बाबा आढाव - समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात


- अन्वर राजन

डॉ. बाबा आढाव यांना टाईम्‍स ऑफ इंडियाकडून जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला. हा पुरस्कार देणा-यांचाच गौरव आहे! एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत. ते असंघटित कष्‍टक-यांचे नेते म्हणून परिचित आहेत. बाबा समाजात धर्माच्या नावाने विषमता टिकवू पाहणा-या, धर्माच्या नावाने दंगली घडवू इच्छिणा-या मंडळींच्या विरुद्ध आयुष्यभर लढत आहेत. त्यांनी या क्षेत्रात केलेले कार्य हे अतुलनीय आहे.

- अन्वर राजन

 

डॉ. बाबा आढाव यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार ’ जाहीर झाला, हा पुरस्कार देणा-यांचाच गौरव आहे! एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत. ते असंघटित कष्टक-यांचे नेते म्हणून परिचित आहेत. त्यांनी त्या क्षेत्रात केलेले कार्य हे अतुलनीय आहे. त्यांचा आणि माझा स्नेह सदतीस वर्षांपेक्षा जास्त जुना आहे, तेव्हापासून  हमालांच्या जीवनात झालेले आमूलाग्र बदल जवळून बघण्याची संधी मला मिळाली.

 

संघर्षमय जीवन

बाबासाहेब पांडुरंग आढाव, वय 81

जन्मवर्ष – 1936, जन्मस्थळ – पुणे

शिक्षण – आयुर्वेदिक डॉक्टर. कुटुंब - पत्नी शीला, दोन मुलगे व तीन नातवंडे

मामाने त्यांना राष्ट्र सेवा दलात नेले. तेव्हापासून त्यांनी समाजवादी विचारांची कास सोडलेली नाही.  म. गांधी, ज्योतिराव फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव. त्यातूनच ‘एक गाव एक पाठवठा’ ही महाराष्ट्रात गावोगाव समतेची चळवळ.

पहिला सत्याग्रह- भाववाढीविरुद्ध - 1952 साली. त्यावेळी झालेल्या तुरुंगवासानंतर आतापर्यंत बावन्न-त्रेपन्न वेळा काही दिवस वा महिने कोठडीत काढावे लागले आहेत. शेवटचा कारावास-मे 2008, पुन्हा भाववाढीविरुद्ध मोर्च्यातील सहभागासाठी न्यायालयीन कोठडी.

हमाल पंचायतीचा पहिला संप – 1956

महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर मानवी कष्टकरी-कायदा व्हावा यासाठी अविरत प्रयत्न, अखेर कायदा 1969 मध्ये झाला. असंघटित कामगारांना संरक्षण मिळवून देणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.

हमाल पंचायतीची मोफत शाळा आहे व वैद्यकीय सुविधा केंद्र आहे.

‘कष्टाची भाकर’ हा सर्वसामान्य माणसास माफक दरात पोषक अन्न देणारा उपक्रम. रोज पंधरा हजार लोक लाभ घेतात.

   

मी त्यावेळी पुण्यातील भवानी पेठेत राहत असे. माझे वडील गूळ अळीमध्ये गुळाच्या व्यापा-याकडे दिवाणजी म्हणून काम करत होते. त्या दुकानातील हमाल आमच्या घरी येत असत. त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. बाबांची हमाल पंचायत सुरू झाली होती व वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांचे लढे सुरू झालेले होते. तेव्हापासून हमालांच्या आयुष्यात अनेक बदल झालेले आहेत. आज, धान्यबाजारातील हमाल असोत, की रेल्वे प्लॅटफोर्मवर काम करणारे लाल डगलेवाले असोत, ते झोपड्यांतून पक्क्या घरांत राहायला आले आहेत. त्यांची मुले शिकून ब-यापैकी पुढे गेलेली आहेत. बैलगाडी चालवणारे हमाल स्वत:च्या टेम्पोचे मालक झालेले आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन हजारांची मर्यादा ओलांडून लाखांच्या घरात गेलेले आहे. ही सारी किमया आपोआप किंवा एका रात्रीत घडलेली नाही, तर हे यश म्हणजे बाबा आढावांच्या अविरत संघर्षाचे आणि कुशल नेतृत्वाचे फळ आहे.

 

इंदिरा गांधी यांनी देशभर सुरू असलेले संपूर्ण क्रांती आंदोलन दडपण्यासाठी १९७५ साली आणीबाणी जाहीर केली होती. जयप्रकाश नारायण यांच्यासहित देशातील अनेक नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती व कार्यकर्ते तुरुंगात होते. मी त्या वेळी कॉलेजमध्ये शिकत होतो. पण आंदोलनातही सक्रिय होतो, त्यामुळे मलाही येरवडा तुरुंगात जाण्याची संधी मिळाली. तिथे मला अनेक नेत्यांसहित बाबा आढाव यांचाही सहवास लाभला. आमची आधी ओळख होतीच, ती अधिक दृढ झाली.

 

बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पाहायला मिळाले. त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रभाव असल्याचे माझ्या लक्षात आले. फुले यांचे ‘अखंड’ त्यांच्या तोंडून ऐकणे म्हणजे पर्वणीच असायची! पण ते फक्त गात नसत तर लोकांच्या कडून ते म्हणवून घेत असत. त्यांची ही सवय कायम आहे. त्यांना गाण्याची आवड आहे आणि ते अवगतपण आहे. वसंत बापटांची  कविता  ‘आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई,  जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही’ हेही गाणे त्यांच्या आवडीच्या गाण्यांपैकी आहे. त्यांनी ते अनेक सभांमध्ये लोकांच्या कडून म्हणवून घेतले आहे. आकाशवाणीवरून महात्मा फुले यांचे ‘अखंड’ प्रसारित व्हावे यासाठी ते गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत.

 

हमाल पंचायत ही एका अर्थाने कामगार संघटना आणि त्यांनी फक्त हमाल नव्हे तर बांधकाम मजूर, मोलकरीण, टेम्पोचालक. रिक्षा चालवणारे अशा अनेकविध कामगार संघटना निर्माण केल्या व त्या त्या गटांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कष्टक-यांची ही चळवळ त्यांनी पुणे किंवा महाराष्ट्र एवढ्यापुरती मर्यादित न ठेवता त्यांनी हे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर नेले. असंघटित कष्टक-यांना सामाजिक सुरक्षा कायदा लागू करून त्यांना पेन्शनसारख्या सुविधा मिळवून देण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण हे करत असताना, त्यांनी समाज प्रबोधनाकडे विशेष लक्ष दिलेले आहे. त्यांनी महात्मा फुले यांची सत्यशोधक समाजाची चळवळ पुढे नेण्याचे प्रयत्न सतत केलेले आहेत. महात्मा फुले समता प्रतिष्ठान स्थापन करून, फुले आणि त्यांचे समकालीन सहकारी यांचे वैचारिक साहित्य गोळा करून ते प्रकाशित करण्याचे व त्या मध्ये संशोधन करणा-यांना आधार देण्याचे काम त्यांनी या प्रतिष्ठानतर्फे केलेले आहे. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ सुरू करून ती खेडोपाडी पोचवण्याचे, ख-या अर्थाने क्रांतिकारक काम त्यांनी केलेले आहे. त्यांनी यज्ञामध्ये धान्य आणि तूप जाळले जाते या मुद्यावरून, काही वर्षांपूर्वी एका महायज्ञाला विरोध केला होता तर वारक-यांच्या पालखीच्या क्रमवारीमध्ये जातिभेद पाळला जातो, म्हणून त्यांनी सत्याग्रह करून तुरुंगवास भोगला होता. बाबांनी देवदासीच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचेही काम केले. त्यांनी देवदासी व वेश्या यांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायामधून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करावे, त्यासाठी कायदा करावा ही चळवळ केली आणि त्यात ब-यापैकी यश पण मिळवले.

 

बाबा आढाव यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड सहा जणांच्या समितीने केली. त्यामध्ये नितीश कुमार (बिहारचे मुख्यमंत्री व समितीचे अध्यक्ष), अरुणा रॉय, जयराम रमेश, नंदन निलकेणी, सुनिता नारायण, दीपक पारेख या मान्यवरांचा समावेश होता. टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट अॅवार्डस या नावाने वेगवेगळ्या क्षेत्रांत काही व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार जाहीर झाले. पुरस्कार वितरण समारंभ 2 ऑक्टोबरला आहे.

 

त्यांनी समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये कार्यरत असलेले विविध गट एकमेकांना भेटावे, त्यांच्यात समन्वय व्हावा या हेतूने विषमता निर्मुलन शिबिरे भरवली. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळे खुले करण्यासाठी केलेल्या सत्याग्रहाला १९७७ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने विषमता निर्मुलन समिती तयार करण्यात आली होती. त्या मार्फत ही शिबिरे घेतली गेली. जवळपास बारा-तेरा वर्षे सातत्याने झालेल्या या शिबिरांमध्ये त्या त्या वेळचे अनेक सामाजिक प्रश्न, आंदोलने यांची चर्चा होत असे. त्यातूनच पुढे ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ची स्थापना होऊन त्या मार्फत गेली जवळपास पंचवीस वर्षे अनेक कार्यकर्त्यांना नियमित स्वरूपात मानधन दिले जाते. बाबांचे कार्यालय म्हणजे अनेकविध प्रवृत्तींचे आणि आंदोलनांचे केंद्र होय. बाबा समाजात धर्माच्या नावाने विषमता टिकवू पाहणा-या, धर्माच्या नावाने दंगली घडवू इच्छिणा-या मंडळींच्या विरुद्ध आयुष्यभर लढत आहेत. बाबांची कामगार नेता म्हणून ओळख लोकांना आहेच; पण ती अधुरी होईल. बाबा समाज परिवर्तनाच्या आंदोलनातले नेते आहेत. मला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यांचा सहवास दीर्घ काळ लाभला म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा.

   

अन्वर राजन, पुणे : rajanaaa@gmail.com 

   

बाबा आढाव यांच्‍याशी संबंधित लेख –

 

They Make India A Better Place 
Labour's MESSIAH: BABA ADHAV  
एक गाव एक पाणवठा  
कष्‍टक-याचे बाबा

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.