‘देऊळ’ - आहे ‘अद्भुत’ तरी...


     कलाकृती एखाद्या बाणासारखी असते. हा बाण एकदा सुटला की तिच्यावरचे नियंत्रण कलावंताकडे उरत नाही. ‘देऊळ’ बघताना ‘लाइट’ आणि गमतीच्या मूडमधले प्रेक्षक शेवटच्या गंभीर प्रसंगी देखिल हसतात. ते हास्य ऐकणे असह्य होते, पण चित्रपटभरचा मूड पुन्हा परत उलटा फिरवणे शक्य नसते. श्रद्धेच्या बाजारीकरणाने उद्विग्न झालेला केशव देवाची मूर्तीच पळवून नेतो आणि रानावनात विसाव्याला थांबल्यावर ईशवराशी बोलतो ते संवाद खरे तर काहीतरी खोलवरचे सांगणारे आणि गंभीर होते, पण एव्हाना लाइट मूड मध्ये गेलेले प्रेक्षक त्यालाही हसत राहतात. ‘देऊळ’ या उत्तम कलकृतीच्या भाळी हे असे वंचनेचे दु:ख येते.

     पण देऊळ हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, अत्यंत उच्च दर्जाचा अभिनय आणि विलक्षण ताकदीचे नितांतसुंदर छायाचित्रण या सर्वच बाबतीत तो समाधान देतो. (शेवटच्या काही मिनिटांचे छायाचित्रण तर इतके अप्रतिम आहे, की हा कोणता सुंदर प्रदेश असे वाटावे. मनात संताप, मत्सर आणि हेवा यांचे रसायन उकळायला लागते. मात्र दत्तगुरूंच्या मूर्तीच्या चेह-यामागे नेमका चंद्राचा दिप्तीमान गोल यावा वगैरे क्लुप्त्यांनी मात्र हसू आवरत नाही. असो.) अनेक बाबतीत ‘देऊळ’ हा अप्रतिम आणि अतिशय यशस्वी चित्रपट आहे. गुणवान चित्रपट आहे. पण तरीही तो निर्विवाद श्रेष्ठ होण्याच्या अलिकडे थांबतो कारण चित्रपटाने श्रेष्ठ व्हावे की नाही याबाबत लेखक-दिग्दर्शकाच्या मनातच संदेह आहे असे दिसते. आणि तो संदेह चित्रपटाचा हीरो, प्रोटॅगोनिस्ट, केंद्रस्थानचे पात्र केशव असावे का कुलकर्णी-अण्णा या संदेहातच दडला आहे असे मला वाटते. लेखक-दिग्दर्शकाने केशवला ते स्थान दिले आहे. आणि त्याचे फायदे तोटे जाणीवपूर्वक स्वीकारले आहेत. हे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याचे चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत जाणवत राहाते. आणि मग ‘करडी’ गाय अत्यवस्थ असताना तिला भेटायला जाऊ पाहाणा-या केशवला गावचे युवा पुढारी नुसते अडवतच नाहीत, तर बेदम बडवतात तिथे लेखक-दिग्दर्शकाने एका अर्थाने हा निर्णय घेऊन केशवला नायक-प्रोटॅगोनिस्टचे स्थान दिले आहे. टु कट द लाँग़ स्टोरी शॉर्ट - केशवला ते स्थान दिल्याने चित्रपटाचे प्रतिपादन भाबडे, अडाणी आणि वैचारिक दृष्ट्या अपरिपक्व मुखातून येणे अटळ होते. केशव हा कोणत्याही अर्थाने वैचारिक नेतृत्व करयास लायक नाही, पण या महत्वाच्या चित्रपटाचे प्रतिपादन करण्याचे, प्रोटॅगोनिस्टचे स्थान त्याला दिल्याने ते प्रतिपादन देखिल नकळत भाबडे आणि भावुक होत जाते. ईश्वराची निर्मिती आणि ईश्वराचा बाजारी वापर यापैकी कशावर बोट ठेवायचे या संदेहात, केशव नायक केल्याने ईश्वराच्या निर्मितीवर भाष्य करणे जेव्हा अशक्य झाले तेव्हा केवळ ईश्वराच्या बाजारीकरणावर अप्रतिम कोरडे ओढत हा चित्रपट संपतो. पण एव्हाना केशव हा नायक झाल्याने नकळत प्रेक्षकांची सहानुभूती मिळवत त्याचे ईश्वराबाबतचे विचारही चित्रपटाला आपल्या खांद्यावर वागवणे अपरिहार्य होते.

     यात काही गैर किंवा चूकीचे आहे असे नव्हे. पण हे समजून घेणे मोलाचे आहे. कारण लेखक-दिग्दर्शकाने विचारी प्रेक्षकांना चाळवेल इतपत कुलकर्णी अण्णांचे कॅरॅक्टर रंगवले आहेच. त्यामुळे हा विचार मनात ठुसठुसत राहाणारच. खोल मनात ठुसठुसतात त्या जखमाच असतात असे नव्हे, कित्येकदा गर्भार शक्यताही मनात ठुसठुसत राहातातच. तसे कुलकर्णी अण्णांचे होत राहाते. केशव हा बहुसंख्य भाबड्या पण अंधश्रद्ध लोकांचे प्रतिक मानले तर कुलकर्णी अण्णांच्या विचारांचे काय? चित्रपटाने सामाजिक संदेश द्यावा किंवा नैतिक आशयाची तळी उचलावी असे मुळीच नाही. पण एकदा एखादा विरोधी विचार इंट्रोड्यूस केल्यावर त्याची तार्किक परिणती असायला हवी असे वाटत राहातेच ना? त्यालाच मी ठुसठुसणे असे म्हटले.

     खरे तर चित्रपटाचे कथानक सर्वांना परिचयाचे आहे. कुणी एक भाबडा केशव गाय चारायला रानात नेतो आणि दुपारी डुलकी लागते तेव्हा त्याला उंबराच्या झाडापाशी दत्तगुरू दिसल्याचा भास होतो. आणि गावातले डांबरट पुढारी या चमत्काराचा फायदा उठवत तिथे देवस्थान वसवतात आणि देवाचा बाजार मांडून आपल्या तुंबड्या भरतात. शेवटी देवाचा हा बाजार पाहून भोळा भाबडा केशव अस्वस्थ होतो आणि देवाची मूर्तीच पळवून नेऊन पळून जातो आणि दूर नदीत तिचे विसर्जन करतो. तोपर्यंत डँबीस पुढा-यांनी वाजत गाजत नवी मूर्ती आणलीच असते. बस. कथानक म्हटले तर इतकेच. पण लेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांनी ते अप्रतिम सादर केले आहे. त्यात उपहास आहे, विनोद आहे आणि भावुकताही आहे. श्रद्धेच्या बाजारीकरणावर अत्यंत प्रभावी टीका आहे. भाष्य आहे.

     बहुतेकांनी नाना पाटेकरने रंगवलेले भाऊ गलांडेचे कॅरॅक्टर आणि त्याचा अभिनय सर्वाधिक वेधक असल्याचे म्हटले असले तरी खरे तर ते काही यातले मध्यवर्ती पात्र किंवा महत्वाची व्यक्तिरेखा नव्हे. (या भूमिकेतल्या नानाच्या अभिनयातही एक भन्नाटपणा असला तरी व्यक्तिरेखेतली सुसंगती अंमळ कमीच आढळते. असो.) भाऊ गलांडेचे व्यक्तिमत्व केव्हा महत्वाचे अन् मोठे झाले असते, तर जर कुलकर्णी अण्णांना केंद्रस्थान दिले असते तर. विरोध झाल्‍यावर मग ते महत्वाचे पात्र झाले असते. केशव विरुद्ध भाऊ असा संघर्ष अथवा सामना संभवतच नाही. कारण केशवची भाबडी, भोळी आणि भावुक भक्ती संघर्ष आणि विश्लेषणाच्या पलिकडची आहे. शेवटी अगदी नकळत तो प्रेक्षकांची सहानुभूती देखिल त्याच दिलखेचक भावुकतेने मिळवतो. दुर्दैवाने या सर्व गोंधळ आणि महामूर्खपणाला कारणीभूत आहे ती त्याची वेडगळ श्रद्धाच, हे प्रेक्षक विसरून जातो. सुरवातीला देव दिसल्याचे जगाला सांगत फिरणे हा केशवचा मूर्खपणाच पुढच्या रामायणाला कारण ठरतो. म्हणजे प्रलयाचे मूळ कारण केशवचा अडाणीपणाच आहे हे प्रेक्षक विसरून जातो. किंबहूना ते सुरवातीला जाणवले असले तरी नंतर ज्या रोमँटिक आणि भावुक पद्धतीने केशव हीरो होत जातो त्यात केशवला सहजीच सुरूवातीच्या अडाणी बावळटपणाबद्दल माफ केले जाते. आणि शेवटच्या ईश्वराच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या भावुक प्रसंगी बहुसंख्य प्रेक्षक, माझी भक्ती केशव सारखी नितळ, निर्मळ आणि सच्ची कशी आहे याचे समाधान मानत श्रद्धेच्या बाजारीकरणाच्या उपहासगर्भ + विनोदी दर्शनाला हसत हसत आपण पुरोगामी असल्याचे समाधान बाळगत केशव होत जातात. मनाने केशव असण्याचे असे नकळत समर्थन केले जाते.

     याचे परफेक्ट समांतर उदाहरण म्हणजे काँग्रेसचे अनेक जण इतका भ्रष्टाचार करतात या पार्श्‍वभूमीवर किरण बेदीने मात्र किती प्रांजळपणे विमानप्रवासाचे फसवून घेतलेले पैसे परत केले. केवढा हा मनाचा मोठेपणा. स्वभावातला हा कित्ती थोर उदात्त नितळपणा असे पसरवले जाते. अशा त-हेने किरण बेदीचे उदात्तीकरण करणे आणि केशवच्या भावुक निर्मळ मनाचे गोडवे गाणे एका परीने एकाच पातळीवर येते. भाऊ गलांडे, आप्पा गलांडे आणि मंडळी करतात ते निंद्य आहे यात संशयच नाही. पण म्हणून या सा-याची सुरवात करणारा केशव उदात्त ठरत नाही. लेखक-दिग्दर्शकाला खरेच केशवची भूमिका (स्टँड, पोझिशन या अर्थाने) तशीच अभिप्रेत आहे काय? कलावंताचे प्रातिभ मन कलाकृती आणि त्यातला प्रोटॅगोनिस्ट या दोन्हीपेक्षा उन्नत असायला हवे असे म्हणतात ते याच अर्थाने. कारण ‘देऊळ’ या सुंदर चित्रपटात निर्माता, कलाकृती आणि प्रेक्षक हे सारेच प्रोटॅगोनिस्टच्या वैचारिकतेवर येण्याचा धोका दिसतो. जणू काही केशव हा कोणी उदात्त महात्माच आहे. लक्षात घ्या, भाऊ गलांडे आणि मंडळींविषयीची विखारी  तिडीक केशवला मिळणा-या सहानुभूतीत रूपांतरित होणे तितकेच धोक्याचे आहे.

     याला ब-याच अंशी गिरीश कुलकर्णी (अतिशय चांगल्या अर्थाने) जबाबदार आहे. कारण त्याचे लेखन आणि अप्रतिम अभिनय केशव अविस्मरणीय करतात. मुख्यत: त्याचा अभिनयातून दिसणारा प्रांजळ भाबडेपणा विश्वसनीयतेच्या सा-या कसोट्या ज्या सहजी पार पडतो ते विलक्षण आहे. अतिशय प्रामाणिक भाबडेपणा अभिनयातून तितक्याच ताकदीने दाखवणे श्री.चारसोबीस आणि अनाडी या चित्रपटात राज कपूरला साधले होते. (इथेही केशवची आई साकारणाèया ज्योति सुभाष या अत्यंत गुणी अभिनेत्रीत एक ललिता पवार सापडतेच धूसरपणे. असो.) सांगायचा मुद्दा, गिरीश कुलकर्णी हा केशव इतका विश्वसनीय करतात की तो खराच वाटायला लागतो. त्याचे दत्ताबरोबरचे संवाद भावुकतेचे सुरेख दर्शन घडवतात. आणि ‘ख-या’ भक्तीचेही दर्शन घडवतात.

     आक्षेप असे नाही, पण मला काहीशी अस्वस्थपणाची भावना असेल तर केवळ याच बाबतीत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात भेद न करता निर्मळ अंधश्रद्धा आणि बाजारू, स्वार्थी अंधश्रद्धा यात भेद करत अतिशय प्रभावीपणे हा चित्रपट बाजारू आणि खोटारड्या अंधश्रद्धेवर कोरडे ओढतो. पण निर्मळ असली तरी अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच असते हे मात्र कुठेतरी निसटते. वास्तवात केशव देखिल समर्थनीय नाही हे प्रभावीपणे पुढे येतच नाही. केशव जर भाबड्या प्रेक्षकांचा हीरो झाला तर त्याला जबाबदार कोण? त्याचे मूल्यमापन चित्रपट फारसे करतच नाही. ते काम करू शकतील अशा कुलकर्णी अण्णांना चित्रपटातून अकाली आणि अनाठायी निवृत्त केले जाते. आणि नसिरुद्दिन शहाच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतला दरोडेखोर करड्या गायीने केशवची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रकट होणे आणि केशवने पाणी पाजताच अदृष्य होणे यासारख्या प्रसंगातून चमत्काराधिष्ठित अंधश्रद्धेला अधिकच खतपाणी मिळते. खरी श्रद्धा असेल तर भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतोच वगैरे भाकडकथांना यामुळे कलात्मक समर्थन लाभते. एक निराळीच संतोषीमाता निर्माण होते.

     हे सारे लेखक-दिग्दर्शकांना असेच अभिप्रेत असेल का? माहित नाही. पण या सा-या शक्यता मला दिसल्या ख-या. त्यामागे माझे अंमळ जास्तच खोल विचार करणे आणि अतिरेकी ‘क्रिटीकली’ बघणे कारणीभूत असू शकेल. पण जे आपल्याला अति अति आवडते त्याचाच आपण इतका विचार करतो ना. ‘देऊळ’ हा असा एक अति अति आवडलेला सुंदर चित्रपट असल्याने हा सारा उपद्व्याप होय!

- संजय भास्कर जोशी,

मोबाईल - 9822003411,

इमेल - sanjaybhaskarj@gmail.com

संबंधित लेख –

‘अवतार’ - तंत्रबंबाळ चित्रपटसृष्टीची नांदी!

पिपली लाईव्ह , दिगू टिपणीस आणि राकेश...

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.