देवर्षी नारद : आद्य पत्रकार
देवर्षी नारद यांना आद्य पत्रकार म्हणतात, कारण त्यांचा संचार त्रिभुवनात असे आणि त्यांचे लक्ष तिन्ही लोकांमध्ये कोठे काय घडत आहे यावर बारकाईने असे. जे हानिकारक, दुष्ट शक्तींना बळ देणारे आहे त्याच्या निर्दालनाचे कार्य करण्याचे सामर्थ्य कोणाकडे आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याकडील माहिती सज्जन शक्तींचे प्रतीक असलेल्या देवांपर्यंत पोचवण्याची तत्परता हेही नारदमुनी यांचे वैशिष्ट्य. पत्रकाराकडून तेच अपेक्षित असते ना! नारद यांनी त्रैलोक्याच्या भल्यासाठी जागल्याच्या भूमिकेतून सदैव केलेले कार्य पाहता त्यांना आद्य पत्रकार म्हणणे सार्थ ठरते.
नारद यांच्याकडे शोधवृत्ती, जिज्ञासू वृत्ती, चिकित्सक दृष्टी, निर्भीडपणा, स्थिरचित्त, तत्परता, कार्यनिष्ठा आदी गुणांचा समुच्चय होता. पत्रकारिता करण्यासाठी याच गुणांची आवश्यकता असते. त्यासोबत विश्वासार्हता महत्त्वाची.