत लोटले.

- आदिनाथ हरवंदे

भ्रमणध्वनी : 9757104560

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.