डॉ. पद्मजा घोरपडे - आनंदमग्न साहित्ययात्री


- नेहा काळे

पुण्यातील स. प महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणा-या डॉ. पद्मजा घोरपडे यांचा केवळ तेवढा परिचय पुरेसा नाही. हिंदी साहित्यात मनमुक्त संचार करणा-या आनंदमग्न साहित्ययात्री हा त्यांचा परिचय अधिक उचित ठरेल. घोरपडे यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे त्यांचे हिंदी साहित्यावरचं, साहित्यकारांवरचं प्रेम. त्या हिंदी साहित्‍यीक, सूफी संत आणि त्यांचं साहित्य याबद्दल इतकं भरभरून बोलतात, की महत्प्रयासानं त्यांच्या स्वत:च्या कामाकडे गाडी वळवावी लागते. या सर्व साहित्यकारांचं ऋण त्या मनोभावे मानतात आणि म्हणूनच त्यांच्या लेखनात प्रांजलता दिसून येते.

- नेहा काळे

 

पुण्यातील स. प महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणार्‍या डॉ. पद्मजा घोरपडे यांचा केवळ तेवढा परिचय पुरेसा नाही. हिंदी साहित्यात मनमुक्त संचार करणार्‍या आनंदमग्न साहित्ययात्री हा त्यांचा परिचय अधिक उचित ठरेल.

 

घोरपडे यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे त्यांचे हिंदी साहित्यावरचं, साहित्यकारांवरचं प्रेम. त्या प्रेमचंद , कमलेश्वर , सूर्यकांत त्रिपाठी (निराला), निर्मल वर्मा, जयशंकर प्रसाद, सुमित्रानंदन पंत, महादेवी वर्मा, मुक्तिबोध, कबीर आणि सूफी संत आणि त्यांचं साहित्य याबद्दल इतकं भरभरून बोलतात, की महत्प्रयासानं त्यांच्या स्वत:च्या कामाकडे गाडी वळवावी लागते. या सर्व साहित्यकारांचं ऋण त्या मनोभावे मानतात आणि म्हणूनच त्यांच्या लेखनात प्रांजलता दिसून येते.

 

घोरपडे यांचा जन्म क-हाडचा, पितृछत्र लहानपणीच हरपलं. आईचा प्रभाव खूप आहे. आईच्या नोकरीनिमित्त क-हाड–इस्लामपूर-पाचगणी अशा ठिकाणी शालेय शिक्षण पूर्ण झालं. आई हिंदीची शिक्षिका आणि घरी राष्ट्रभाषा परीक्षांचे वर्ग! त्यामुळे लिहिता-वाचताही येण्याआधी त्या हिंदी बोलायला शिकल्या. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर मात्र प्रत्यक्षात इतिहास, भूगोल, मानसशास्त्र असे विषय अभ्यासासाठी निवडले. दरम्यान काही स्पर्धांच्या निमित्तानं त्यांचं मराठी आणि प्रसंगी हिंदी-इंग्रजीतूनही किरकोळ लिखाण सुरू असे. त्यांनी एम.ए.चं एक वर्षदेखील इतिहास विषय घेऊन पूर्ण केलं. मग मात्र त्यांचं मन त्या अभ्यासात रमेना. त्यांनी बालपणातच मैत्री झालेल्या हिंदी भाषेला पुन्हा आपलंसं केलं आणि पुणे विद्यापीठा तून हिंदी घेऊन एम.ए. केलं.

 

 

त्याच अभ्यासादम्यान हिंदी साहित्याविश्वानं आणि साहित्यिकांनी त्यांना संमोहित केलं. त्या संमोहनाचं गारुड उतरलं तर नाहीच, उलट गडद होत गेलं. त्यांनी हिंदी साहित्यात पीएच.डी. केली. सूर्यकांत त्रिपाठी (निराला) आणि मुक्तिबोध यांच्या काव्याचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव आहे. त्यातून त्यांनी कवितालेखनाला सुरुवात केली. त्यांचं ‘जख्मों के हाशिए’ हे पहिलं पुस्तक 1991 साली प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकाला 1993 साली केंद्रीय हिंदी निदेशालयाचा ‘अहिन्दीभाषी हिंदी लेखक’ पुरस्कार मिळाला.

 

घोरपडे यांच्या नावावर चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, एक चरित्रग्रंथ आणि भाषाविषयक, समीक्षात्मक लेखनासह संपादनकार्य, शोधनिबंधलेखन अशी लेखनसंपदा जमा आहे.

 

त्यांचं अनुवादाचं कार्यही मोठं आहे. रॉय किणीकर या अत्यंत मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा वेध त्यांनी ‘सुनो भाई साधो’ या त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रग्रंथात घतला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकीच त्यांच्या ‘उत्तररात्र’ची मोहिनीही घोरपडे यांच्यावर पडली आणि त्यांनी ‘उत्तररात्र’ हिंदीत साकार केली. त्यांनी मराठीतील आणखी एक शिवधनुष्य पेलून हिंदीत उतरवलं आहे. ते म्हणजे विजय तेंडुलकरां चं साहित्य. त्यांनी त्यांचं ‘कादंबरी-2’ हे पुस्तक आणि सहा नाटकं हिंदीत अनुवादित केली आहेत. तेंडुलकरांचं मूळ साहित्य वाचणार्‍य आणि आकळणार्‍या वाचकांना हे काम किती कठीण आहे याची कल्पना येऊ शकेल. त्या त्यांच्या ‘कमला’चा अनुवाद करण्यात मग्न आहेत. घोरपडे यांनी वैशाली हळदणकर यांच्या ‘बारबाला’ या आत्मकथनाचा अनुवाद केला आहे.

 

घोरपडे यांच्या मते, अनुवाद करण्याचं काम कठीण वाटत असलं, तरी माणसांच्या मनाची निरगांठ उकलता आली की सगळं सोपं होऊन जातं. अभिव्यक्तीचं माध्यम वेगळं असलं तरी मानवी स्वभाव, भावना, संघर्ष, मूल्यं यांत आंतरिक समानता आहे. या समानातेचं सूत्र गवसलं की अनुवाद सोपा होऊन जातो.

 

घोरपडे यांचा केंद्रीय निदेशालयाच्या योजनांमध्ये सहभाग नेहमी राहिला आहे. यामध्ये अहिंदीभाषिक प्रदेशांमध्ये नवोदित हिंदी लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जातात. भारतभरात होणा-या अशा कार्यशाळांमध्ये त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून सहभाग घेतला आहे. भारतभरातील विविध प्रांतांचा, तेथील जीवनशैलींचा, भाषावैविध्यांचा, संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात येणा-या अध्ययनयात्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. घोरपडे यांच्या कथासाहित्यात प्रादेशिक परिवेशाचा अनुभव वाचकांना चाखायला मिळतो. घोरपडे सांगतात, की हिंदीनं मला व्यक्ती म्हणून समृद्ध केलं. प्रांतांच्या सीमा, परकेपणाच्या भिंती गळून पडल्या. अगदी दक्षिण भारतातही हिंदीला विरोध होत नाही आणि स्वागताची, आदराची वागणूक मिळते हा अनुभवही त्यांना मिळाला. पुण्यात असतानाही ओरिसातला पूर आणि तिस्ता नदीच्या पाण्यावरून चाललेला वाद या गोष्टी त्यांना घरातल्या प्रश्नांइतक्याच व्यथित करतात.

 

त्या गेली सात वर्ष सतत्यानं जर्मन विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याचं कामही करत आहेत. त्यांचं उल्लेखनीय काम म्हणजे 1960 नंतरच्या हिंदी कवितेचा लिखित इतिहास; त्या अभ्यासाचं, संकलनाचं आणि टिप्पणीचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं ते लेखन प्रकाशनाच्या वाटेवर आहे,

 

त्यांनी काही सन्मान मिळाले आहेत.

 

* आंतरराष्ट्रीय कला एवं संस्कृति परिषद, नजीबाबाद चा पुरस्कार

 

* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चा गिरिजा शंकर जांभेकर पुरस्कार

 

* महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्याकडून 2008चा सर्वोत्कृष्ट अनुवाद पुरस्कार हे त्यातील प्रमुख

   

नेहा काळे, भ्रमणध्‍वनी – 7387092597

 

पद्मजा घोरपडे - पत्‍ता- 1/21, लीला पार्क सोसायटी, शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड, पुणे – 411038

 

9850056669, दूरध्‍वनी – 02025391004

padmajaghorpade@yahoo.com
 

पद्मजा घोरपडे यांची वेबसाइट- www.Padmajaghorpade.com

संबंधित लेख
पद्मजा घोरपडे यांचे लेखन आणि सन्‍मान 
डॉ. दामोदर खडसे 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.