रंगीत लाकडी खेळण्यांची सावंतवाडीतील परंपरा
सावंतवाडी हे साडेतीनशे वर्षांची परंपरा असणारे कोकण विभागातील एकेकाळचे लहानसे संस्थान. तेथील सावंत भोसले राजघराण्याने सदैव अध्यात्म, कला आणि शिक्षण या क्षेत्रांना राजाश्रय दिला. त्यामुळे ते संस्थान अभिजात सांस्कृतिक वारसा जोपासत जागतिक स्तरावर पोचले. तेथील कलावस्तू या केवळ सुंदर व आकर्षक नव्हत्या तर जीवनव्यवहारातही त्यांचा वापर होई. त्यामुळे त्या वस्तू सातत्याने निर्माण झाल्या व त्याबरोबर त्यांचे देखणे व आकर्षक रूप जोपासले गेले. सावंतवाडीच्या कलावंतांच्या हातात जणू जादुई कौशल्य होते. त्या कलावस्तू परंपरागत पद्धतीने उत्पादित करणारी काही नामवंत घराणी होती. सुतार, चितारी, मयपांचाळ, पुराणिक, जिनगर या कुटुंबपरंपरेतून, त्या त्या कलाकार समुहाच्या कौटुंबिक वारशाने संबंधित कला जोपासली गेली होती. त्यात काही वेळा, कौटुंबिक वारशाचा हट्ट व दुराग्रहही असे, पण त्यामुळेच त्या कलावस्तू मूळ रूपात टिकून राहिल्या.