भारतीयन्स - सकारात्मकतेचा सोशल मंत्र
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.
आयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्यात.