डुबेरे गावची प्राक्तनरेषा – सटवाई!
डुबेरे हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर आहे. गाव छोटे पण टुमदार आहे. एका बाजूला औंढपट्टा डोंगराची रांग आहे व दुसऱ्या बाजूला एकच डोंगर ध्यानस्थ ऋषीसारखा बसलेला आहे. त्यावर गावकर्यां नी देवीचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. डुबेरे गावाला निसर्गाने सौंदर्य मुक्त हस्ताने दिले आहे. गाव दाट झाडीत वसलेले आहे; आंबराया, चिंचेची बने, बोरी-बाभळी यांनी गाव व्यापून टाकलेले आहे. गावाला काटेरी झाडांचे भक्कम कुंपण आहे. डुबेरे गावाची ओळख थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मगाव म्हणून आहे.
गावाचे नाव डुबेरे का पडले? लोक मजेदार आख्यायिका सांगतात. गाव गर्द झाडीत डुबलेले असल्यामुळेच डुबेलऽ ऽ डुबेलचे ‘डुबेर’ झाले. गावाला पूर्वी भक्कम तटबंदी होती. गावाला दोन वेशी आहेत. गावातील घरांची रचना सुडौल आहे. रस्ते व गल्ल्या एकमेकांना काटकोनात छेदतात. ते गाव अंताजी बर्वे यांनी तीनशे वर्षांपूर्वी वसवले असे मानले जाते. गाव डोंगरात असल्याने गवताची राने आहेत.