चला, सूर्याची परिक्रमा अनुभवू या... (Let's Experience the orbit of the Sun)
सूर्य हा आकाशात संक्रमण करत असतो. फार फार पूर्वीच्या काळी, काही माणसे निसर्गाचे निरीक्षण करत असताना, त्यांना सूर्य काही वेळा वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ठरावीक वेळी घरावर, झाडाच्या मागे, अन्य ठिकाणी दिसत असे. त्यावरून सूर्याचे संक्रमण, ग्रहताऱ्यांचा संचार यांबाबत निरीक्षणे मांडली गेली व खगोल विज्ञान विकसित होत गेले. ते अनुभवण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी साधने पूर्वी नव्हती. तरी त्यावेळच्या लोकांनी चिकाटीने अनेक शोध लावले. परंतु ते जाणण्यासाठी, निसर्गाचा तो अनुभव पडताळून पाहण्यासाठी मात्र आता आपल्या सगळ्यांच्या हातात एक साधन आहे, ते म्हणजे मोबाईल. आपण त्याद्वारे एक प्रयोग करून सूर्याची परिक्रमा पडताळून पाहू शकतो.
सूर्य हा कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त या तीन वृत्तांमध्ये फिरत असतो. तो विषुववृत्ताच्या वरती साडेतेवीस अंश आणि खाली साडेतेवीस अंश अशी परिक्रमा करतो. तो उत्तर-दक्षिण ध्रुवाकडे जात नाही. त्याचा वावर हा त्या तीन वृत्तांमध्येच असतो. तो जेथे आज उगवतो तो तेथे पुढील एक महिन्याच्या कालावधीत नसतो. तो थोडा थोडा सरकतो. तो कर्कापासून विषुववृत्तात जातो. नंतर तो विषुववृत्तापासून मकरमध्ये प्रवेश करतो. त्याची परिक्रमा ही खो-खो खेळासारखी असते.