वैष्णवधाम - आदर्श गावाचा आगळा प्रयोग (Vaishnavdham)
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव निसर्गाच्या कोपाने नेस्तनाबूत झाले. वैष्णवधाम हे गावही माळीण या गावासारखे; त्याच परिसरातील; तशीच पार्श्वभूमी असलेले छोटेसे खेडे. लोकवस्ती दोन हजारही नाही. ती वस्ती बुचकेवाडी या नावाने पूर्वी ओळखली जाई; आता ‘वैष्णवधाम’ आहे. या गावाने अल्पावधीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम, पुणे जिल्हा परिषदेचा डोंगरी भागातील आदर्श कृषी ग्राम अभियानातील प्रथम क्रमांक असे पुरस्कार मिळवले आहेत. तसेच, गावाचा गौरव संत तुकाराम वनग्राम अभियानातही झाला आहे. वैष्णवधामच्या यशोगाथेची सुरुवात झाली 2009 सालापासून.
तोपर्यंत ते गाव होते बकाल खेडे. घरटी एक माणूस मुंबईत चाकरीला. शेती पारंपरिक. जवळ बंधारा बांधलेला. बंधाऱ्यात बुचकेवाडीकरांची जमीन गेलेली, पण बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ शेजारच्या पारुंडेकरांना. बुचकेवाडीचे प्रकल्पग्रस्त लाभक्षेत्रात नव्हते. त्यांना पाणी उचलून घेण्याची मुभा होती. मग काही शेतकरी धीर करून एकत्र आले. त्यांनी ‘लिफ्ट इरिगेशन’ची स्कीम करण्याचे ठरवले. पण त्या प्रयत्नाचा लाभ थोडक्या शेतकऱ्यांना; तोही वर्षांतील दोन पिकांपुरता झाला. गावकऱ्यांना शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला ‘लुपिन फाउंडेशन’ने. त्या संस्थेने गावकऱ्यांना ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या कार्यक्रमाचे महत्त्व पटवले.