अरुणा ढेरे - साहित्यातील सर्वंकष जाणिवांना स्पर्श
यवतमाळ येथील व्यासपीठावर आश्वासक गोष्ट घडली; ती म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली अरुणा ढेरे यांची निवड आणि त्यांचे विचक्षण, व्यासंगी, अभिजात भाषण! त्यांनी साधलेला ममत्वशील संवाद! त्यांचे दीड तासाहून अधिक चाललेले (सेहेचाळीस पानी) भाषण अमृतानुभव देऊन गेले. विवेकी विचारांच्या आणि जाणिवांच्या दुष्काळात पडलेला तो विवेकी पाऊस साहित्यरसिकांना तृप्त करणारा होता. साहित्य संमेलनातील रसिकगण तो अमृतवाणिवर्षाव जिवाचे कान करून ऐकत होते. ते मंत्रमुग्ध होणे या वाक्प्रयोगाचे आणि ज्ञानदेवांच्या संकल्पनेतील हृदयसवांदाचे प्रत्यंतर होते. त्यांनी विद्वतेचा अभिनिवेश न बाळगता कमालीच्या संयतपणे संदर्भबहुल, अर्थपूर्ण व व्यासंगी भाषण केले. त्यांनी विनम्रतेने साधलेला तो संवाद आश्वासक आणि माय मराठीच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारा व साहित्यवास्तव मांडणारा होता. त्यांनी प्राचीन साहित्य ते कला, साहित्य, संस्कृती, साहित्यनिर्मिती, साहित्यकारांची बांधिलकी अशा विविध विषयांचा उहापोह केला; गंभीर वृत्तीने नव्याने लिहिणाऱ्यांचा - त्यांच्या प्रयोगशीलतेचा गौरव केला आणि उद्याच्या साहित्याबद्दलची अपेक्षाही व्यक्त केली. हे सारे महत्त्वपूर्ण आहे.