श्यामची आई
महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे पुस्तक ‘श्यामची आई’! त्या पुस्तकाबद्दल लिहिताना पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांचे उद्गार प्रथम आठवतात. पुस्तक प्रकाशित होत असताना त्यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले होते, “हे हस्तलिखित आतापर्यंत साठसत्तर लोकांनी ऐकले-वाचले आहे. ते त्यांना आवडले. ते मी न विचारताच ‘आईबद्दलची त्यांची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली’ असे म्हणाले. या पुस्तकाचे काम झाले आहे. ते महाराष्ट्रात खपले नाही, तरी त्याचे कार्य झाले आहे. ते लिहीत असताना मला अपार आनंद लुटावयास मिळत होता, हा काय कमी फायदा? परंतु मी आसक्तीमय आशा बाळगून राहिलो आहे, की ‘श्यामची आई’ घरोघरी जाईल; ते मुलांची मने बनवू पाहणाऱ्या पाठशाळांतून, निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळांतून तरी जाईल.