हळदीचा रंग.....


हळदीचा रंग.....

नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये हळदीचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना यंदा हळदीने चांगलेच रंगवले आहे ! कधी काळी एक हजार रुपये क्विंटल असणा-या हळदीचा भाव या वर्षी वीस हजार रुपयांवर जाऊन पोचला आहे.

नांदेडसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हळद पिकवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. अलिकडच्या काळात ऊस, केळी अशी मोठी नकदी पिके आल्यामुळे हळदपिकाकडे दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागात म्हण आहे, की, हळद केव्हा तरी शेतक-याला रंगवते! मध्यंतरी १९९४-९५ च्या सुमारास हळदीने खरेच शेतक-याला रंगवले आणि आठशे रुपयांचा भाव थेट अडीच ते तीन हजारांवर जाऊन पोचला. त्यानंतर शेतकरी हळदीला भाव येण्याची वाट पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा या वर्षी फळाला आली आणि हळदीचा भाव वीस हजार रुपयांवर जाऊन पोचला. मधल्या काळात शेतक-यांनी हळदीबाबत निराशा दाखवण्याचे कारण होते, ते म्हणजे ऊसाचे नकदी पिक. पण यंदाच्या भाववाढीचा इतिहास पाहता शेतकरी ऊस आणि ऊसापेक्षा मोठे पीक असलेल्या केळीलादेखील विसरून गेले आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे दहा वर्षांपूर्वी प्रत्येकी दोनशे ते अडीचशे हेक्टरवर हळदीचे पीक घेतले जायचे. हेच प्रमाण या तीन-चार वर्षामध्ये शंभर हेक्टरच्या आसपास घसरले असावे. या वर्षी हळद लावण्याचे प्रमाण चार ते पाच पटींनी वाढले.

हळदीचे भाव कमी होणार नाहीत आणि मागणीही वाढेल हा पक्का अंदाज घेऊन शेतक-यांनी हा निर्णय घेतला. आयुर्वेदामध्ये हळदीला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदाची मागणी वाढत आहे. आसपासच्या देशांमध्ये हळद पिकवण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे हळदीची मागणी वाढली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सध्या नांदेडच्या मोंढ्यामध्ये हळदीची आवक काही प्रमाणावर सुरू आहे. सुपरशेलम १८ ते १९ हजार रुपये, सिंगल पॉलिश १७ ते १७.५ हजार रुपये, बिगरपॉलिश १६ ते १६.५ हजार रुपये असे भाव, मागणी आणि पुरवठयाच्या आधारे रोज बदलत आहेत.

मोंढ्यामधील व्यापारी बद्रीनारायण गिरधारी मंत्री यांनी सांगितले, की हऴदीचे उत्पादन काढणारा शेतकरी खूष आहे. ऊस व अन्य मोठ्या पिकाला वगऴून या वर्षी शेतकरी हऴदीचे पिक घेत आहेत. हळदीचा भाव कमी होणार नाही हे शेतक-याला पक्के माहीत झाले आहे. मोंढ्यामध्ये सुध्दा काही
व्यापा-यांनी हळदीचा भाव वाढेल या अपेक्षेने साठा करून ठेवला आहे.

- प्रहारमधील संदीप काळे यांच्या नोंदीआधारे
(संबंधित लेख : सांगलीची हळद – अशोक मेहता)

सांगलीची हळद बाजारपेठ


शोध

रविप्रकाश कुलकर्णी ‘खबरबात’ या नावाचे एक सदर ‘सकाळ’ मध्ये चालवतात. रविवार ८ ऑगस्ट २०१० च्या अंकात त्यांनी मनमोहन नातू यांच्या कवितेच्या संदर्भात छोटी नोंद केली आहे व त्यांच्या एका कवितेच्या ओळींचा शोध करण्यासाठी आवाहन केले आहे. कविता, सावरकरांनी फ्रेंच मार्सेली बंदरातून पलायन करण्याचा प्रयत्न केला त्यास, उद्देशून आहे. वाचकांनी यास जरुर प्रतिसाद द्यावा. कुळकर्णींचे टिपण असे :

अर्थात काहीही झाले तरी वि. दा. सावरकरांच्या या
साहसाला उणेपणा येऊच शकत नाही.
नेमकं हेच मर्म लोककवी मनमोहन यांनी सांगितलं आहे.

विश्वात फक्त आहेत | विख्यात बहाद्दर दोन ||
जे गेले आईकरता
| सागरास पालांडून ||
हनुमंतानंतर आहे
| त्या विनायकाचा मान ||

मनमोहन यांची ही कविता आधी कुठे प्रकाशित झाली होती? ती मुळात मोठी आहे असं आठवतं. दुर्गेश परुळेकर यांच्या पुस्तकात ही कविता संपूर्णपणे नाही. त्यांना ती मिळाली नसणार....

पण आता प्रश्न येतो, ही संपूर्ण कविता कशी मिळणार? मनमोहन यांच्या विखुरलेल्या कविता प्रयत्नपूर्वक गोळा करून ज्यांनी ’आदित्य’ हा ‘निवडक मनमोहन’ कवितासंग्रह आकाराला आणला त्या शंकर वैद्य यांना याबाबत विचारलं. तर ते म्हणाले, ‘मला ही कविता तेव्हा उपलब्धच झाली नाही. आता सांगणं कठीण आहे…’

सावरकर साहित्याचा मागोवा घेणा-या काही अभ्यासकांकडे चौकशी केली; पण त्यांनादेखील नक्की काही सांगता येईना.

कवी मनमोहनमनमोहन यांच्या या कवितेचा शोध लागू शकेल का?

या निमित्ताने, मनमोहनांचा हा परिचय:

मनमोहन नातू, गोपाळ नरहर | ( ११ नोव्हेंबर १९११ ते ७ मे १९९१) कवी, कादंबरीकार. जन्म तासगाव (जि. कोल्हापूर), घराण्याचं मूळ गाव - सावंतवाडी. पुढे पुण्यात स्थायिक. वडील ओव्हरसीअर होते. मनमोहनांचे बालपण, शिक्षण पुण्यात किशोरवयात शाळेत लक्ष नव्हते म्हणून तळेगावच्या समर्थ विद्यालयात रवानगी. तेथे राष्ट्रीयत्वाचे संस्कार. इंग्रजी सातवीपर्यंत तेथे. त्याच काळात काव्यलेखन सुरू. स्वत:चे ‘हायस्कूल’ नावाचे पाक्षिक काढून त्यात कविता प्रकाशित करणे सुरू. ते बंद पडल्यावर ‘ज्ञानप्रकाश’ इत्यादी मासिकांत. मनमोहन प्रामुख्याने कवी असले तरी ते प्रथम गाजले ते झपूर्झा (१९३६) या कादंबरीने. पण संस्कृती संरक्षक मंडळाने तिच्यावर खटला भरला. मनमोहनांना भुर्दंड आणि मनस्ताप सोसावा लागला. ‘राजहंस माझा निजला’ या सुभाषचंद्र बोसांवर लिहिलेल्या कवितेमुळे मनमोहन एकदम प्रकाशात आले. त्यानंतर त्यांनी ‘युगायुगांचे सहप्रवासी’ हे दीर्घकाव्य लिहिले. ही कविता धाडसी आणि मनमोहनांच्या अफाट कल्पनाशक्तीने भारावलेली होती, पण तरीही मनमोहनांना कवी म्हणून मान्यता त्यांच्या समकालीन समीक्षेने दिली नाही. ती पुढे मिळाली दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, अशोक शहाणे आदी नव्या पिढीच्या बंडखोर कवींकडून. शंकर वैद्य यांनी संपादित केलेला आदित्य (१९७१) हा मनमोहनांच्या निवडक कवितांचा संग्रह हाच त्यांच्या स्फुट कवितांचा एकमेव संग्रह. त्यांनी अनेक कादंब-याही लिहिल्या. अफाट कल्पनाशक्ती, उद्दाम अहंकार आणि इतरांना तुच्छ समजण्याची वृत्ती ही मनमोहनांच्या व्यक्तित्वाची वैशिष्टये होती. अनेक चमकदार कल्पना त्यांच्या कवितांमध्ये आहेत. परंतु समकालीनच नव्हे तर नंतरच्याही वाड्मयीन परिघात त्यांचे लेखन बाजूला राहिले, दुर्लक्षित राहिले ही वस्तुस्थिती आहे. (परिचय ‘मनोहर’वरून)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.