कणकवलीचे भालचंद्र महाराज
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर आणि आनंदीबाई या मातापित्यांच्या पोटी 8 जानेवारी 1904 रोजी झाला. त्यांचे आई-वडील लहानपणीच वारले. त्यांचे शिक्षण चुलते व मुंबईतील मावशी यांच्याकडे झाले. ते वसई हायस्कूलमध्ये शिकले, पण त्यांनी शिक्षण मध्येच सोडले. त्यांनी वर्षभर कोकणात भटकून, देशावर पलायन केले. त्यांचे चुलते कोल्हापूर जिल्ह्यात नितवडे गावी होते, ते तेथे हजर झाले. भालचंद्राची ती अवस्था पाहून सर्वजण चकित झाले. त्यांना वाईट वाटले. त्यांनी त्याला आंघोळ घालून, नवीन कपडे दिले. ते तेथूनही पसार झाले. ते रोज वीस-वीस मैल पायपीट करत, कोणाच्याही घरी उभे राहत, कोणी भाकरतुकडा दिला तर खात, झाडाखाली अगर मंदिरात झोपत.