खडकाळ पठारे – जैव भांडारे अपर्णा वाटवे यांचा अभ्यास
अल्पजीवी, भक्कम खोड नसलेल्या वनस्पती आणि खडकांच्या भेगेत, फटीत, जमिनीतील खोलगटीत दडलेले साप, बेडूक, सरडे, वटवाघळे हे कीटक, प्राणी... तेसुद्धा निसर्गाचा भाग आहेत, त्यांना त्यांची जीवनप्रणाली आहे आणि त्यांचे ते छोटेखानी जीवनदेखील या विशाल जीवसृष्टीचे चक्र चालू राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. पुण्याच्या निसर्गप्रेमी अपर्णा वाटवे यांनी या निसर्गजीवनाकडे व त्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष वेधले.त्या महत्त्वाच्या निसर्ग घटकाकडे अपर्णा वाटवे यांनी त्यांची मांडणी करेपर्यंत सर्वसाधारण माणसांचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे जमिनीचे तसे भाग निर्जीव, उजाड, वैराण ठरत! त्यामुळेच, भौतिक विकासाच्या योजनांसाठी त्या पठारी भागांचा पडिक जमीन म्हणून विचार व वापरही होतो. उदाहरणार्थ, जैतापूरच्या पठारावरील नियोजित अणुऊर्जा प्रकल्प. सडे, खडकाळ पठारे म्हणजे निरुपयोगी जागा समजून तेथे खाणकामाला परवानगी दिली जाते. पठारांवर बाहेरून माती टाकून आंब्याची झाडे लावली जातात. साताऱ्याच्या चाळकेवाडीला पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत.