नवीन पालघर जिल्ह्यातील वंजारी समाज


‘कोणत्याही भूमीत रुजावे
अशक्य ते शक्य करून दाखवावे
स्वाभिमाने कुठेही जगावे
ही तर वंजाऱ्यांची खासियत असे’

वंजारी समाजाविषयी असे म्हटले जाते, की ‘वंजारी समाज कुठेही गेला तरी आपला ठसा उमटवल्याशिवाय राहत नाही.’ हा वंजारी पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात बहुतांशी वस्ती करून राहतो. वंजारी समाजाची एकूण चोवीस गावे आहेत. त्यातील तब्बल एकोणीस गावे पालघर तालुक्यात, डहाणू तालुक्यात दोन गावे, पूर्वी महाराष्ट्रात असलेल्या आणि आता गुजराथ राज्यात असलेल्या उंबरगाव तालुक्यातील तीन गावे अशी चोवीस गावांची विगतवारी देता येईल. महाराष्ट्रात वंजारी समाजाच्या चार शाखां (जाती) चा उल्लेख आहे. 1. लाडवंजारी, 2. मथुरी वंजारी, 3. रावजीन वंजारी आणि  4. शेंगाडा वंजारी. पालघर जिल्ह्यातील वंजारी मात्र फक्त मथुरी वंजारी समाजाची आहेत. असे असले तरी महाराष्ट्रातील इतर वंजारी/बंजारा समाजाशी बेटी व्यवहार अद्यापही उघड उघड होत नाही. आता मात्र शिक्षण, ‘जातियता नष्ट करा’ शासन धोरण, बदलती सामाजिक विचारसरणी यांमुळे जातीयतेचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. ‘जातीसाठी खावी माती’ असा एकंदरीत रीवाज होता. पण आता ते कालबाह्य होऊ लागले आहे. ‘जात नाही ती जात’ असे म्हणतात ते खोटे नाही.