श्रीक्षेत्र नारायणपूर – नारायणेश्वराचे मंदिर (Narayaneshwar Temple of Narayanpur)

नारायणपूरचे नारायणेश्वर मंदिर यादवकालीन आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण ते पश्चिमाभिमुख मंदिर आहे. तेथे गर्भागृहात स्वयंभू शिवलिंग आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीस पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे…

श्री नारायणेश्वराचे मंदिर साताऱ्यापासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर, पुण्याकडे जाताना उजव्या हाताला, पूर्वेकडे आठ-दहा किलोमीटर आत आहे. ते पुरातन शिवमंदिर आजूबाजूच्या डोंगरांच्या रांगांत आहे. तेथेच नारायणपूर गाव आहे. ते संत चांगदेवांचे गाव. ते पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला येते. तेथेच प्रसिद्ध असे एकमुखी दत्त मंदिर आहे. नारायणेश्वराच्या येथूनच किल्ले पुरंदरकडे जावे लागते.

नारायणपूरचे मूळ नाव पूर. नारायणेश्वर हे यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी एक. मंदिर भव्य असून, काळाच्या ओघात त्याची थोडीफार पडझड झाली आहे. पण अजून ते चांगल्या अवस्थेत आहे. समोर सभामंडप-सभागृह, गर्भगृह अशी रचना आहे. मंदिरावर सुंदर शिखर उभे आहे. मंदिरात भव्यता अनुभवास येते. गर्भगृहात शिवलिंग असून, सभामंडपात इतर देवतांच्या मूर्ती छोट्या कमानीत स्थापन केलेल्या आहेत. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्व ठिकाणी शिल्पकाम केलेले आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवता यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेशद्वारातून खाली उतरताना उजव्या हाताला हनुमानाची मोठी मूर्ती दिसते. ती उभारलेल्या आणि हात उगारलेल्या अवस्थेत आहे. मंदिराचे प्रांगण मोठे आणि विस्तीर्ण आहे. त्या ठिकाणी मोठा हॉल असावा असे तेथील पडलेल्या खांबांवरून दिसते. संपूर्ण मंदिर वीस खाबांवर उभारले गेले असून खांबांवर नक्षीकाम केलेले आहे. डागडुजी करताना थोडेफार बदल झाले असले तरी मंदिराच्या मुख्य बांधकामात तसे काही दिसत नाहीत. मंदिर आवारात वडाचे झाड आहे. त्याभोवती चौथरा बांधलेला आहे.

मंदिराभोवती सहा फूट उंच अशी तटबंदीची भिंत आहे. नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख आहे. बाहेरच्या सभामंडपाचे खांब बऱ्यापैकी शाबूत आहेत. नंदीची मूर्ती सभामंडपाच्या मध्यभागी असून ती थोडी भग्न झालेली आहे. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंती आहे. मंदिराचा पुरातन कळस पडला असावा. त्यामुळे नव्या पद्धतीने बांधलेला कळस मोठा आहे, पण तो मूळ बांधकामाला बेजोड वाटतो. मंदिराच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम आहे. पट्टीच्या माथ्यावर श्रीगणेश दिसतो. प्रवेश दरवाज्याच्या दोन्ही बाजूंस गणेशमूर्ती दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यावर दिसणारा पितळेचा नंदी मन आकर्षित करून घेतो. थोडे पुढे, दगडात कोरलेले कासव दिसते.

सभामंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे तीन एकाक्षरी शिलालेख आहेत. बाजूस कोरलेले शिलालेख दिसतात. असे सांगितले, जाते की चांगदेव आणि त्यांचे शिष्य यांनी त्या मंदिरात तपश्चर्या केली. गर्भगृहात एका मोठ्या काचेखाली वर्तुळात तीन स्वयंभू पिंडी दिसतात. त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे मानले जाते. त्यांतील मोठी असलेली पिंड म्हणजेच ‘नारायणेश्‍वर’. ती पिंड कायमस्वरूपी पाण्यात असते. केदारगंगा जवळच आहे. ती पुरंदर किल्ल्यावरून उगम पावून पुढे वाहताना तेथून जाते अशी श्रद्धा आहे. भग्नावस्थेतील पार्वतीची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात दिसते. मंदिराला उत्तर बाजूसदेखील मोठा दरवाजा आहे. मंदिर दर्शन घेऊन त्या दरवाज्याने बाहेर जावे अशी व्यवस्था आहे. त्या दरवाज्याच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

दरवाज्यातून बाहेर पडल्यावर धनकेश्वराचे देऊळ दिसते. मंदिराच्या पाठीमागील तटबंदीस असलेल्या दारातून बाहेर पडल्यावर एक तलाव दिसतो. तो पंचगंगा नावाने ओळखला जातो. त्या ठिकाणचे अंतर सासवडपासून बारा किलोमीटर आहे. ते गाव एकमुखी दत्तमंदिरामुळे प्रसिद्ध आहे. नारायणेश्वर मंदिराकडे महामार्गावरील कापूरहोळ या गावातून जावे लागते. तेथे जवळच हमरस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नव्याने बांधले गेलेले मोठे बालाजी मंदिरदेखील आहे.

– प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com

—————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here