‘देऊळ’ची अगाध लीला


‘देऊळ’ हा मराठी चित्रपट पाहत असताना ‘पिपली लाईव्ह ’ या हिंदी चित्रपटाची आठवण वारंवार होत होती, याचे कारण दोन्ही ठिकाणी आजच्या परिस्थितीतील विसंगतींचा हास्यकारक पद्धतीने शोध घेतला आहे. चित्रपटात प्रत्येक जागी हसताना हसावे की रडावे असा प्रश्न मनात निर्माण होत होता. ते उत्तम ब्लॅक कॉमेडीचे लक्षण आहे. ‘देऊळ’ पाहताना गदगदा हसू आले, तरी थिएटरबाहेर पडताना प्रेक्षक अंतर्मुख झालेला असतो. कोणत्याही चांगल्या कलाकृतीचा परिणाम हाच असतो.

 

‘देऊळ’ पाहताना त्याचे दोन विशेष जाणवतात- गिरीश पांडुरंग कुळकर्णी यांचे लेखन आणि सुधाकर रेड्डी यांनी कॅमेर्‍यामधून केलेले काम. येथे मी दिग्दर्शक उमेश कुळकर्णी याचे नाव घेतलेले नाही. हेदेखील विसंगतच ठरते, की चित्रपट बघितल्यानंतर दिग्दर्शकाची कामगिरी नजरेत न भरणे! परंतु गिरीश कुळकर्णी यांनी चित्रपट चटपटीतपणे, परिस्थितीवर नेमके भाष्य करत लिहिला असल्याने तो प्रेक्षकाला खेचून नेतो.

 मंगरूळ नावाच्या गावात तेथील ग्रामसभा गावपरिसरात रुग्णालयाऐवजी दत्ताचे मंदिर बांधायचे ठरवते, त्यामुळे गाव हे यात्रेकरूंचे तीर्थस्थान बनते, पर्यटकांचे आकर्षण ठरते आणि गावाची भरभराट सुरू होते. चित्रपटात गाव हेच पात्र असल्यामुळे गावातील सारे लोक कमी जास्त महत्त्वाने चित्रपटभर व्यक्त होत असतात. तरी प्रमुख पात्रे तीन. एक भोळाभाबडा केशव (गिरीश कुळकर्णी). त्यालाच दत्त ‘दिसतो’. दुसरे भाऊ (नाना पाटेकर). ते गावचे राजकारणी. गावची सरपंच स्त्री असली तरी सूत्रे भाऊंच्या हाती. तिसरे अण्णा (दिलीप प्रभावळकर). ते समंजस, विचारी. त्यांचाच गावात रुग्णालय बांधण्याचा बेत असतो. भाऊ विकासाचे राजकारण जाणणारे आहेत. त्यामुळे त्यांचा रुग्णालयाला पाठिंबा आहे. पण तरुणांचा ‘देऊळ’ बांधण्याचा संकल्प व त्याला गावाचा पाठिंबा आहे हे पाहून भाऊ पलटी घेतात व देवळाच्या संकल्पात हिरीरीने, त्याचे सर्व फायदे उठवत सामिल होतात. पुन्हा गावच्या पाठिंब्यावर आमदार बनतात.
 

 चित्रपटातील छोटे छोटे कल्‍पकतापूर्ण प्रसंग आणि त्‍यातून व्‍यक्‍त होणा-या गोष्‍टी अतिशय बोलक्‍या आहेत. गावाकडे बेकारी वाढली आहे. त्यामुळे निरुद्योगी तरुण खूप आहेत. त्यांचे चाललेले चाळे, टीव्हीवरील मालिकांनी समाजाला लावलेले वेड, राजकारणी भाऊंच्या बायकोची सत्ता- त्या दोघांचे गमतीदार खेळ, भाऊंनी सफाईने टोल चुकवणे, अण्णांची संवेदनशीलता- त्यासाठी बासरीचा वापर, पुरातत्त्वखात्याचे संशोधन व त्यातून होणारे मानवी जीवनावरील भाष्य... प्रत्येक प्रसंग हशाचा कल्लोळ निर्माण करतो आणि मनाला भेदत जातो.
 

 गावाला ज्या तर्‍हेने वैभव प्राप्त होते त्यामधूनच अनेक प्रश्न निर्माण होतात, पण मुख्य प्रश्न दोन. पहिला विकासाचा. कोणत्याही प्रदेशाचा विकास करण्याची गेल्या काही दशकांत तीन-चार मॉडेल्स तयार झाली आहेत. त्यांपैकी एक ‘देवळा’चे.
 

 दुसरा प्रश्न श्रद्धा-अंधश्रद्धेचा. ‘देव’ ही व्यक्तिगत विश्वासाची बाब आहे. ती तेथेच राहावी. त्याचे सार्वजनिकीकरण करून सामाजिक अंधश्रद्धा वाढवू नये हा जो तात्त्विक विचार होता तो कालबाह्य झालेला आहे. समाजाने त्यापुढे जाऊन देवाचा स्वीकार भाविकतेने केला आहे. त्यामधील अंधत्वाचा व ‘क्किड प्रो को रिलेशनशिप’चा भाग बराच कमी झाला आहे. म्हणजे ‘देवा, मी तुला फेर्‍या घालतो- तू मला पास कर वा नोकरी दे’ अशा अंधभक्तीने लोक देवळाबाहेर रांगा लावत नाहीत. देव हा त्यांच्या मानसोपचाराचा भाग आहे हे त्यांना मनोमन कळून चुकले आहे व म्हणून ते भाविकतेने देवळात जातात व एरवी त्या देवस्थानी मौजमजा करतात. देवभक्ती हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट नसते. ही बदललेली मानसिकता असल्यामुळे ‘पुरोगामी’ अण्णा अखेरीस गाव सोडून निघून जातात. भाऊ त्यांना बजावतात, की हे सारे कायदाबाह्य असले तरी कायदा एका बाजूला व आम्ही दुसर्‍या बाजूला; मध्ये जनतेचा महासागर आहे. तो पार करून कायद्याला आमच्यापर्यंत यावे लागेल.
 

 तरी ‘देऊळ’ हास्यकारक व भेदकही का बनतो? तर त्यामध्ये देवाच्या नावाने सारे गावच्या गाव भ्रष्ट होते, त्याचे नाट्यपूर्ण चित्रण आहे. सरकारने गावात टीव्ही-मोबाइल पोचवले, पण गावकर्‍यांना पिण्याचे पाणी, रस्ते, हॉस्पिटल या भौतिक सुविधा पुरवल्या नाहीत. देऊळ बांधायचे ठरते ते मिडिया, स्थानिक राजकारणी व निरुद्योगी तरुण यांचे संगनमत झाल्याने. ही तिन्ही आधुनिक काळाची पापे आहेत आणि ती माणसाकडून नाही तर ‘दत्तदिगंबरा’कडून घडतात. जनतेचा ह्या पापांना नुसता पाठिंबा नाही, तर जनता त्यात सहभागी आहे आणि आपला उत्कर्ष साधत आहे. ही ‘देऊळ’ची लीला अगाध आहे. प्रेक्षक ‘देऊळ’ उचलून धरतात, कारण त्यात आत्मपीडा आहे. कडकलक्ष्मीच ती! आपलेच आपण आपल्या अंगावर फटके मारून घ्यायचे. ही भ्रष्ट व्यवस्था आपण निर्माण केली. गिरीश कुळकर्णी व उमेश कुळकर्णी तिचे वाभाडे काढतात तेव्हा आपण आपल्यालाच हसत असतो आणि मनोमन म्हणतो, कशी जिरवली साल्यांची (म्हणजे आपलीच).
 

 ‘पिपली लाइव्ह’ची सफाई ‘देऊळ’मध्ये नाही. तो चित्रपट चटपटीतपणे पुढे जातो तरी कथावस्तू उलगडत, प्रेक्षकांसमोर मांडत जातो. त्यातील नथा निरक्षर आणि अनाडी आहे. ‘देऊळ’मधील केशव भोळाभाबडा आहे- तो एका मुलीवर प्रेम करतो. नथाची बकरी आहे, केशवची गाय आहे.
 

  उमेश कुळकर्णी यांच्या दिग्दर्शनाचा प्रभाव अशासाठी जाणवत नाही, की ‘देऊळ’ची खुमारी कळायला प्रेक्षक भारतीय व शक्यतर मराठी भाषा जाणणारा असायला हवा, तरच त्याला भाऊ, अण्णा ही पात्रे, त्यांच्या लकबी, गावातले राजकारण, श्रद्धा-अंधश्रद्धेचा तणाव हे कळत जाईल. मग त्यात चित्रपटाची भाषा कोठे आली? प्रेक्षकांच्या मनात परिस्थितीच्या, माणसांच्या क्रिया-प्रतिक्रियांचा ‘स्टॉक’ तयार असतो. त्याला ‘स्टिरिओ टाइप’ म्हणतात; त्या वृत्ती-प्रवृत्तींपैकी काही निवडून वाचक-प्रेक्षकांना खूश करण्याचे कसब असते. ते ‘देऊळ’च्या टीमने झकास साधले आहे. गिरीश पांडुरंग कुळकर्णी यांनी ही ‘स्टोरी’ लिहून प्रसिद्ध केली असती आणि ती लोकांकडून वाचली गेली असती तरी लोक इतकेच मनमुराद हसले असते. उमेश कुळकर्णी यांनी ती चित्रमालिकेच्या रूपात पडद्यावर आणल्याने ती बर्‍याच प्रेक्षकांसमोर गेली व महाराष्ट्रभर हास्याचा धबधबा तयार झाला!

 दोन्ही कुळकर्णींना (उमेश व गिरीश) एकत्र मानले पाहिजे ते अशासाठी की त्यांनी कालानुरूप विषय निवडला, नुसता प्रेक्षकांच्या भावनांना हात घातला नाही तर त्यांना विचारप्रवृत्त केले.

 निर्माता अभिजित घोलप यांच्याबाबत मुद्दाम नोंद केली पाहिजे, की ते स्वत: ‘सॉफ्ट वेअर’च्या उद्योगात यशस्वी असताना त्यांनी चित्रपट निर्मितीकडे वळण्याची संवेदना दाखवली. ते स्वत: अमेरिकेमधील त्यांचे बसलेले बस्तान सोडून भारतात परत आले, येथे उद्योगात जम निर्माण केला व मराठी सांस्कृतिक जगात भर घातली. त्यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. त्यांची स्वत:ची कहाणी ‘स्वदेश’ पुस्तकात आधीच प्रसिद्ध झाली आहे.
 

- दिनकर गांगल

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.