बौद्ध धर्मांतराची सहा दशके (Six Decades of Buddhist Conversion)
भारतीय राज्य घटनेत अनुसूचित जाती म्हणून काही जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या जातींचा उल्लेख सर्वसामान्यपणे दलित असा दैनंदिन भाषाव्यवहारात केला जातो. अनुसूचित जातींचे लोक सर्व भारतभर आहेत. त्या लोकांचा व्यवसाय गावांची साफसफाई करणे हा पूर्वी प्रामुख्याने होता. त्यामुळे स्वाभाविकच, त्यांचा घाणीशी संबंध येत असे. म्हणून समाजातील इतर जमातींचे लोक त्यांना त्यांच्यापासून दूर ठेवत; कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेत. म्हणून त्या जातीचे सर्व लोक अस्पृश्य समजले जात. सार्वजनिक ठिकाणी त्या लोकांना मज्जाव होता. रस्त्याने जाता येता त्यांचा इतर जमातींच्या लोकांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घेतली जात असे, पण त्यांची सावलीही इतर तथाकथित सुधारलेल्या जातींच्या लोकांच्या अंगावर पडता कामा नये, रस्त्याने जाताना त्यांनी थुंकू नये म्हणून त्यांच्या गळ्यात मडकी टांगलेली असत असे विकृत अतिरेक चालत.