संजय गुरव - कात्रणांच्‍या छंदातून शेतीपर्यंतचा प्रवास


संजय मारुती गुरव हे ‘सिक्युरिटी’ (वॉचमन) म्हणून काम करत. मात्र त्यांचा ओढा सेंद्रीय (शेती) उत्पादने याकडे होता. त्यांना १९९४ पासून वृत्तपत्रे, साप्‍ताहिके, मासिके यांमधून त्‍या विषयावरील माहिती जमा करण्यासाठी कात्रणे काढण्याचा छंद लागला. कात्रणे जमा करताना त्यांनी त्‍या माहितीच्‍या आधारे शेती करण्‍याचा ध्‍यास मनी जपला. त्‍यांच्‍या त्या छंदाबद्दल 2010 साली 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'वर लेख प्रसिद्ध झाला. तो लेख वाचून 2012 साली काही व्‍यक्‍ती गुरव यांच्‍या संपर्कात आल्‍या आणि एका व्‍यक्‍तीने त्‍यांना त्‍यांची अठ्ठावीस एकर जमिन कसण्‍यासाठी दिली. आज गुरव त्‍या जमिनीवर शेतीतील वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गुरव यांचा ध्‍यास प्रत्‍यक्षात उतरवण्‍यासाठी 'थिंक महाराष्‍ट्र' वेबपोर्टल सहाय्यभूत ठरले हे या घटनेचे विशेष!

गुरव गेल्या दोन दशकांहून अधिक काळ छंदापायी विविध प्रकारची वृत्तपत्रे, साप्‍ताहिके, मासिके, पुस्तके जमा करत आहेत. ते कोणाकडून शेतीबद्दल माहिती मिळताच किंवा त्यांच्या नजरेस शेती विषयावरील लेख अथवा पुस्तक दिसताच ते प्राप्‍त करण्यासाठी धडपड करू लागतात. ते एकोणपन्‍नास वर्षांचे आहेत. त्यांनी शालेय परीक्षा (दहावी) तांत्रिक विषयासह उत्तीर्ण केलेली आहे.

संजय गुरव हा अवलिया पूर्वी मुंबई उपनगरातील कांजुरगावामध्ये एका चाळीत राहत असे. चाळ म्हटली तरी ती इमारतीसारखी अथवा एका रांगेत बैठी घरे असल्यासारखी नाही. तिला चाळ फक्त नावाला म्हणतात. खरे तर, ती झोपडवस्ती होती. स्वत: संजय गुरव यांची खोली (रुम) अर्धकच्च्या बांधकामाची होती. दारामध्ये पाण्याची छोटी पिंपे दिसत. घरात प्रवेश करण्यासाठी वाकून जावे लागे. घर १५ x २० चौरस फूटांच्या क्षेत्रफळात होते. त्यामध्ये आतील खोली व बैठकीची खोली अशी विभागणी केली होती. आतील खोलीत स्वयंपाकाची व्यवस्था तसेच मोरी (स्नान घर) होते. अशा त्‍या घरात, संजय गुरव त्‍यांची पत्‍नी व दोन मुलींसह आणि छोटा भाऊ व त्याची पत्‍नी अशा एकूण सहा माणसांसह राहत असत.

गुरव यांनी बाहेरच्या पडवीसारख्या जागेत लाकडी फळ्यांची मांडणी केलेली होती. त्यामध्ये तीन-चार कप्पे असत. तिथेच त्यांनी त्‍यांच्‍या कात्रणांचा खजिना ठेवला होता. पावसापासून संरक्षण, वाळवी लागू नये म्हणून त्यांनी तो सर्व पसारा प्लॅस्टिक पिशव्यांत व्यवस्थित बांधून ठेवला होता. त्यांतील मधल्या कप्प्यातील सात बॉक्स फाईली लक्ष वेधून घेत. त्यांवर हिरवे शिलेदार, पाणी-नियोजन, शेतकरी यशोगाथा, वनौषधी उपक्रम, महिला यशोगाथा, शेतकरी-वादविवाद, आरोग्य-योग अशी, वर्गीकरण करून लिहिलेली नावे आढळत.

सेंद्रीय शेतीबद्दल संजय गुरव यांनी जमवलेली कात्रणेकृषिरंग, शरद कृषी (ITA), शेतकरी, आमची माती आमची माणसं, बळीराजा, उद्ममशील कृषक, गोडवा शेतीचा, कृषिपणन मित्रे, अन्नदाता (इटिव्ही) हैदराबाद, कृषिगोपाल, शेती प्रगती, लोकमंगल किसानशक्ती, शेतकरी, ऊसमळा, कृषिवृत्त, पूर्वा कृषिदूत अशा नावांची मासिकं आढळतात. कृषिकोन्नती, The Living Field (गोवा) अशी साप्‍ताहिकेसुद्धा नजरेस पडत.

त्‍या जोडीला शेवगा, पपया, वांगी, डाळिंबे, ढोबळी मिरची, अद्रक (आले) यांची आधुनिक पद्धतीने कशी लागवड करायची याबाबतच्या कात्रणांच्या झेरॉक्स प्रती लक्ष वेधून घेत.

त्या वेळी संजय गुरव अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगत होते. तरी त्यांना शेतीविषयक कात्रणे जमा करण्याचे वेड का लागले, याचे स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही. बहुधा ती मातीची ओढ असावी. आश्चर्य म्हणजे ते जन्मापासून मुंबईतच राहत आहेत. गावाकडे शेती नाही. परंतु त्‍यांनी मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे शेतीचा ध्यास घेतला. आधी त्‍यांचा ओढा सेंद्रीय शेतीकडे होता. मात्र जसजशी माहिती उपलब्‍ध होत गेली तसतसा त्‍यांचा कल नैसर्गिक शेतीकडे वळला. त्यासाठी यज्ञयाग, अग्निहोत्र यांपासून ते गांडूळ शेती पर्यंतचे सर्व प्रयोग करण्याची त्यांची मनीषा होती. यासाठी जमिनीचा एखादा तुकडा मिळाला तर त्यांना हवा होता.

'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'वर 2010 साली संजय गुरव यांच्‍या कात्रणे जमा करण्‍याच्‍या छंदाबद्दल हा लेख प्रसिद्ध झाला. तो वाचून दोन वर्षांनंतर घाटकोपरच्‍या विद्या सावंत यांनी गुरव यांना संपर्क केला. विद्या सावंत यांच्‍या वडीलांनीही याच प्रकारे शेतीचा ध्‍यास घेतला होता. मात्र ते तो पूर्ण करण्‍यापूर्वीच निधन पावले. त्‍या गुरव यांच्‍या ध्‍यासाबद्दल माहिती मिळताच त्‍यांच्‍याशी जोडल्‍या गेल्‍या. त्‍यांनी गुरव यांची ओळख डोंबिवलीतील त्‍यांचे बिल्‍डर मित्र दिनकर म्‍हात्रे यांच्‍याशी करून दिली. म्‍हात्रे यांची बदलापूर येथे अठ्ठावीस एकर जमिन आहे. त्यांनी ती गुरव यांना कसण्‍यासाठी दिली. गुरव यांचे स्‍वप्‍न प्रत्यक्षात उतरले.

त्‍यानंतर गुरव यांनी वॉचमनची नोकरी सोडली. शेतीसाठी नोकरी सोडल्‍यामुळे घरच्‍यांनी त्‍यांना वेड्यात काढले. मात्र गुरव यांनी हाती आलेली संधी सोडली नाही. ते गेल्‍या चार वर्षांपासून त्‍या जमिनीवर शेतीत वेगवेगळे लहानमोठे प्रयोग करून पाहत आहेत. ते संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. त्यासाठी ते केवळ गाईचे शेण आणि गोमुत्र यांचा वापर करतात. गुरव बदलापूर येथील जमिनीवर गेले तेव्‍हा त्या जमिनीत असलेला चिकू पूर्ण जळून गेला होता. गुरव यांनी त्‍याची नव्‍याने लागवड केली. त्‍यांनी त्‍याच स्‍वरुपाचे प्रयोग आंबा व भाजीपाल्‍यांवर केले. त्‍यांच्‍या प्रयोगांना यश आले. त्‍यांच्‍या बागेतील फळांची चव बाजारात मिळणा-या फळांच्‍या चवीपेक्षा मधुर असल्‍याच्‍या प्रतिक्रिया त्‍यांना मिळाल्‍या. त्‍यांनी नुकताच नाशिकच्‍या सिन्‍नर तालुक्‍यात राहणारे शेवग्‍याचे शेतकरी बाळासाहेब मराळे यांना संपर्क करून शेवग्‍याची माहिती घेतली. आता ते जमिनीत शेवग्‍याची लागवड करण्‍याचे प्रयत्‍न करत आहेत.

गुरव यांनी यानंतरही कात्रणे जमा करण्‍याचा छंद सोडला नाही. ते घर बदलून भांडुप येथे राहू लागले. घरात कात्रणांना जागा कमी पडू लागली म्‍हणून त्‍यांनी ती कात्रणे साता-यातील त्‍यांच्‍या नागझरी गावातील घरात नेऊन ठेवली आहेत. कात्रणांमधून त्यांना आंध्रप्रदेशमध्‍ये नैसर्गिक शेतीवर काम करणारे सुभाष पाळेकर यांची माहिती मिळाली. पाळेकर यांना आंध्र सरकारच्‍या शिफारसीमुळे पद्मश्री पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. गुरव त्यांच्‍या शिबीरे, कार्यशाळांना नेमाने जात असतात.

संजय गुरव यांची पत्‍नी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. त्‍यांचा भाऊ सिक्‍युरिटी गार्ड म्‍हणून काम करतो. गुर यांच्‍या दोन मुली कॉलेजमध्‍ये शिकतात. त्‍यांना वडीलांच्‍या कामाबद्दल अादर वाटतो. संजय गुरव यांना अद्याप शेतीतून म्‍हणावे तसे उत्‍पन्‍न नाही. मात्र त्‍यांच्या तोंडात त्‍या परिस्थितीबद्दलचे अवाक्षर येत नाही. ते सतत बोलत असतात ते शेती आणि शेतीमधील प्रयोग यांबाबत.

संजय गुरव - ९९२०५३४८२४

- राजेंद्र शिंदे

Last Updated On - 2nd Feb 2017

लेखी अभिप्राय

महाराष्ट्रात असा उपक्रम खुप प्रेरणादायी आहे. जय जवान जय किसान.

वैभव भगवान यादव10/03/2015

उपक्रम'उत्कृष्ट'आहे'पण'आधी'माझ्या'कडून'आणखी'माहिती'घ्या'

स्वमिशिशुविदेह…13/06/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.