किरण जोशी - पोथ्यांनी झपाटलेला संग्राहक!
काही व्यक्ती रुढ शिक्षणात रस न वाटल्याने वेगळा मार्ग चोखाळतात. त्यांच्या हातून वेगळेच कार्य घडत असते. त्यांचे समाजावर मोठे ऋण तयार होते! किरण जोशी हा तसा झपाटलेला तरुण आहे.
किरण शालांत परीक्षेच्या टप्यापर्यंत पोचला. तेथे त्याने असा निर्णय घेतला, की घराण्यात असलेली याज्ञिकाची वृत्ती स्वीकारायची! त्यासाठी पाठशाळेत जाऊन वेदविद्या घ्यावी असे त्याला वाटले. पाठशाळेत प्रवेश मिळाला नाही. वेदमूर्ती देवीदास सांगवीकर यांनी मात्र किरणला पौरोहित्यासाठी लागणारे आवश्यक त्या विधींचे पाठ दिले. ते विद्यादान चार-पाच वर्षे चालू होते. त्याने यजुर्वेद संहितेचीही संथा घेतली. त्या ओघात किरणच्या हाती त्याच्या घराण्यात परंपरेने आलेली यजुर्वेदाची पोथी आली. ती पाहताना किरणच्या अंगावर रोमांच उठले. त्याच्या अंतर्मनात अशी प्रेरणा निर्माण झाली, की त्याने अशा अनेक पोथ्या मिळवाव्यात! त्याने त्याच्या मनातील तो विचार सांगवीकर गुरुजींजवळ व्यक्त केला. गुरुजींनी आशीर्वाद दिला. म्हणाले, हे मोठेच पुण्यकर्म होय!