माकडं मजा बघतायत ! (Mahesh Keluskar’s poem symbolizes the present social circumstances)

0
549

जे न देखे रवी, ते देखे कवी. खरंच आहे ते.

कधी कधी कवी जे लिहितो त्यातील दाहक वास्तवदर्शनाने डोळ्यांपुढे सूर्य, चंद्र तारे चमकू लागतात !

प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर यांनी एक कविता लिहिली आहे, ‘माकडं मजा बघत आहेत !’

समाजात जे विचित्र वातावरण तयार झालं आहे त्याचं अतिशय भेदक वर्णन त्या कवितेत आहे.

ती रूपक कविता आहे. देशासमोर सामाजिक, आर्थिक, आरोग्य क्षेत्रातील एकाहून एक मोठ्या समस्या उभ्या राहत आहेत. अशा वेळी, त्या समाजातील मंडळी कशी वागत आहेत त्याचे रूपकात्मक दर्शन ही कविता घडवते.

कोणी नसलेले प्रश्न उकरून त्यातून विद्वेषाच्या आगी पेटवत आहे, त्याला तोंड देण्याची क्षमता असूनही कोणी पळ काढत आहे, तर कोणी कातडीबचाउपणा करत आहे. कोणी त्या आगीवर त्यांची पोळी भाजून घेत आहे. कोणी त्यांच्या जुन्या द्वेषांचे हिशोब चुकते करत आहे. वर्तमानपत्र वाचताना वा टीव्हीवरील बातम्या ऐकताना वाचक-प्रेक्षकांच्या मनात जी चित्रे तयार होतात. ती महेश केळुस्कर यांनी प्राण्यांच्या रूपकातून उभी केली आहेत.

आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’मध्ये ही कविता ‘फेस बूक’वर वाचून फार अस्वस्थ झालो. महेश केळुस्कर यांना फोन केला, तर ते म्हणाले, “काल रात्री तर लिहिली. लिहिली म्हणण्यापेक्षा ‘आली’ असेच म्हणावे लागेल. मी नेहमीप्रमाणे अकरा वाजता झोपलो. परंतु एक वाजता जाग आली. पाठोपाठ, कवितेच्या ओळी सरसर कागदावर उतरल्या गेल्या. त्या पाठीमागे प्राण्यांची चित्रे आपोआपच नजरेसमोर उभी राहिली. प्राणी आणि माणसे यांतील फरक कळेनासा झाला.”

महेश केळुस्कर यांनी वर्णन केलेल्या या सर्व प्राण्यांत भयंकर आहेत ती माकडं. इसापनीतीमध्ये दोन बोक्यांच्या भांडणात मध्यस्थी करताना स्वतःच लोण्याचा गोळा मटकावतात तीच ही माकडं. केळुस्कर यांच्या कवितेतील माकडे त्याच माकडांची परंपरा पुढे नेतात आणि समाजात विद्वेषाच्या ठिणग्या टाकतात. ती समाजमाध्यमांच्या वेलींवर झोके घेत, राजकारणाच्या फांद्यांवर लोंबकाळत दात विचकत आहेत. काय करावे संवेदनाशील आणि विचारी माणसांनी? समाजात दुहीचा वणवा भडकला की या माकडांचा फायदाच होतो हे इतिहासाने वेळोवेळी दाखवून दिले आहे.

सध्याच्या काळात याविषयी विवेकनिष्ठ चर्चा व्हायला हवी ना ?

महेश खरे 9320304059 contactmakhare@gmail.com

———————————————————————————————

कविता

माकडं मजा बघतायत

संख्येने अल्प आहेत लांडगे

संख्येने खूपच आहेत कोल्हे

आणि तशात वणवा लावलाय कुणीतरी जंगलाला.

वाघांनी पसंत केलंय

दलदलीच्या काठच्या वेताच्या जाळीत

लपून बसणं, रानमांजरांच्या बरोबर.

सिंहांनी गुहांवर तोरणं लावलीत आयाळींची

वणव्याच्या स्वागताला

आयतं दारात येईल गुहेच्या, भाजलेलं मांस म्हणून.

ससे हसत आहेत बालिश

हत्तींना पळतांना बघून

आणि मुंगूसं शोधताहेत साप

मरताना शेवटचा घास तरी पोटात पडावा म्हणून.

साळींदरांची पिल्लं कुरतडत बसलीत

आपापल्या बिळांचा इतिहास, टोकदार काट्यांनी

मृत हरिणांच्या शिंगांची मिळणार आहे त्यांना मेजवानी.

माकडं मजा बघत आहेत

त्यांना काय… हे जंगल नष्ट होताच

जातील उड्या मारत, जळते पलिते घेऊन

वणवा लावायला

—— दुसऱ्या जंगलात.

महेश केळुस्कर