श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा

प्रतिनिधी 09/09/2011

श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखाझाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या स्वत:बरोबरच सभोवतालच्या माणसांची वाचनाची भूक वाढवतात आणि शमवतातदेखील! त्या झाडांसारखी.. निरलस भावनेने.. प्रौढी न मिरवता. सभोवतालच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून दरवेळी प्रवाहाच्या विरुद्धच पोहायला हवे असे नाही, तर प्रवाहाबरोबर राहतानासुद्धा आपल्याला हव्या त्या दिशेला जाता येते, हे काही माणसे आपल्या कृतीतून दाखवून देतात.

काय नकोपेक्षा काय हवे हे ज्याला कळले त्याला आपले रस्ते कोणते, किती अंतर किती वेगाने चालायचे आहे याचा अंदाज बरोबर येतो. श्यामसुंदर जोशींचे तसेच झाले. त्‍यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टसची ‘टेक्स्टाइल डिझायनिंग’ची पदविका घेतल्यावर, शिक्षकाची नोकरी पत्करून अथक प्रयत्न आणि अखंड भ्रमंती यांमधून प्रचंड ग्रंथसंग्रह केला. त्याचबरोबर, इंटिरियर डिझायनिंग, फोटोग्राफी यांसारखे छंद जोपासले; गिर्यारोहण केले: ऐतिहासिक स्मारकांचा विशेष अभ्यास केला. साठीनंतरचे जीवन स्वस्थ बसून राहण्याचे; आपल्या आजारांना गोंजारत स्वत:ला जपायचे... भूतकाळाच्या आठवणी काढत, नवीन पिढीला नावे ठेवत, कुणीच कुणासाठी काही करत नाही असा सूर लावत किंवा वैयक्तिक अडचणी, मतभिन्नता यांना ‘खूप मोठे’ बनवण्याचे असे समजतात. पण श्याम जोशी या माणसाचे काही वेगळेच...

श्याम जोशी यांचे वडील देवीदास त्र्यंबक जोशी यांचे वयाच्या ८५ व्‍या वर्षी, २००५ साली निधन झाले. त्यांनी महाराष्ट्रमाऊली पांडुरंग सदाशिव ऊर्फ साने गुरुजी यांच्या सान्निध्यात खानदेशात आयुष्य वेचले. श्याम यांनी देवीदास यांचे उचित स्मारक व्हावे म्हणून त्यांनी ठेवलेल्या पैशांचा विनियोग समाजासाठी करण्याचे ठरवले अणि देवीदास यांच्या चारही मुलांनी ‘निसर्ग ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथसखा वाचनालय’ हे उपक्रम हाती घेतले.

श्याम जोशी यांचा मुलगा ऋतुराज, सून आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्यासह ‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे बदलापूरमधे दरवर्षी तीन हजार झाडे लावली जातात. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांबरोबर पक्षांचीही संख्या रोडावत चालल्यामुळे पर्यावरणात असंतुलन होते. त्यावरचा सोपा उपाय म्हणजे वृक्षारोपण आणि पक्षांसाठी घरटी व अन्न यांची सोय करणे. म्हणूनच, ‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे बर्ड फिडर आणि कृत्रिम घरटी यांची निर्मिती आणि वितरण करून देण्यात येते. आत्तापर्यंत पाचशे बर्ड फिडर आणि अडीचशे घरटी पक्षांसाठी उपलब्ध करण्यात आली. त्यांचे रजिस्टर ठेवून त्याचा योग्य तो पाठपुरावाही करण्यात येतो. कृत्रिम घरटी बदलापूरमधील वृक्षांवर योग्य ठिकाणी लावून त्यांचे निरीक्षण करण्यात येते.

‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे अंबरनाथ ते वांगणी या परिसरात वा अन्य ठिकाणी अवकाशवेध हा कार्यक्रमही राबवण्यात येतो; जेणेकरून नवीन पिढीला त्या विषयाची गोडी लागेल.

श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखाश्याम जोशी यांनी ‘ग्रंथसखा’ वाचनालयाची मुहूर्तमेढ ट्रस्ट म्हणून २१ मार्च २००५ रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर रोवली. ग्रंथालय हे मनाची मशागत करते, ही त्यामागे भावना. सुरुवातीला छोट्या जागेत असलेले ‘ग्रंथसखा’, शासकीय अनुदान न घेता बदलापूर पूर्वेला स्टेशनापासून दोन मिनिटांवर असणा-या तेलवणे टॉवर्समधे प्रशस्त अशा पंधराशे चौरस फूट जागेत हलवण्यात आले आहे.

श्याम जोशी हा माणूस नुसता संग्राहक नसून, तो वाचक आणि लेखक यांना जवळ आणणारा दुवा ही भूमिका एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून निभावतो. तो कणकण वेचून मध गोळा करणार्‍या मधमाशीच्या वृत्तीने ग्रंथसंग्रह करतो, तर ‘ग्रंथसखा’ वाचनालयात ‘हाताळा, पसंत करा आणि वाचा’ असे सांगून वाचकांना ग्रंथांच्या अधिक जवळ आणण्याचे अमोल कार्य करतो.

‘ग्रंथसखा’ वाचनालयातील प्रत्येक गोष्ट पाहावी अशी आहे. ग्रंथालयात सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. केवळ मासिक फीमधे कोणताही ग्रंथ वाचायला मिळतो. लेट फी नाही. कितीही दिवस लागले तरी चालेल पण पुस्तके वाचली जावीत ही त्यामागे दृष्टी. हे वाचनालय सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत उघडे असते. (सोमवार बंद). बत्तीस कर्मचारी आळीपाळीने ग्रंथालयाची आणि वाचकांची काळजी घेतात. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमे-याने ग्रंथालयावर नजर ठेवली जाते. ग्रंथालयात दोलामुद्रिते पाहायला व वाचायला उपलब्ध आहेत.

‘ग्रंथसखा’मधे सध्या पन्नास हजारांपेक्षा जास्त पुस्तके (किंमत अडतीस लाख रुपये) उपलब्ध आहेत. पण त्याहून मोठा खजिना म्हणजे ठाण्यापासून कर्जतपर्यंत विखुरलेला चार हजारांपेक्षा अधिक सभासद परिवार; एक लाख वाचक आणि दहा हजार दुर्मीळ मासिके. जोशी यांनी इंग्रजी पुस्तकांचा संग्रह किमान वीस हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘ग्रंथसखा’चे कार्यालय, अभ्यासिका असा पसारा वाढत आहे.

श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा‘ग्रंथसखा’ची दुसरी ‘पुस्तक दत्तक योजना’. प्रामुख्याने ज्या ग्रामीण भागात वाचनाचा फारसा प्रसार नाही अशा गावांसाठी ही योजना आहे. ‘ग्रंथसखा’तर्फे वैयक्तिक पुस्तक संग्रह (ज्यांची पुस्तके देण्याची इच्छा आहे त्यांचाकडून) गोळा करण्यात येईल. त्या पुस्तकांना बाइंडिंग करून, ती ज्या भागात पुस्तके पोचत नाहीत अशा ठिकाणी ठेवण्यात येतील. वाचनालयाची जागा, पुस्तकांची निगा, तिथे लागणारे कर्मचारी यांची व्यवस्था ‘ग्रंथसखा’ करेल. ‘वाचक सवलत’ योजनेत सभासदांना ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वाने पुस्तके विकत घेता येतात. आणखी एका योजनेअंतर्गत सभासदांना ग्रंथालयासाठी अतिरिक्त अनामत रक्कम उपलब्ध करून देता येईल, त्यांना त्या रकमेवर बँकेपेक्षा अधिक व्याज देऊन वाचनालयासाठी निधी उभा करण्याची ही योजना आहे.
 

‘वाचावे काय- का आणि कसे’ ही तर ‘ग्रंथसखा’ची जणू वाचक घडवण्यासाची चळवळच! श्याम जोशी आणि त्यांच्या सहका-यांनी निवडक पंधराशे पुस्तकांची ग्रंथसूची तयार करून आपल्या सभासदांसाठी ती उपलब्ध केली आहे. या निवडक पुस्तकांचा वाचनालयात स्वतंत्र कक्ष आहे. साहित्याचा अभ्यास करणार्‍या व्यक्तीला कोणताही ग्रंथ उपलब्ध व्हावा व वाचनालयात बसून त्याचा अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासिकेचीही सोय आहे. वाचनालयाला शेषराव मोरे, गिरीश कुबेर, संजय भास्कर जोशी, भानू काळे, गंगाधर गाडगीळ, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे, अनिल अवचट, अनंत सामंत, सुधीर मोघे, सुभाष भेंडे, फैय्याज अशा मान्यवर साहित्यिक-कलावंतांनी भेटी दिल्या आहेत.

या शिवाय श्याम जोशी यांनी श्रवणशाळा, पालकशाळा, काव्यसंध्या, वातानुकुलित अभ्यासिका, कै. रवींद्र पिंगे कलादालन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करून आपला वेगळा ठसा साहित्यिक व सांस्कृतिक जीवनावर उमटवला आहे. त्यांना यासाठी मुंबई मराठी साहित्य संघाचा मंगेश नारायण कुलकर्णी पुरस्‍कार (२००९); तसेच ठाण्यात भरलेल्या चौ-याऐशीव्‍या मराठी साहित्य संमेलनात (२०११) ‘ग्रंथप्रसारक’ असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बदलापूरलाच नव्हे तर अवघ्या साहित्यविंश्वाला श्रीमंत, विविधांगी, सृजनशील बनवण्याच्या ध्यासाने कार्य करणा-या आणि वाचकांच्या मनाच्या खिडक्या उघडणा-या श्याम जोशी या मितभाषी अवलियाला कधी भेटायचे ते तुम्हीच ठरवा. मगच ‘ग्रंथसखा’चा खरा अर्थ तुम्हाला कळेल!
 

श्यामसुंदर देवीदास जोशी, ९३२००३४१५६
अर्जुनसागर बिल्डिंग़, मच्छिमार्केट, रेल्वे स्टेशनजवळ, बदलापूर (पूर्व)

- विश्वास कृष्णाजी जोशी,
९८३३१८१२५४
३०१ जयविजयश्री कोऑप हाउसिंग सोसायटी, बॅरेज रोड, बदलापूर (पश्चिम) - ४२१५०३,

लेखी अभिप्राय

All of my questions sesteld-thankt!

Praveen22/04/2014

I've been looknig for a post like this for an age

Shravan22/04/2014

श्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) मुंबई मुख्‍यालय येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9769213913

स्वायत्त मराठी विद्यापीठ हा प्रयोग नवीनच आहे. हे मराठी भाषेचे ऐश्वर्य आहे. याचे अनुकरण ठिकठिकाणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी या मराठी विद्यापीठाची प्रसिद्धी करावी लागेल.

श्रीकांत पेटकर28/02/2015

उत्कृष्ट उपक्रम। अशा संस्था असणे । हेआमचे भाग्य।असे सांस्कृतिक उपक्रम होणे गरजेचे आहे।

स्नेहल बापट20/04/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.