स्वस्तिक - भारतीय संस्कृतीचे मंगल प्रतीक


स्वस्तिक हा शब्द सु+अस धातूपासून बनला आहे. सु=शुभ, मंगल व कल्याणप्रद आणि अस=सत्ता, अस्तित्व. म्हणून स्वस्ति= कल्याणाची सत्ता. कल्याण असो किंवा आहेच ही भावना. स्वस्तिक हे प्रसन्नतेचेही द्योतक आहे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून भारतीयांनी सर्वश्रेष्ठ प्रतीक मानून त्याचा जीवनाच्या विविध अंगांत प्रयोग केला आहे.

स्वस्तिक हे भारतीय परंपरेत चतुर्विध पुरुषार्थाचेही सूचक मानले आहे. चारही युगांत स्वस्तिक चिन्ह अक्षुण्ण राहते अशी भारतीयांची श्रद्धा आहे.

स्वस्तिकाचा प्रचार भारतातच नव्हे, तर जगभरच्या बहुतेक देशांत आढळतो. सर्वांत प्राचीन अशा पाषाणयुगापासून स्वस्तिकाचा प्रयोग दृष्टीस पडतो. विदेशांत उत्खननांतून बाहेर काढलेल्या कित्येक वस्तूंवर स्वस्तिक चिन्ह आढळते. मोहेंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले आहे.

स्वस्तिक हे मानवाने निर्माण केलेले सर्वांत पहिले धर्मप्रतीक मानतात. पाऊस पाडणारा इंद्र, मेघांचे संचालन करणारा वायू, प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, मानवाच्या भल्याबु-या वर्तनावर आणि शुभाशुभ कर्मांवर नजर ठेवणारा वरुण अथवा तत्सम दुसरा कोणी तरी देव, ही भूतदात्री वसुंधरा, अशा अनेक देवतांचा स्वस्तिकात एकत्र समावेश झालेला आहे. ते प्रतीक देवतांची शक्ती आणि मानवाची शुभकामना या दोहोंच्या एकत्र सामर्थ्याचे आहे.

एक उभी रेषा आणि तिच्यावर तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा, अशी याची मुळातली आकृती आहे. उभी रेषा ही ज्योतिर्लिंगाची प्रतिनिधी आहे. ज्योतिर्लिंग हे विश्वोत्पत्तीचे मूळ कारण होय. आडवी रेषा ही सृष्टीचा विस्तार दर्शवते.

स्वस्तिकाचा संबंध सूर्याशी जोडलेला आहे. स्वस्तिकाच्या फुलीभोवती एक वर्तुळ काढले की ते सूर्याचे प्रतीक बनते. उभ्या फुलीत एक तिरपी फुली काढली, की त्या आकृतीला आठ आरे तयार होतात. त्यांवर त्रिकोणी टोप्या बसवल्या, की अष्टदल कमळ तयार होते. कमळाचा आणि सूर्याचा प्रकाशय आणि प्रकाशक संबंध प्रसिद्ध आहे. सूर्याचे आणि विष्णूचे अभिन्नत्व मानतात. विष्णूमुळे स्वस्तिकाचे विश्वधारकत्व सूचित होते. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हे विष्णूचे नाभिकमल म्हणजेच सृष्टीकर्त्या ब्रम्हदेवाचे स्थान होय. त्यामुळे स्वस्तिक हे सर्जनात्मक ठरते. फुलीच्या आडव्या रेषेची दोन्ही अग्रे उभी वळवली, की तो त्रिशूल बनतो. त्रिशूल हे शिवाचे आयुध असून तो सृष्टीचा संहारकर्ता आहे. अशा प्रकारे सृष्टी-स्थिती-प्रलय अशा विश्वाच्या तिन्ही अवस्था एकाच स्वस्तिकाच्या भिन्न भिन्न आकृतींनी दिग्दर्शित होतात.

स्वस्तिकाचे डावे आणि उजवे असे दोन प्रकार आहेत. ज्यांच्या भुजांची अग्रे डावीकडे वळवली जातात ते डावे आणि उजवीकडे वळवली जातात ते उजवे. डावे स्वस्तिक कालीचे द्योतक असून, उजवे स्वस्तिक गणेशाचे चिन्ह आहे. महाराष्ट्रात डावे स्वस्तिक रूढ असून, ते प्रदक्षिणा मार्गाला धरून आहे. स्वस्तिकाचे तत्त्वज्ञान ‘सिद्धांत-सार’ नावाच्या ग्रंथात सांगितले आहे. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा विश्वाचा गर्भाशय आहे. त्याचेच नाव सत्. हा मध्यबिंदू जेव्हा रेषांत विस्तार पावतो आणि त्याचा जो व्यास बनतो, ते लिंगरूप तत्त्व होय. ते महायोनीत उत्क्षोभ निर्माण करते आणि उत्पत्तीला प्रेरणा देते. जेव्हा त्यातील रेषा शूलाचा आकार घेतात, तेव्हा जड आणि चेतन अशा अगदी भिन्न तत्त्वांचे अद्भुत मिश्रण होते आणि त्यातून नामरूपात्मक विश्व उदय पावते.

दुसरी उत्पत्तीदेखील स्वस्तिकाची विश्वोत्पत्तीशी संबंध दाखवते. वैदिक परिभाषेत देश आणि काल हे दोन महान यक्ष आहेत. दोहोंच्या शक्ती विश्वात प्रथम एकमेकींशी टक्कर घेतात, संघर्ष करतात आणि शेवटी वैरापेक्षा प्रेम बरे असे मानून परस्पर हातमिळवणी करतात. ही दोन तत्त्वे जिथे मिलनयोग साधतात तो स्वस्तिकाचा तारनबिंदू होय. त्या बिंदूचे नाव आभू म्हणजे अमूर्त सत्तत्व आणि त्याच्या भूजा म्हणजे अभ्य, अर्थात असत् म्हणजेच नामरूपांनी खचून भरलेले जग होय. हे सारे विश्व म्हणजे स्वस्तिकाचा प्रकाश आहे. स्वस्तिकाचा विपर्यास झाला म्हणजे विश्वाची विघटना व्हायला वेळ लागत नाही.

बौद्ध आणि जैन यांनीसुद्धा स्वस्तिक हे पूज्य मानलेले आहे. बौद्धांनी स्वस्तिकापासून पाने आणि फुले यांची उत्पत्ती कल्पिली आहे. बौद्धांच्या उपासनेत स्वस्तिकाची अनेक रूपे आढळून येतात. ते मलाया, जावा, चीन इथपर्यंत जाऊन पोचले आहे. चीनमधील मंदिरे, धवळारे आणि धर्मग्रंथ यांवर स्वस्तिकाच्या आकृती काढलेल्या असतात. बौद्ध मंदिरांतून प्रकाशाची पखरण करणार्‍या दिव्यावरही ते आरूढ होऊन बसले आहे.

जैन लोक जेव्हा एखाद्या देवाचे दर्शन घेतात तेव्हा देवापुढे स्वस्तिक काढून त्यावर दक्षिणा ठेवतात. जैन स्त्रियांना तर स्वस्तिक चिन्ह इतके प्रिय आहे, की देवदर्शनासाठी जाताना त्या ज्या पिशवीतून तांदूळ वगैरे नेतात, तिच्यावरही कशिद्याने स्वस्तिकाची आकृती काढलेली असते.

भारतीय शिल्पकलेत स्वस्तिकाने गौरवाचे स्थान मिळवले आहे. देशातील कित्येक मंदिरे स्वस्तिकाच्या आकारात उभी झाली आहेत. त्या सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर. त्याचा अंतर्भाग स्वस्तिकाकृती निर्मिलेला आहे. काशीतले एक मंदिरही तशाच आकाराचे आहे. उत्पत्तीशी संबंध असलेल्या स्वस्तिकाला प्राचीन काळच्या कोण्या मानववंशाने मृत्यूचीही सोबत करायला लावले आहे.

इरावती कर्वे लिहितात-

महाराष्ट्राच्या दक्षिणेस गेल्या काही वर्षांच्या उत्खननात द्रविडांची विशिष्ट तर्‍हेची थडगी सापडली आहेत. मोठमोठे शिलापट्ट स्वस्तिकावर एकमेकांशी जोडून, एक पेटी तयार करून त्यात मृतांचे अवशेष ठेवलेले आढळतात.

स्वस्तिकाचा अशा प्रकारे प्राचीन काळापासून सार्वभौम अधिकार आहे. मानवाने निर्माण केलेले ते आशयगर्भ असे मंगल प्रतीक आहे. म्हणूनच ते विवाहप्रसंगी अंतरपाटावर कुंकवाने रेखाटतात. काही ठिकाणी, जन्मलेल्या अर्भकाला सठीच्या दिवशी स्वस्तिक रेखलेल्या वस्त्रावर निजवतात. वियोग झालेल्या प्रियजनांचा पुनश्च संयोग व्हावा म्हणूनही स्वस्तिकाची पूजा करण्याची चाल आहे. स्वस्तिक हे शांती, समृद्धी आणि मांगल्य यांचे प्रतीक असल्यामुळे कित्येक सुवासिनी चातुर्मासात स्वस्तिकव्रत करतात. त्यात रोज स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची असते. चातुर्मासात देवघरात देवापुढे स्वस्तिक आणि अष्टदळ यांची रांगोळी काढणा-या स्त्रीला वैधव्याचे भय उरत नाही, असे पद्मपुराणात सांगितले आहे.
 

(संकलन : राजेंद्र शिंदे)

लेखी अभिप्राय

फार चांगली व स

शंकर तुकाराम डोंबे20/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.