दु:ख, वेदना आणि मृत्यू


माझ्या पावणेतीन वर्षांच्या नातवाचे नुकतेच निधन झाले. त्याला ब्रेन ट्युमर झाला होता. तो अवघ्या दीड वर्षांचा असताना ब्रेन ट्युमरचे निदान झाले आणि त्यानंतर सव्वा वर्ष त्या लहानग्या जीवाने कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी लढत दिली.

माझे मन आक्रंदन करून मनातल्या मनात सतत विचारात राहिले होते, एवढेसे दीड-दोन वर्षांचे लहान पोर, त्याला ब्रेन ट्युमर का व्हावा? त्याने काय पाप केले होते? कुणाचे काय वाईट केले होते?

कुणास ठाऊक हे गूढ कसे उकलावे?

का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?

पण या प्रश्नाला उत्तर नव्हते. तरी मनात दाटून आलेल्या दु:खाला वाट कशी करून द्यायची? मला रडता येत नाही. मी वाचत राहिलो. त्याच ओघात एका ग्रीक कवीची कविता समोर आली. कविता सेमोनायडीस या प्राचीन ग्रीक कवीची आहे. त्याचा कालखंड ख्रिस्तपूर्व ५५६ ते ख्रिस्तपूर्व ४६८ असा सांगितला जातो. त्याने ज्या काळात ही कविता लिहिली, त्या काळी ग्रीक लोकांचे पर्शियाबरोबर युध्द चालू होते. ते अनेक वर्षे चालले आणि त्यात प्रचंड प्राणहानी झाली. सेमोनायडिसच्या बर्‍याच कविता त्या युद्धाच्या संदर्भातल्या आहेत. प्राचीन ग्रीक वाड्मयामधे त्या गाजल्या. त्यातून सेमोनायडिसला प्रसिध्दी मिळाली.