भाषादूत मॅक्सिन बर्नसन

2
407

मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे !

मॅक्सिन बर्नसन यांनी आरंभकाळात, भारतात स्थिरावत असताना दलित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी फलटणमध्ये ‘कमलाताई निंबकर बालभवन’ सुरू केले. त्या मुलांना नगरपालिकेच्या शाळांमध्ये भरती करण्याचे काम हाती घेतले. मोठ्या मुलांसाठी रात्रीचे वर्ग सुरू केले. शाळा सोडलेल्या मुली-स्त्रियांसाठी साक्षरतेसोबत शिवणवर्ग चालू केले. पीडितांसाठी समुपदेशन व वैद्यकीय मदत यांची व्यवस्था केली.

मॅक्सिन या भाषातज्ज्ञ आहेत. त्या मूळच्या अमेरिकेच्या, पण त्या नंतर तनामनाने पूर्ण भारतीय झाल्या ! त्यांनी त्यांची फलटणची ‘कमलाताई निंबकर बालभवन’ ही मराठी माध्यमाची शाळा प्रयोगशील केली, ती लहानग्या मुलामुलींना शाळेत यावेसे वाटण्यास हवे यासाठी कल्पकतेने चालवली गेली. त्यांनी छोट्या मुलांना मराठी वाचण्या-लिहिण्यास सोपे जावे म्हणून खास अशी पद्धत शोधून काढली आहे. मुलांचे अनुभव, त्यांची भाषा याबाबतचा अभिनव विचार त्यात आहे. मुलाला शाळेत आणण्यासंदर्भातील एक अनुभव मॅक्सिनमावशींनी सांगितला आहे. त्या म्हणतात, “आमच्या शाळेतील एक शिक्षक मुलांना गोठा दाखवण्यास घेऊन गेले. तेथून आल्यावर मुलांनी गाईगुरांची चित्रे काढली आणि त्यानंतर मुलांनी सांगितली तशीच वाक्ये शिक्षकाने फळ्यावर लिहिली. एका मुलीने सांगितले, ‘गाय वासराला चाटतिया.’ हे वाक्य तसेच फळ्यावर लिहिले गेले. मुलांची भाषा नेहमी स्वीकारली गेली. ती शुद्ध नाही असे कोणी म्हणू नये याची काळजी घेतली गेली.” मॅक्सिन यांनी भाषेबाबतचा खुला दृष्टिकोन मराठीत आणला.

मॅक्सिन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1935 रोजी अमेरिकेतील एस्कनाबा (मिशिगन प्रांत) येथे झाला. त्यांचे वडील नॉर्वेचे तर आई फिनलंडच्या विस्थापित कुटुंबातून आली होती. त्यांचे वडील लोहखनिज बोटीवर भरण्याचे काम करत. आ+ई गृहिणी होती. मॅक्सिन यांनी मिनेसोटा येथील ऑग्सबर्ग कॉलेजमधून बी ए केल्यानंतर त्यांनी तेथील शाळेत एक वर्ष इंग्रजी शिकवले. त्यांना इंग्रजी विषयात एम ए करण्यासाठी वुड्रो विल्सन फेलोशिप मिळाली. त्यांनी ते शिक्षण न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात घेतले. मॅक्सिन यांनी बारावीत असताना, जॉन म्यूल या पत्रकाराचे व्याख्यान ऐकले. त्यातील त्याने केलेला भारताचा अभ्यास ऐकतानाच मॅक्सिन यांनी भारतात जाण्याचे ठरवले होते. मॅक्सिन यांनी पहिला छोटासा शोधनिबंधही ‘ग्रामीण भारताच्या समस्या’ या विषयावर महाविद्यालयीन वयातच लिहिला होता. एम ए (इंग्रजी) शिक्षणा दरम्यान मॅक्सिन यांची गुरगुंटा-सेहगल या विदुषीशी भेट झाली. त्यातून त्यांच्या मनी भारताविषयी कुतूहल तयार झाले. गुरगुंटाबार्इंनी त्यांचा हैदराबादच्या विवेकवर्धिनी कॉलेजचे प्राचार्य सातवळेकर यांच्याशी संपर्क साधून दिला. सातवळेकर यांनी त्यांच्या महाविद्यालयात शिकवण्यासाठी मॅक्सिन यांना पाचारण केले, मॅक्सिन यांनी आयोव्हामधील डेकोरा येथील ल्यूथर कॉलेजात दोन वर्षे प्राध्यापकी (इंग्रजी शिकवण्याची) केली. त्यातून पैशांची जुळवाजुळव झाली आणि मॅक्सिन 1961 मध्ये भारतात आल्या.

मॅक्सिन भारतात हैदराबादला सातवळेकर यांच्या घरी उतरल्या. ते घर त्यांचे दुसरे माहेर झाले. इतका जिव्हाळा सातवळेकर कुटुंबाने व त्यांनी परस्परांना लावला. मॅक्सिन यांची मराठी भाषेशी, मराठी संस्कृतीशी; तसेच, रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांशी जवळून ओळख त्याच घरी झाली. मॅक्सिन यांनी मराठी भाषा शिकतानाचा अनुभव ‘जीव घाबरा करणारी भाषा’ या लेखात गमतीशीरपणे मांडला आहे. त्यांनी लिहिले आहे, “इकडे येण्याआधी हा देश शांतताप्रेमी व अहिंसावादी आहे अशी माझी ठाम समजूत होती. पण माझा मराठीचा अभ्यास सुरू झाला अन् माझ्या कल्पनांना सुरुंग लागला. अगदी पहिल्याच दिवशी आमचे मराठीचे शिक्षक म्हणाले, ‘मारामारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातून मी आलोय. ‘मी तुला मारीन’ या वाक्यासाठी मराठीत अनेक वाक्प्रचार आहेत – ‘मी तुला तुडवीन’,  ‘मी तुला वाजवीन’, ‘तुझं नरडं दाबीन’, ‘तुझ्या नरड्यावर पाय ठेवीन’ इत्यादी. त्यांनी त्या लेखात मराठी माणसे काय काय खातात याची धमाल जंत्रीच दिली आहे ! ती अशी… ही माणसे बोलणी खातात, डोकं खातात, वेळ खातात, मार खातात, अक्षरे खातात, पैसे खातात आणि कधी कधी तर शेणही खातात !”

मॅक्सिन यांनी हैदराबादच्या कॉलेजमध्ये दोन वर्षे शिकवल्यावर भारताच्या भाषिक प्रश्नांवर अधिक अभ्यास करण्याचे ठरवले. त्यात त्यांना मराठी भाषेची गोडी इतकी लागली, की त्यांनी त्या भाषेचा सखोल असा अभ्यास केला. त्यांची सातवळेकर आर्इंमुळे इरावती कर्वे यांच्याशी ओळख झाली होती. इरावती कर्वे यांनी मॅक्सिन यांना अभ्यासाकरता ‘फलटण’ हे गाव सुचवले आणि सांगितले, की तेथे त्यांची राहत असलेली मुलगी- जाई निंबकर ही त्यांना सर्वोतोपरी मदत करेल. मॅक्सिन यांनी फलटणमध्ये पहिले पाऊल 1966 मध्ये टाकले. त्यांच्या पीएच डी चा विषय होता, ‘फलटण शहरातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता’. त्यांना त्या अभ्यासासाठी ‘फुलब्राइट’ फेलोशिप मिळाली. त्या अभ्यासाचे फलित म्हणजे स्नेही जाई निंबकर यांच्यासमवेत मॅक्सिन यांनी अमराठी प्रौढांना मराठी शिकण्यासाठी उपयुक्त पडतील अशी तब्बल नऊ पुस्तके लिहिली हे होय. त्यात व्याकरणसंदर्भ एक पुस्तक व एक शब्दकोश यांचाही समावेश आहे.

फलटण हे गाव, तेथील माणसे मॅक्सिन यांना इतकी आवडली, की त्यांनी मातृभाषेतून शिक्षण देणारी शाळा काढण्याचे स्वप्न तेथेच राहून पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी त्यांचे अमेरिकी नागरिकत्व रद्द केले व त्या भारतीय नागरिक 1978 सालापासून बनल्या. त्यांनी फलटणच्या दलित वस्तीतील शाळाबाह्य मुलांना अनौपचारिक रीत्या शिकवण्यास सुरुवात केली. त्याच कामाची परिणती पुढे, ‘प्रगत शिक्षण संस्थे’च्या स्थापनेत झाली. त्यांनी शाळा पूर्णपणे निधर्मी असेल हेही ठरवून टाकले होते. त्यांच्या 1986 साली सुरू झालेल्या शाळेची पहिली तुकडी शालान्त परीक्षा 1997 मध्ये उत्तीर्ण झाली. मॅक्सिन यांनी दलित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी कित्येक अडथळे पार केले. त्यांना नगरपालिकेच्या शाळांमध्ये भरती केले; दिवसा कामावर जाणाऱ्या मोठ्या मुलांसाठी रात्रीचे वर्ग सुरू केले; शाळा सोडलेल्या मोठ्या मुली व निरक्षर महिला यांच्यासाठी साक्षरतेबरोबर शिवणवर्ग चालू केले; फलटणमधील मंगळवार पेठ या दलित वस्तीत क्षय रोगाचे प्रमाण खूप होते – घराघरात दारूपायी व्यसनी झालेले लोक होते. तशा पीडितांसाठी संस्थेमार्फत समुपदेशन व वैद्यकीय मदत यांची व्यवस्था केली.

त्यांच्या अशा सर्व खटाटोपांमुळे सायकलवरून फिरणारी ती गोरी बाई सर्वांच्या परिचयाची झाली. लोक तिला प्रेमाने ‘मॅक्सिन मावशी’ म्हणू लागले.

मॅक्सिन यांना मदत ‘अशोका फाउंडेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मिळाली तेव्हा त्यांनी ‘प्रगत शिक्षण संस्थे’तर्फे तालुक्यातील इतर शाळांसाठी 1990 मध्ये एक ‘प्रोग्रॅम’ सुरू केला. त्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधून संस्थेचे वाचन-लेखन प्रकल्प, स्लाइड शोज व विज्ञान जत्रा हे उपक्रम सुरू झाले. मंजिरी निंबकर यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाला पूर्णविराम देऊन शाळेसाठी पूर्णवेळ (बिनपगारी) मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर तर मावशींच्या शाळा व शाळाबाह्य उपक्रमांनी चांगलेच बाळसे धरले ! त्यांना रतन टाटा ट्रस्टकडून 2005 मध्ये भरघोस मदत मिळाली. संस्थेतर्फे भाषा, साक्षरता व शिक्षण यासंदर्भात एक केंद्र सुरू झाले. त्या म्हणतात, ‘‘जोपर्यंत माझ्या देशात मुले शिक्षणापासून वंचित आहेत, तोपर्यंत माझे काम चालूच राहणार.’’

उषा मोडक या सामाजिक कार्यकर्तीने त्यांच्या फाऊंडेशनतर्फे ‘प्रगत शिक्षण संस्थे’ला, तालुक्यातील संचारासाठी रिक्षा भेट दिली. मॅक्सिन त्या वेळी म्हणजे त्यांच्या वयाच्या पंचावन्नव्या वर्षी रिक्षा चालवण्यास शिकल्या. रिक्षात बसवून मुलांना इकडून-तिकडे नेणारी, येणाऱ्या-जाणाऱ्यांची थांबून विचारपूस करणारी ती मावशी फलटणकरांच्या आदराचा विषय न बनती तरच नवल !

एक भाषातज्ज्ञ या नात्याने त्यांचा आग्रह मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावे हा आहे. त्या अमेरिकेत ‘असोसिएटेड कॉलेज ऑफ मिडवेस्ट’मध्ये विद्यार्थ्यांना ‘स्प्रिंग ओरिएंटेशन कोर्स’अंतर्गत मराठी शिकवण्यास 1999 पर्यंत वर्षाआड जात होत्या. मॅक्सिन यांचे त्यांच्या नातेवाईकांशी पूर्वीइतकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या ‘मराठी अभ्यास परिषदे’च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्र.ना. परांजपे आणि मॅक्सिन बर्नसन यांनी ‘मराठी अभ्यास परिषदे’ची स्थापना केली. त्या परिषदेच्या कार्यामध्ये त्या त्यांचे योगदान देत. त्यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ (टीआयएसएस) मुंबई येथे एम ए एज्युकेशन हा अभ्यासक्रम शिकवण्यास 2004 पासून सुरुवात केली. त्या म्हणतात, ‘बहुभाषिक चौफेर कौशल्य – श्रवण, संभाषण, वाचन व लेखन-संपादन करून वैचारिक देवघेवीसाठी वापरणे ही काळाची गरज आहे.’

मॅक्सिन ध्येयापोटी आयुष्यभर एकट्याच राहिल्या. त्यांचे वास्तव्य फलटणचा प्रयोग संपल्यानंतर हैदराबादला आहे. त्यांचे फलटणमधील घर जसेच्या तसे आहे. त्या घरात दासबोध, तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांपासून गौरी देशपांडे यांच्या कवितासंग्रहापर्यंत सर्व प्रकारची पुस्तके आहेत. त्यांपैकी लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आवडते पुस्तक व श्री.ना. पेंडसे हे त्यांचे लाडके लेखक. त्यांच्या घरी मराठी बाण्याच्या खुणा जागोजाग दिसतात. ‘गोड बोला पण मराठीत,’ ‘शिव्या दिल्यात तरी त्याही मराठीत..’ आदी चिकटपट्ट्या जागोजागी लिहिलेल्या आढळतात. त्यांना लिहिण्यावाचण्यासाठी, ‘मांडी व समोर बैठे टेबल’ अशी भारतीय बैठक पसंत आहे.

मॅक्सिन या मराठी व्याकरणाबाबत आग्रही आहेत. त्या मुलांना बोलण्याची ढब जरी सातारी, कोल्हापुरी असली तरी बोलणे मात्र शुद्धच असले पाहिजे, असे सांगतात. मॅक्सिनमावशींचे प्रेम संत साहित्यावर अपरंपार आहे. मॅक्सिनमावशी संतपरंपरेतील अभंग आणि ओव्या गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत. त्यांनी मराठी भाषेसंदर्भातील सुमारे अर्धा डझन पुस्तके लिहिली आहेत.

मॅक्सिन बर्नसन यांचे मत असे आहे, की कोणतीही भाषा शिकण्याकरता वयोमर्यादा ही नसते. कोणतीही भाषा आत्मसात केल्याने ती भाषा सहज बोलता येते. त्यांना वाटते, की त्यासाठी पहिली किंवा बालवाडीपासून शिकणे गरजेचे नाही.

त्यांची आवडणाऱ्या मराठमोळ्या पदार्थाची यादी- थालीपीठ, खिचडी-कढी, शेंगदाण्याची चटणी, पालकाची पातळभाजी, आमरस-पुरी अशी न संपणारी आहे.

त्यांना भाषाविषयक कामाकरता अशोक केळकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांना शिक्षणविषयक कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना सातारा येथील साहित्य संमेलनात (1992) गौरवण्यात आले. ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या प्रसिद्ध पुस्तकात त्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर ‘ए चान्स टू ड्रीम’ नावाचा माहितीपटही तयार केला गेला आहे.

 मॅक्सिन बर्नसन maxineberntsen@gmail.com

संपदा वागळे  9930687512 sampadawagle@gmail.com
(‘लोकसत्ता’वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

——————————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. मॅक्सिन मावशींच्या फलटणच्या शाळेला भेट देऊन आम्ही प्रत्यक्ष शाळा पाहिली आहे. मंजिरीताई निंबकर यांनाही भेटण्याची संधी मिळाली होती.

  2. बालवाडी ते दहावी मी आजींच्या शाळेत शिकले . त्या शिक्षिका म्हणून लाभल्या . त्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला हे मोठे भाग्य आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here