गुळाच्या काकवीची गंमत (Kakvi – Byproduct of Jaggery Village Industry)

1
92

मोराणे सांडस हे छोटेसेटुमदार खेडे (बागलाण तालुका, नासिक जिल्हा) मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. मोसम नदीच्या पाण्यामुळे मोसम खोरे समृद्ध होते. नदीची एक थडी पूर्ण बागायती तर दुसरी थडी पूर्णपणे कोरड. म्हणूनच काकडगावच्या लोकांनी मोराण्याला बागायती जमिनी घेऊन ठेवलेल्या होत्या. नदीकाठावर भरपूर वृक्षराजी होती. नदीकाठावरून लांबच लांब वाहत जाणारे नदीपात्र काठावरील झाडांमुळे आणि पाण्यात पडलेल्या त्यांच्या प्रतिबिंबांमुळे मनोहारी आणि आल्हाददायक वाटायचे. मामांचा ऊसाचा मळा गावापासून जवळच होता. मी ऊसाच्या दिवसात रोज सकाळी शाळेत जाण्याच्या आधी शेतात जावून एक आख्खा ऊस तोंडाने चावून खात असे. त्यामुळे दातही स्वच्छ रहायचे आणि ताजा रस मिळाल्याचे समाधान असायचे. शेतात जावून ऊस खायला कोणाचीच मनाई नसायची. पैलतीरावर काकडगावच्या अना (आनंदा) पाटलाची ऊसाची क्रेशर (करसड) होती. तेव्हा परिसरात वीज पोचली नव्हती. डिझेलवर चालणारे कुपरचे इंजिन असायचे. तो मशीनवर ऊसाचा रस काढून एका मोठ्या गोल पसरट कढईत जमा केला जायचा. कढई एका मोठ्या चुलांगनावर ठेवलेली असायची. ऊसाच्या चिपाटाने जाळ करून कढईतील ऊसाचा रस तापवायचे. रस उकळून घट्ट व्हायचा. वर साय जमायची. तज्ञ मजुरांना भट्टी कोठपर्यंत तापवायची ते समजायचे. भट्टी जमली की तो घट्ट रस बादलींमधे ओतून घ्यायचे. त्यापासून गुळाच्या भेल्या तयार व्हायच्या.

          मालेगाव जवळील रावळगावला वालचंद हिराचंद यांचा खासगी साखर कारखाना होता. तो आमच्या जिल्ह्यातील पहिलाच साखर कारखाना असावा. कारखान्याची स्वतःची ऊसाची शेती भरपूर होती. गावोगावच्या शेतकऱ्यांचा कल त्यांच्या परिसरातील क्रेशरवर ऊस नेऊन गूळ तयार करण्याकडे असायचा. अना पाटलांची क्रेशर सीजनमधे फूल चालायची. शेतकरी नंबर लावून ठेवायचे. कोणाही शेतकऱ्याचे ऊस असले तरी क्रेशरवर यायला मनाई नसायची. ऊसाच्या रसाची गरम चिगट साय ऊसाच्या चिवटीने खाण्याची मजा काही औरच असायची. रसाचा तो पाक म्हणजे एक प्रकारचा चिवट गूळच. कढईजवळ बसून मनसोक्त गूळ खायला मिळायचा. घरी असणाऱ्या बायांना किंवा लहान मुलांसाठी चाटू भरून घेऊन जायचो. ऊसाचे टिपरू ऊसाच्या पाकात फिरवले, की गुळ ऊसाला चिकटून यायचा. नंतर तो केंव्हाही खाल्ला तरी चालायचे. माझ्या बाबतीत सारे गाव मामाचे. कोणाचाही ऊस क्रेशरवर आलेला असो मला नेहमीच प्रवेश मिळायचा. अजूनही त्या गोड मधूर जिभेला चटका लावणाऱ्या ताज्या गुळाची चव जिभेवर रेंगाळत आहे असे वाटते.

    घरी पाहुणे आले आणि त्यांना रस प्यायचा असला की मी धावत नदी ओलांडून क्रेशरवर जायचो. बादली भरून ताजा रस घेऊन यायचो. मराठी शाळा गावात चौथीपर्यंत होती. मुख्याध्यापक नामपूरहून यायचे. ते आले म्हणजे ठरावीक मुले तांब्या घेऊन क्रेशरकडे धावत सुटायचे व रसाचा तांब्या भरून घेऊन यायचे. उकाडा लावल्यासारखा गुरूजींना रोज ताजा रस, तोही फुकटात मिळायचा! नामपूरहून चालत आल्यामुळे गुरूजींना आलेला शीणवटा कोठल्या कोठे पळून जात असेल! विशिष्ट प्रकारचा तापलेला रस आणि गव्हाचे पीठ यांपासून बर्फीसारख्या वड्या तयार करायचे. त्या वड्या कितीही दिवस खाण्यास उपयोगी पडायच्या. शेवटी शेवटी तर त्या इतक्या कडक होऊन जायच्या, की दातांची परीक्षाच पाहायच्या! ऊसाच्या रसाला विशिष्ट ताव आला की तो मातीच्या घागरीत भरून ठेवायचे. त्यांपासून काकवी तयार व्हायची. मधासारखी दिसणारी आणि मधासारखीच चव असणारी काकवी वर्षभर घरात असायची. भाजी नसेल तेव्हा भाकरी काकवीबरोबर लावून खायचो. काकवी संपत आली की मडक्याच्या तळाशी खडीसाखर तयार झालेली असायची. घरात अडगळीच्या खोलीत गूळाच्या भेल्या पडलेल्या असत. आंब्याच्या दिवसात किती वेळा रसपोळीचे जेवण व्हायचे त्याला गणतीच नाही. कारण गूळ, दाळ, आंबे घरचेच असायचे. घरात भुईमूगाच्या शेंगांची पोती भरलेली असत. कारण त्याच शेंगा फोडून पुढील वर्षासाठी बी-बियाणे तयार करावे लागे. गूळ-शेंगदाणे हा गरिबाचा खाऊ असायचा. मला लहानपणी गूळ फार आवडायचा. मी चोरून खिशात गूळ ठेवायचो. त्यामुळे माझा पँटचा खिसा गुळाने कडक होऊन जायचा.

          नंतरच्या काळात सहकारी साखर कारखाने वाढत गेले. रावळगाव व्यतिरिक्त गिरणा सहकारी साखर कारखाना निघाला. साखर सम्राट निर्माण झाले. कारखान्यांची दुकानदारी चालावी म्हणून, की काय महाराष्ट्रात गूळ तयार करण्यावर बंदी आली. गुळाची गुऱ्हाळे बंद पडली. गुळाची साय गेली. चाटूही गेले. काकवी नाहीशी झाली. क्रेशरच्या जागा नंतर बरेच दिवस भग्न अवशेषासारख्या पडलेल्या दिसायच्या. हळुहळू, सर्व अवशेष नष्ट होत गेले. एकोणसत्तरच्या महापुरात नदीकाठची मोठ मोठी झाडे वाहून गेली. ते दिवसच वेगळे होते. सुखसुविधा नव्हत्या पण जीवन आरोग्यदायी होते. पुढे पुढे बागायती शेती कमी होत गेली. इतर ठिकाणी बागायत वाढले तरी इतर नगदी पिकांकडे शेतकरी वळला. ऊसाची शेती कमी झाली.

          (कोल्हापूर भागात गूळ तयार करण्यास परवानगी आहे.)

– गोविंद बी. मोरे 95884 31912 gm24507@gmail.com

———————————————————————————————-—————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. छान बापू, खरोखरच आपण थिंक महाराष्ट्र च्या माध्यमातून गुळाच्या काकवीची गंमत ही कथा सुंदरपणे प्रस्तूत केली. आपल्या मामाच्या गावी आपलं शालेय जीवनातील सुंदर किस्सा आपण वर्णिणेला आहे. आमचे बापू म्हणजे मोरे सर यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आठवणीतील गावाकडील कथा, शालेय शैक्षणिक सहलीतील मजेदार प्रसंग तसेच अहिराणी भाषेतील माय मराठी साहित्य ठेवा ह्याचे विशेष भाग प्रस्तुत करून नवीन पिढी समोर जुन्या घटना आणि प्रसंगांचा देखावा सादर केला. नव्या पिढीने त्या स्मरणात ठेवाव्यात हीच मापक अपेक्षा. संतोष गवळी. मालाड, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here