तेरचा प्राचीन वारसा
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते. भारतातील मोठ्या बाजारपेठांमध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून त्या शहराचा समावेश होता- ती प्रसिद्धी चालुक्यांच्या आणि राष्ट्रकुटांच्या काळातही कायम होती. ग्रीक प्रवाशाने ‘पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या नावाचा ग्रंथ इसवी सन 50 ते 130 या काळात लिहिला. त्या ग्रंथामध्ये तेरचा उल्लेख तगर असा आलेला आहे. तो ग्रीक प्रवासी म्हणतो - “दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. त्यांतील पहिले बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच – भडोच). त्यापासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे पैठणहून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोचता येते.
पैठणहून बॅरिगाझा येथे माळरानातून मार्ग काढत दगड आणला जातो. त्याउलट, तगर येथून साधे कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट बॅरिगाझा येथे पाठवले जाते. त्याचप्रमाणे, समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरिगाझा येथे पाठवला जातो.”