भिक्षा


 

     मुंबईच्या लोकल प्रवासामधे परवा एक बाई मस्त गप्पा मारायला लागल्या. त्यांच्या  बोलण्याच्या लकबीवरून त्या कोकणातल्या आहेत हे पहिल्या काही शब्दांतच स्पष्ट झालं.  आमची गावं शेजार-शेजारची निघाली. आरती प्रभूंचे संदर्भ, देवगड-लिंगडाळतीठा, बाळकृष्ण प्रभुदेसाईंच्या कथा, असा एक वेगळाच सहप्रवास सुरू झाला. लोकलचा अर्धाअधिक प्रवास असा आनंदात पार पडल्यावर, दुपारी बायकांच्या डब्यात नेहमीच येतात तशी दोनतीन लहानगी भीक मागायला आली.

 

     आमच्‍या बाकावर बसल्या स्थितीतही जेमतेम गुढग्याच्या वर येईल असं एक पोरगं त्यात होतं. सुटं चालायला लागणं आणि धडकून धावायला लागणं ह्यांतल्या मधल्या अवस्थेतलं. आलं, ते सरळ माझ्याजवळ आलं आणि हसून हक्कानं काहीतरी मागायला लागलं. जवळ खाऊ तर काही नव्हता. पुन्हा लक्ष त्या बाईंच्या बोलण्याकडे, म्हणून मी हाताला आली ती नोट त्याला दिली; त्याच्या बरोबरच्या जरा मोठ्या मुलांना बजावलं, की पुढच्या स्टेशनवर सगळीच काहीतरी घेऊन खा. त्याचं जे कोणी बाळगणारं असेल ते थोडासा वेळ तरी का होईना, त्याच्याशी बरं वागेल, त्याला काही खाऊ देईल अशा बेतानं. ते बघताच समोरच्या बाईंनी अक्षरशः डरकाळी फोडली, ती मुलं तर तेवढ्यात उतरूनही गेली होती. मला मात्र त्या बाई बोलबोल बोलल्या- इतकं की त्यांनाच दरदरून घाम फुटला! त्यांच्या उद्रेकातले मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे :

 

१.      पैशांचा असा माज अपप्रवृत्तींना खतपाणी घालतो

 

२.      भीक मागणा-या मुलांच्या आईबापांचा बेजबाबदारपणा

 

३.      समाजातला फुकटेपणा वाढवणं

 

४.      सहज दिलेल्या पैशांमुळे व्यसनांना उत्तेजन

 

५.      अनौरस प्रजेची जोपासना

 

६.      इतर अनेक नेक आणि गरजू माणसं/ प्रकल्प विन्मुख राहून अशा फुकट्यांची धन होते

 

७.      पैसे द्यावेत ते ताळेबंद आणि हिशेब राखणा-या सुनियोजित संघटनांना.

 

 

ह्या सगळ्यावर माझं म्हणणं पुढीलप्रमाणे होतं, पण त्या काहीही न ऐकता फणका-यानं उठून दुसरीकडे जाऊन बसल्या.

 

१.      पैशांपेक्षा हाताशी असतं तर एखादं मोसंबं सोलून दिलं असतं, पण इतक्या विश्वासानं मागितल्यावर काहीच न देणं अमान्य.

 

२.      आईबापांचा बेजबाबदारपणा जितका खरा, तितकीच त्या मुलाची भूक खरी, ती भूक आत्ता माझ्यासमोर आहे आणि मला काही करता येण्यासारखं आहे.

 

३.      आपण स्वतः कधीही फुकट न खाण्याचं ठरवावं, दुस-यांचं मूल्यमापन त्यांच्यावर सोपवावं.

 

४.      त्या लहान मुलाचं वास्तव आणि साधारण भविष्य पाहता त्याला काहीही सहज मिळतं  असं मी म्हणू धजणार नाही.

 

५.      दुडदुडण्याच्या कौतुकाशी औरस-अनौरसपणाचा संबंध नाही.

 

६.      चांगल्या समाजोपयोगी कामांना मदत ही होतेच, ‘ह्याचा तोटा झाला तरच दुस-याचा लाभ’ असा करंटा zero sum game नसतो.

 

७.      नियोजन, ताळेबंद आणि हिशेब हे विधायक कामात सातत्य टिकवण्याकरता अपरिहार्य आहेत, पण उत्स्फूर्त चांगुलपणाला वाव ठेवायलाच हवा.

 

आपल्याला पटलेली, आपली निष्ठा आणि श्रद्धा असलेली, समाजजीवनात आपल्याला कळकळीची वाटणारी तत्त्वं किंवा सूत्रं बरीच असतात. एकेका प्रसंगानुरूप आपण ती उद्धृत करतो, त्यांचा अनुसार व्हावा असा आग्रहही धरतो.

 

काहींच्या मते माणसाचा अगदी साधा पायाभूत चांगुलपणा, सत्प्रवृत्ती हे त्या सर्व तत्त्वांचं किंवा सूत्रांचं उगमस्थान असतं, अस्तिक त्यांचा संबंध दैवी नियोजनाशी जोडतात. जैविक उत्क्रांतीचे अभ्यासक तर अशा घाऊक सौजन्यापेक्षेची मुळं कठीण परिस्थितीत समूहाच्या तगून जाण्याच्या क्षमतेत शोधतात. म्हणजे अशा कोणत्याही केंद्र स्रोतातून निघून ही सूत्रं अवघं समाजजीवन तीनशेसाठ अंशांत व्यापतात असं सर्वसंमतीनं म्हणायला हरकत नाही. साहजिकच मग अशा चांगल्या गोष्टी वर्तुळाच्या त्रिज्‍येप्रमाणे केंद्र स्रोतापासून समान अंतर राखूनही परस्परांपासून दुरावतच जातात. नित्यव्यवहारात आपल्याला बर्‍याचदा एका वेळेला फक्त एका तत्वानुसार वागणं शक्य होतं, त्याचं कारण हेच असावं.

 

ऋचा गोडबोले - भ्रमणध्वनी : 9819321852, इमेल – rcagodbole@gmail.com

संबंधित लेख –

 

ऊस, राजगिरा, साबुदाणा, बटाटा, मिरची

 

आकडेवारीचे फुलोरे

 

भाषेचे उत्पादक होऊ!

 

गर्दीतली वृक्षराजी

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.