सुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता!
सुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली ती अलिबागजवळ सासवणे या गावी गेलो तेव्हा. तेथे ख्यातनाम शिल्पकार करमरकर यांच्या कलाकृतींचे कायम प्रदर्शन त्यांच्याच घरात मांडलेले आहे. कोणत्याही दिवशी जाऊन पाहवे आणि आनंदित व्हावे असा तो खजिना आहे. विशेषत: करमरकरांनी कोरलेले प्रत्येक शिल्पकृतीचे डोळे... ते पाहणाऱ्याला गारद करतात. करमरकरांच्या सुनबाई सुनंदा त्या संग्रहालयाची देखभाल करतात, काळजी घेतात. एका भेटीत त्यांच्याकडून कळले, की चित्रकार सुहास बहुळकर तेथे येतो, करमरकरांच्या जुन्या डायऱ्या पाहतो, नोंदी करतो. सुहासच्या कलाविषयक आस्थेच्या विविध गोष्टी नंतर मग कळत गेल्या आणि मी त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढला जाऊ लागलो. एका टप्प्यावर, आम्ही मित्रच होऊन गेलो!