डिस्कव्हरी सायन्स सेंटर


वैज्ञानिक शोधांची अद्भुत दुनिया

 

डिस्कव्हरी सायन्स सेंटरसूर्य का उगवतो? रबर कसे बनते? लाकूड पाण्यात का तरंगते? आकाश निळे का दिसते? हे प्रश्न विचारले आहेत परभणी जिल्ह्यातल्या तांदुळवाडी, केंजलगाव, शिरपूर अशा छोट्या छोट्या खेड्यांतल्या आठ-दहा वर्षे वयाच्या मुलांनी. निमित्त आहे ‘कुतूहल जगत’ मासिक पत्रिकेत येणा-या विविध माहितीचे.

‘ज्ञान आपल्या घरी’ या उपक्रमांतर्गत ही चार पानी पत्रिका दर महिन्याला प्रसिध्द होते. अनेकरंगी छपाई असलेल्या या पत्रिकेत कोडी-माहिती-प्रश्नोत्तरे-प्रयोगमाला-चरित्रं असं विविध साहित्य असतं. त्यात भरपूर चित्रं-छायाचित्रं असतात. पाहताक्षणी आकृष्ट व्हावं असंच पत्रिकेचं रूप आहे.

ही कल्पना अजिंक्य कुलकर्णीची. तोच पत्रिकेचं संपादन करतो आणि नवनव्या कल्पना लढवत असतो. त्याला अभिजित संघई, विष्णू जाधव, गौळण शिंदे अशा तरूण चमूची साथ आहे. पण ही पत्रिका हेदेखील एका मोठ्या प्रकल्पाचं छोटं पिल्लू आहे. तो प्रकल्प आहे ‘डिस्कव्हरी सायन्स सेंटर’चा.

सेंटर ही मात्र अदभुत गोष्ट आहे. एव्हाना, भारतात प्लॅनेटोरियम अनेक ठिकाणी होऊ लागली आहेत. फिरती प्लॅनेटोरियमदेखील आहेत. शाळा-शाळांमध्ये मोठमोठ्या प्रयोगशाळा आहेत. विज्ञानप्रदर्शनांचे, त्यांमधील स्पर्धांचे शासकीय–निमशासकीय उपक्रम होत असतात. ‘डिस्कव्हरी सेंटर’ या सर्वांच्या पलीकडे आहे. मुलांची शोधबुध्दी सचेतन व्हावी, जिज्ञासावृत्ती जागृत व्हावी यासाठी हा प्रकल्प आहे, पण गंमत अशी की तो शिक्षकांचं आणि पालकांचं कुतूहल चाळवतो व त्यांनाही आकर्षित करून घेतो. पालक-शिक्षक चुंबकाप्रमाणे या प्रकल्पाकडे खेचले गेलेले मी पाहिले आहेत.

आणि त्यामुळेच हा प्रकल्प किती मूलभूत गरज भागवणारा आहे हे स्पष्ट होतं. ‘डिस्कव्हरी सायन्स सेंटर’ हा स्वप्नभूमी सामाजिक आर्थिक विकास संस्थेचा प्रकल्प आहे. तो परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात केरवाडी गावात आहे. सेंटर म्हणजे सर्कशीसारखा विशाल तंबू आहे -पण कायमस्वरूपी, एकाच ठिकाणी, पोलादी सळ्यांनी आणि प्लॅस्टिकच्या पारदर्शक पत्र्यांनी उभा केलेला. ऐसपैस, हवेशीर. मुलांनी यावं-बागडावं आणि रमून जावं असंच तंबूचं प्रथमदर्शनी रूप आहे.

एकदा का मुलं तंबूत शिरली की ती बाहेरच येऊ इच्छिणार नाहीत, अशी छोटीमोठी आकर्षणं आत आहेत. विज्ञानाच्या अनेक संकल्पना उलगडून दाखवणारे छोटेमोठे प्रयोग. पण त्यांची रचना अशी, की मुलं ते करता करताना त्यांमागील वैज्ञानिक तत्त्व उलगडलं जातं. सगळेच प्रयोग आहेत असंही नाही, काही निव्वळ खेळ आहेत. एकट्यानं खेळायचे खेळ -संघानं खेळायचे खेळ... तंबूत हिंडंता- फिरताना नुसती मज्जा वाटते आणि शोधक वृत्ती नकळतपणे अंगी बाणत जाते. माणसाची सारी प्रगती त्याच्या कुतूहलातून, जिज्ञासेतून घडून आली आहे आणि ती वृत्ती इथं संगोपन केली जाते.

इथे अनेक इण्टरअॅक्टिव प्रयोग करण्याची, विज्ञानतत्त्वांशी खेळण्याची सोय आहे. जसं पाण्यापासून वीज तयार करणं, कोणत्याही ऊर्जेशिवाय पाणी उंचीवर चढवणं, अनेक ठोकळे विशिष्ट पद्धतीनं छोट्या बॅगेत ठेवणं अशा अनेक क्रिया; त्याचबरोबर, पदार्थविज्ञानातील गुरूत्वाकर्षणाचे अनेक प्रयोग, वजन आणि पुली यांचं रिलेशन, प्रकाशाचे नियम व त्यातून होणा-या गमती-जमती, ध्वनिपरिवर्तन आणि त्यामुळे होणारे दिवस-रात्र आणि त्यामुळेच विविध देशांतील विविध वेळा असे अनेक वैज्ञानिक प्रयोग इथं फक्त पाहायचे नाहीत तर त्यांच्याशी खेळायचं, करून पाहायचे आणि अनुभव घ्यायचा अशी व्यवस्था आहे. वैज्ञानिक प्रयोगांसोबतच अनेक पझल गेम, कम्युनिकेशन गेम असा एक विभाग इथं आहे. चौकस बुद्धिमत्तेनं आणि चिकाटीनत्र हे खेळ खेळणं हे इथं मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही फार मोठं आकर्षण आहे.

अशा प्रयोगांसोबतच इथं एक छानसं थिएटर आहे. विज्ञानातील, अभ्यासातील आणि सामाजिक प्रश्नांवरील अनेक फिल्म्स दाखवण्याची सोय आहे. मुलांनी दहा ते पंधरा मिनिटांची फिल्म पाहून त्यावर चर्चा करावी अशी अपेक्षा असते. प्रश्नांची उत्तरं फिल्ममध्ये कशी शोधायची म्हणजे फिल्म कशी पाहावी, हे सप्रयोग शिकवलं जातं. त्यासाठी फिल्मनंतर किंवा पोस्टर प्रदर्शनानंतर काही वेळा मुलांची चर्चासत्रं आयोजित केली जातात.

निसर्गविज्ञान, जीवविज्ञान, तंत्रविज्ञान, माहिती- संपर्कविज्ञान आणि कृषिविज्ञान या शास्त्रांमधील खेळ इथं खेळता येतात व ते खेळता खेळतानाच त्यांमधील माहिती मिळून जाते. मुलांना या प्रदर्शनांत फिरताना वेगवेगळ्या त-हेचे शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं. त्यामधून त्यांचा ज्ञानाचा खजिना अधिक भरून जातो.

स्वप्नभूमी हा प्रकल्प पंचवीस वर्षांपूर्वी वंचित मुलांना शिक्षणाची सोय करून देणं या उदात्त ध्येयानं सुरू झाला. या काळात अनेक मुलं ‘स्वप्नभूमी’च्या वसतिगृहांत राहून, शाळेत शिकून, मोठी होऊन गेली आहेत. सर्वशिक्षण अभियान, बालमजुरी निर्मूलन, स्त्रियांसाठी रोजगार निर्मिती, अल्पबचत गट, खेडोपाडी ग्रंथालयं, पाणलोट विकास, दुर्बलांचं सक्षमीकरण अशा अनेक आघाड्यांवर ‘स्वप्नभूमी’चं काम चालतं, परंतु वर्षापूर्वी ‘डिस्कव्हरी सेंटर’च्या प्रकल्पाला चालना देऊन ‘स्वप्नभूमी’नं कालानुरूप मोठी झेप घेतली आहे.

या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे ते त्याच्या भव्यतेत. यापुढे भारतात व महाराष्ट्रातदेखील किरकोळ काही चालणार नाही ही दृष्टी प्रकल्प संयोजक म्हणून सूर्यकांत कुलकर्णी व अजिंक्य कुलकर्णी यांच्यामध्ये आहे याचं मला विशेष वाटतं. सुमारे दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील ह्यूस्टनजवळच्या ‘नासा’ सेंटरला मी भेट दिली तेव्हा मला तीव्रतेनं असं वाटलं होतं, की महाराष्ट्रातल्या शाळांतल्या मुलांनी तिथं जाऊन हे सारं पाहायला हवं. मी आता शाळांना व मुला-पालकांना नि:शंकपणे सांगू शकतो, की केरवाडीच्या ‘डिस्कव्हरी सेंटर’ला जा. तिथं तुमची जीवनदृष्टी बदलून जाईल. विज्ञान नावाची वेगळी गोष्ट नाही. ते तुमच्या सभोवताली आहे याची प्रचीती या ‘डिस्कव्हरी सेंटर’मध्ये येईल.

जागतिक दर्जाच्या विज्ञान केंद्रांशी सहज तुलना होऊ शकेल असं ‘डिस्कव्हरी सेंटर’ माझ्या महाराष्ट्रात आहे याचा मला अभिमान वाटतो.

‘डिस्कव्हरी सेंटर’मध्ये एका वेळी शंभर मुलं आरामशीर राहू-वावरू शकतात. त्यांना प्रयोग करायला, खेळायला पूर्ण मुभा असते. त्यांना काही अडचण आली तर मार्गदर्शन करायला शिक्षक जागीच उपलब्ध असतात, पण त्यांची भूमिका ‘मित्र-मार्गदर्शका’ची असते. सेंटर पूर्ण पालथं घालायचं तर मुलाला दोन वेळा म्हणजे दोन दिवस तरी यावं लागतं.

‘डिस्कव्हरी सेंटर’चं नाव जिल्ह्यात व परिसरात सर्वतोमुखी झालं आहे आणि एव्हानाच शाळांच्या ट्रिपसचा ओघ तिकडे सुरू झाला आहे. परंतु केंद्र संचालक अजिंक्य कुलकर्णी याची भूमिका स्पष्ट आहे. त्याला प्रदर्शनाला येऊन-पाहून जाणा-या मुलांची संख्या नुसती जमा करायची नाही. मुलांच्या गुणवत्तेत फरक पडावा यासाठी त्याचा आग्रह आहे. त्यामुळे एका वेळी कमाल शंभर मुलांना प्रवेश, शाळांसाठी भेटीचे पूर्वनियोजित कार्यक्रम अशा काही मुद्यांवर अजिंक्यचा कटाक्ष आहे.

किंबहुना ‘सेंटर’वर जाण्याआधी मुलांची तयारी व्हावी आणिं सेंटरला भेट देऊन गेल्यावर मुलांचं जागृत झालेलं कुतूहल सदासतेज राहावं यासाठी अजिंक्यनं ‘कुतूहलजगत’ ही पत्रिका सुरू केली आहे. त्याचबरोबर मुलांना सहज खेळता येतील अशा कुतूहलजनक खेळण्यांचा संचही तयार केला आहे. जिल्ह्यात एक याप्रमाणे डिस्कव्हरी सेंटर्सची मालिका तयार झाली तर महाराष्ट्रातलं सध्याचं बौध्दिक मांद्य (मंदता) दूर होऊन पुन्हा एकदा राज्याचं बुध्दिवैभव तेजानं प्रकाशू लागेल.

केरवाडी-परभणीचं ‘डिस्कव्हरी सायन्स सेंटर’ ही वैज्ञानिक संशोधनाची अदभुत दुनिया आहे. प्रत्येक बालकानं या दुनियेची सफर करायलाच हवी!

स्वप्नभूमी
केरवाडी, जिल्हा परभणी.
अजिंक्य कुलकर्णी
9822422444

ajinkya.sedt@gmail.com 

- दिनकर गांगल

Updated On - 3 Mar 2016
 

लेखी अभिप्राय

बिल्कुलच माहिती नव्हती असे सेंटर आहे म्हणुन. कित्‍ती अद्भुत! वाचल्यावर मी मोठी असूनदेखील असं वाटतं, की शाळकरी व्हावं अन् त्‍या सेंटरमध्‍ये जाऊन सारं न्याहाळावं. समजून घ्यावं. मी ओळखीतल्या मुलांना नक्कीच ही माहिती सांगेन.

माधुरी ब्रम्हे…03/03/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.