सैनिकहो, तुमच्यासाठी!


ज्या सैनिकांच्या जीवावर आपण निर्भयपणे जगतो, ते रणांगणावर धारातीर्थी पडल्‍यानंतर त्‍यांच्या कुटुंबीयांचे पुढे काय? या प्रश्नावर आपण फारसा विचार करत नाही, परंतु प्रतिमा राव या स्वत: एक सैनिकपत्‍नी असल्यामुळे त्यांना मात्र या समस्येची भीषणता जाणवली. स्वत:च्या पतीच्या निधनानंतर, सैनिकांच्या हक्काच्या असलेल्या सुखसुविधा मिळवताना त्यांना आलेल्या अनुभवावरून सैनिकांच्या समस्या दूर करण्याची आवश्यकता त्यांना जाणवली. यासाठी त्यांनी ‘सैनिकभारती ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्‍यांच्‍या कार्याचा घेतलेला हा आढावा...

श्रीमती प्रतिमा राव या ‘सैनिकभारती ह्युमॅनिटी’ या संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष आहेत.

आपण ज्या सैनिकांच्या जीवावर निर्भयपणे जगतो, त्यांच्या हौतात्म्याचे गोडवे गातो, त्या रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचे पुढे काय? या प्रश्नावर आपण फारसा विचार करत नाही, परंतु प्रतिमा राव या स्वत: एक सैनिकपत्‍नी असल्यामुळे त्यांना मात्र या समस्येची भीषणता जाणवली व त्यांनी स्वत:ला सैनिकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याच्या कार्यात झोकून दिले. त्यांच्या स्वत:च्या पतीच्या निधनानंतर, सैनिकांच्या हक्काच्या असलेल्या सुखसुविधा मिळवताना त्यांना आलेल्या अनुभवावरून सैनिकांच्या समस्या दूर करण्याची आवश्यकता त्यांना जाणवली. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘सैनिकभारती ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्या स्वखर्चाने संस्थेचा कारभार करत आहेत.

संस्था सैनिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचा पाठपुरावा करते. उदाहरणार्थ, इतर राज्यांत सैनिकांच्या नावांवरील घरांना ‘मालमत्ता कर’ माफ केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा कर आकारला जातो. हा अन्याय दूर करण्यासाठी प्रतिमा राव यांनी ‘कर-माफी’चा प्रश्न धसास लावला आहे. त्यांच्या प्रयत्‍नांनी व चिकाटीमुळे महाराष्ट्रात ठाणे, नवी मुंबई, पुणे, अहमदनगर अशा काही महापालिकांमध्ये करमाफीच्या कागदोपत्री असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘मालमत्ता करमाफी’ व्हावी यासाठी त्या जिद्दीने प्रयत्‍न करत आहेत.

प्रतिमा राव यांच्या मनामध्ये समाजसेवेचे बीज रुजले, फार वर्षापूर्वी, १९८१ मध्ये. त्यांनी ‘व्हिजन ब्युटी हेल्थ केअर सेंटर’ची स्थापना केली. या सेंटरमध्ये गरीब होतकरू मुलींना अनेक प्रकारची कौशल्ये शिकवून, रोजगार मिळवून देऊन त्यांनी स्वावलंबी बनवले.

प्रतिमा राव ‘सैनिक भारती’ हे पाक्षिक २००६ सालापासून प्रकाशित करत असून त्यामधून सैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. ‘सैनिकभारती ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ संस्थेतर्फे

१. सैनिकांच्या पाल्यांसाठी आर्थिक मदत मिळवून देणे

२. त्यांच्या नोकर्‍यांसाठी प्रयत्‍न करणे

३. शहीद सैनिकांच्या माता-पित्यांचे व विधवांचे पुनर्वसन इत्यादीसाठी त्या सतत प्रयत्‍नशील आहेत.

शिवाय, प्रतिमा राव ‘व्हिजन कन्सल्टिंग’ या संस्थेतर्फे सैनिकांच्या मुलांना नोकर्‍या मिळवून देण्यासाठी व त्यांच्या व्यवसायांतील विविध अडचणी दूर करण्यासाठी मदत करतात. त्यांना मुस्लिम-जम्मातुल्ला ट्रस्ट तर्फे जर्मन चान्सलरच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. टीचर्स असोसिएशनतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

- प्रतिनिधी, thinkm2010@gmail.com

   

प्रतिमा राव - 9323989886, 022-25932753,-http://sainikbharti.org/  sainik.bharti@yahoo.co.in 
पत्‍ता – 13, हेमकृपा अपार्टमेन्‍ट, रेशनिंग कार्यालयाजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई – 400080

Last Updated On - 13th September 2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.