राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना........


मनाची ती थरथर कधीच विसरणे शक्य नाही....

- मनोहर वि. नरांजे

 

मनोहर नरांजे यांचे वय केवळ एक्केचाळीस वर्षांचे आहे. ते नोकरीला लागताना मॅट्रिक होते. नंतर त्यांनी एम,ए.,पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा विषय पुरातत्त्वविद्या. त्यालाही निमित्त झाले ते अरम गावाचे. नरांजे यांची पहिली नोकरी या गावी होती. तेथे सातवाहनकालीन बरेच अवशेष मिळतात. नरांजे यांनी विद्यार्थ्यांना घेऊन या अवशेषांचा शोध घेण्याचे काम आरंभले. त्यासाठी शाळेमध्ये इतिहासवर्ग संग्रहालय निर्माण केले.
 

त्याआधीच्या खोबणा गावातील नोकरीमध्येही त्यांनी शासनाच्या निर्मलग्राम योजनेचा सक्रिय पुरस्कार केला. त्यांच्या गेल्या वीस वर्षांच्या शिक्षकी नोकरीमधील या कामगिरीकरताच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. नरांजे उत्तम कविता करतात आणि नागपूरमधील कविसंमेलनांत त्यांचा बर्‍याच वेळा सहभाग असतो.
 

महाराष्ट्रातून एकोणतीस प्राथमिक आणि नऊ माध्यमिक शिक्षकांना यंदा शिक्षकदिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार देताना शिक्षकाचे प्रकाशित साहित्य, त्याचा समाजाशी संपर्क, त्याने विद्यार्थ्यांसाठी केलेले उपक्रम आणि त्याचे कृतिसंशोधन या बाबी पाहिल्या जातात.

नवी दिल्ली येथील विज्ञानभवन. देशभरातील सगळ्या राज्यांतील पुरस्कारविजेते शिक्षक एकत्र आले होते. त्यांच्या सोबत त्यांचे जोडीदारही. सुदूर सीमावर्ती राज्यांसह लक्षद्वीप व अंदमान–निकोबार द्वीपसमुहात कार्यरत शिक्षक समारंभास आवर्जून उपस्थित होते. सरकारी, खाजगी, राज्यशासन संचालित शाळा, केंद्रीय विद्यालये, रेल्वे व सैनिकी शाळा अशा सर्व प्रकारांतील प्राथमिक व माध्यमिक स्तरांवरील शिक्षकांचा पुरस्कारविजेत्या शिक्षकांमधे समावेश. त्यांपैकी काहीजण आपल्या स्थानिक वेषभूषेमुळे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत. समारंभास विविध खात्यांमधील राजकीय अतिथी व देशभरातील प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधीही मोठ्या प्रमाणात हजर.
 

विज्ञानभवन सुरक्षारक्षकांच्या वेढ्यात कडेकोट. त्यांतील विशाल बंदिस्त सभागार आणि पुष्परचनांनी अलंकृत केलेले भव्य व्यासपीठ. ते असंख्य विद्युतदीपांनी झगमगलेले. वातावरणात उकाडा जाणवू लागतो. दिवे, लोकांचे येणेजाणे यांमुळे वाढणार्‍या उष्णतेबरोबरच प्रत्येक अॅवार्डीच्या मनात वाढत चाललेली उत्कंठा.....
 

आदल्या दिवशी झालेल्या रंगीत तालमीच्या वेळी अधिकार्‍यांनी प्रत्येक बाब तपशिलवार समजावून दिली होती. प्रत्येकाची बैठकव्यवस्था, अनुक्रमांक, पाळायचे शिष्टाचार आणि टाळायच्या बाबी यांचीही अनेकदा उजळणी झाली होती.
 

व्यासपीठावर मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल, राज्यमंत्री ई अहमद, उपमंत्री डॉ. पुरंदेश्वरी व उपराष्ट्रपती देवीसिंह शेखावत हे मान्यवर उपस्थित. प्रतीक्षा होती ती महामहीम राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची. राष्ट्रपतींच्या आगमनाबरोबर राष्ट्रगीताने समारंभास सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपर्‍यातून एकत्रित झालेल्या प्रतिनिधींच्या मुखातून स्रवणारे राष्ट्रगीताचे सामुहिक स्वर सभागृहात घुमू लागले आणि सारे सभागृह देशभावनेने न्हाऊन निघाले. तो भारावलेपणा मग सबंध समारंभात कायम राहिला.
 

मानव संसाधन मंत्रालयाचे राज्यमंत्री ई अहमद, उपमंत्री डॉ. पुरंदेश्वरी, कॅबिनेट मंत्री कपिल सिब्बल यांची भाषणे झाली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचा भावूक क्षण येऊन ठेपला. ऊर आनंदाने भरून जावा, स्वत:लाच स्वत:चा अभिमान वाटावा असा क्षण: भारतीय गणराज्याच्या सर्वोच्चपदी विराजमान असलेल्या राष्ट्रपतींनी आपणास पुरस्कृत करावे; गावखेड्यात, पाड्यापोडात केलेल्या आपल्या शैक्षणिक उपक्रमांची दखल घ्यावी; कौतुकाने दोन शब्द बोलावे.... कृतार्थतेचा क्षण आणखी वेगळा कसा असेल? पुरस्कारस्वरूपात प्राप्त होणारे पदक, प्रमाणपत्र, पैसा, पगारवाढ, पदोन्नती, प्रतिष्ठा यांचा स्वीकार..... एखाद्या आव्हानास सामोरे जावे तसा मी त्या क्षणांना सामोरा गेलो.

 

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून  स्वीकारताना नागपूरच्या कुही तालुक्यातील खोबना-अडम-मांढळ येथील शाळांमधून माझी सृजन शिक्षणयात्रा दिल्लीच्या राजपथावर पोचली होती. ती पुन्हा रानवाटेवरच परतणार आहे याची जाणीव मनात होती. मी स्वत:ला ते सत्य सांगत पुरस्कार स्वीकारला. पण ते क्षण विलक्षण उत्कट होते. मनाची ती थरथर मी कधीच विसरणे शक्य नाही.
 

समारंभापूर्वीच्या रिहर्सलमधे ‘राष्ट्रपतींच्या फार जवळ जायचे नाही. पाया पडायचे नाही, बोलायचे नाही. घोषणा-नारे द्यायचे नाहीत, कवितेच्या ओळी म्हणायच्या नाहीत’ अशा अनेक सूचना वारंवार दिल्या गेल्या होत्या. उलट दिल्ली-प्रवासाच्या अगोदर भेटलेले काही शिक्षकमित्र चर्चेत म्हणाले होते, की राष्ट्रपतींशी मराठीतूनच बोला. मिळालेल्या सूचना ऐकून राष्ट्रपतींशी काही संवाद होऊ शकेल असे मुळीच वाटत नव्हते. पण तसे व्हायचे नव्हते, महाराष्ट्राच्या पुरस्कार विजेत्यांची सुरुवात माझ्यापासून झाली. मी व्यासपीठावर जवळ जाताच राष्ट्रपती महोदयांनी स्वत: मायबोलीतून विचारले,

''कुठून आलात?''

''नागपूरहून.''

''अभिनंदन! तुमचं.''

''आभार, ताई.''

राष्ट्रपतींशी झालेला हा छोटासा संवाद मनाला मोठा आनंद देऊन गेला. आमच्यात एकाच मातृभाषेचे समान सूत्र होते, म्हणून हा संवाद साधता येणे शक्य झाले. हा बंध मला दिवसभर अभिमानाचा वाटत राहिला.
 

मी तिरंगी फितीत बांधलेले रौप्यपदक आणि प्रमाणपत्र राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारून व्यासपीठावरून परतलो. राष्ट्रपतींनी स्वहस्ते ‘अॅवार्डीं’ना पदके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले व नंतर उपस्थितांना उद्देशून भाषणही केले. राष्ट्रपती आपल्या छोट्याशा भाषणात शिक्षकांचा उल्लेख करताना म्हणाल्या, “एक साधारण शिक्षक ‘शिकवतो’, चांगला शिक्षक ‘व्याख्या करतो’, उत्तम शिक्षक ‘उदाहरणे देऊन समजावतो’, तर महान शिक्षक ‘आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो.
 

“आम्हास विश्वातील सर्वांत बुद्धिमान व्यक्तींशी स्पर्धा करण्यास सज्ज व्हायचे आहे. त्याकरता ज्ञानाचा आणि मूल्यांचा सुदृढ आधार असणे आवश्यक आहे. यासाठीच शिक्षकांना सहयोग आणि सन्मान दिला गेला पाहिजे आणि शिक्षकांनीसुद्धा आपल्या जबाबदार्‍या पूर्ण करत त्या सन्मानास पात्र झाले पाहिजे.”

प्रतिभा पाटील यांनी, पुढील तीन मुद्यांना विशेष महत्त्व दिले:

* शिक्षणाचे ध्येय आहे ज्ञानप्राप्ती, वैश्विक ज्ञान प्राप्त केले जावे.

* मूल्यरहित ज्ञान पांगळे आहे. मूल्यप्रणालीच तरूणांना जबाबदार नागरिक बनवू शकेल.

* परस्परसहकार्याने विधायक कार्य करण्याची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. व्यक्तिगत उपलब्धीबरोबरच टिमवर्क करण्यास सक्षम होणेही आवश्यक आहे.

केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी देशभक्तीपर गीते सादर करून समारंभाची रंगत वाढवली, आभारप्रदर्शनानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी झालेली सदिच्छा भेट ही या सोहळ्याची आणखी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी. भेट पुरस्कार ग्रहण करण्याच्या अगोदर सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान झाली. सुरक्षा रक्षकांनी वेढलेल्या पंतप्रधानांच्या निवासात प्रवेश करण्यापूर्वी विविध तपासण्यांना सामोरे जावे लागले. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरील हिरवळीवर भेट झाली. भेटीपूर्वी शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला. भेटीत पंतप्रधानांनी सर्व शिक्षकांना हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून संबोधित केले. शाळांमधील भौतिक सुविधांसोबतच मूल्यवृद्धीही झाली पाहिजे हे त्यांच्या बोलण्याचे सूत्र होते. निष्ठापूर्वक कार्य करणारे शिक्षक आपल्या राष्ट्राला प्रगतिपथावर नेत असतात. राष्ट्र अशा शिक्षकांचे सदैव ऋणी राहील असेही ते म्हणाले. मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल व राज्यमंत्री ई अहमद हे या भेटीच्या वेळी उपस्थित होते. शिक्षकांनी फोटोसुद्धा काढले. पतंप्रधानांचे शांत, सोज्वळ व्यक्तिमत्त्व मनाला भुरळ घालणारे होते.
 

पुरस्कारविजेत्या शिक्षकांना राज्य अतिथींचा दर्जा दिलेला होता. निवास, भोजन व प्रवासाच्या सुविधा त्या दर्जानुसार होत्या. निवासाची सुविधा हॉटेल रॉयल प्लाझा व हॉटेल जनपथ येथे करण्यात आलेली होती. माझ्यासह बहुतेकांची सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेली ही पंचतारांकित हॉटेल्स पाहण्याची बहुधा पहिली वेळ असावी. पुरस्कारविजेत्या शिक्षकांसाठी राष्ट्रपती भवन, मुगल गार्डन व कुतुबमिनार बघण्याची विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल, विविध संग्रहालये व मुगल गार्डन यांचे मनोहारी दर्शन अविस्मरणीय आहे. राष्ट्रपती भवनातील किचन वेअर म्युझियम, मार्बल व पेंटिंग गॅलरी, राष्ट्रपतींना प्राप्त भेटवस्तूंचे संग्रहालय, माजी राष्ट्रपतींच्या प्रतिमा व चित्रे, ब्रिटिशांनी भारतीयांना सत्ता हस्तांतरित केली तो दरबार हॉल, तेथील कुषाणकालीन मथुरा येथून प्राप्त बुद्धप्रतिमा इत्यादी बाबी जिज्ञासूंनी अवश्य बघण्यासारख्या आहेत. राष्ट्रपती भवनाचे बाह्य अवलोकनच बहुधा होते. ब्रिटिश व भारतीय कलेचे मिश्रण असलेल्या त्या भव्य वास्तूचे अंतरंगही या निमित्ताने बघता आले.

सर्व शिक्षकांना पुरस्कारविजेत्यांची नामनिर्देशन पुस्तिका वितरीत करण्यात आली आहे. त्यात 301 शिक्षकांची नावे, शालेय पत्रे व फोटोग्राफसह नोंदलेली आहेत. त्यासोबतच शालोपयोगी लिखित साहित्यही वितरीत करण्यात आले. हे साहित्य राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषदेद्वारे (N.C.E.R.T.) प्रकाशित केल्या गेले आहे. सर्व शिक्षकांनी परस्परांचा भावपूर्ण निरोप घेऊन सहा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता परतीचा प्रवास सुरू केला.
 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारणे ही अभिमानाची, आनंदाची, गौरवाची बाब तर खरीच; पण त्याहीपेक्षा अधिक ती जबाबदारीची बाब आहे. बहुधा हा पुरस्कार सेवेच्या उत्तरार्धात मिळतो परंतु मला तो सेवेच्या मध्यावरच मिळाला. त्यामुळे पुरस्काराचा सन्मान दीर्घकाळ कायम राखणे ही महान जबाबदारी आहे असे मला वाटते. ती पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या सदिच्छा व सहकार्याची मला कायमच गरज भासेल.
 

‘यशाचा शॉर्टकट नसतो’ यशापर्यंत पोचणारी वाट आपणास शेवटपर्यंत चालावीच लागते. तरच ते यश चिरस्थायी राहते. अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी (यश) आपणास मिळत नाहीत म्हणून आपण खंतावतो, निराश होतो. आपल्या माणूस असण्याचीच ती पावती असते. पण कदाचित आपण अधिक श्रेष्ठ बाबींचे हक्कदार असू, म्हणून चिल्लर गोष्टी आपणास मिळत नाही. असा विचार आपणास या नैराश्याच्या वेळी बळ देऊ शकतो. मीही अशा अनेक प्रसंगांना सामोरा गेलेलो आहे. श्रेष्ठ व चिरस्थायी गोष्टी सरळ मार्गाने मिळत असतात असा माझा विश्वास आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना तो अधिक दृढ झालेला आहे.

मनोहर वि. नरांजे, नागपूर, - भ्रमणध्वनी : 9767219296, इमेल- manoharnaranje@yahoo.in

पत्‍ता- सरस्‍वती नगर, बहादूरा फाटा, पोस्‍ट विहीर गाव (उंबरेड रोड), तालुका-जिल्‍हा नागपूर, पिन कोड – 440025
शाळेचा पत्‍ता - जिल्‍हा परिषद हायस्‍कूल, मांढळ, तालुका कुही, जिल्‍हा नागपूर – 441210

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.