छंदमय जीवन जगणारे शिक्षक - शंकर माने
शंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील भातगाव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांनी पुठ्ठ्यापासून वेगवेगळ्या प्रतिकृती बनवून त्यांच्या छांदिष्ट जीवनास सुरुवात केली. त्यांनी पुठ्ठयामध्ये अनेक प्रकारची घरे, मंदिरांच्या प्रतिकृती बनवल्या. पुठ्ठयापेक्षा बांबूपासून अधिक मजबूत वस्तू तयार होतील, म्हणून तो प्रयोग त्यांनी करून पाहिला. त्यांनी आतापर्यंत बांबूपासून गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल, शिडाची जहाजे, वाहनांचे मॉडेल्स, मंदिरे, होड्या; त्याचबरोबर वॉलपीस, ग्रिटिंग कार्ड, फुलदाणी इत्यादी कलाकृती बनवल्या आहेत. त्यांनी बालवयात जडलेल्या चित्रकला व काष्ठशिल्प कलेच्या छंदातून अनेक कृती घडवल्या. त्यातून नवनवीन छंद तयार होत गेले. विद्यार्थी नवीन इयत्तेत गेल्यानंतर जुन्या वर्षीचे पाठ्यपुस्तक निरुपयोगी ठरवून ते रद्दीत घालतो, पण शंकर माने यांनी त्याच निरुपयोगी ठरवून, फेकल्या जाणाऱ्या पुस्तकाचे अनमोल अशा ठेव्यात रूपांतर केले आहे.