वेत्त्ये- निसर्गसंपन्न आडगाव! (Vettye)
वेत्त्ये हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सागरकिनारी वसलेले छोटेसे गाव. आडिवरे गावाचे उपनगर म्हणावे असे. त्या गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आडिवरे येथील महाकाली देवीच्या मानपानामुळे वेत्त्ये गावाला ते स्थान लाभले आहे. वेत्त्ये हे गाव स्वतंत्रपणे निसर्गाची देणगी आहे. तसा स्वच्छ, मनमोहक आणि रमणीय समुद्रकिनारा अन्यत्र सहज पाहण्यास मिळणार नाही, कारण वेत्त्ये आहे आडगाव. पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्या नजरेपासून दूर राहिलेले. तिन्ही बाजूंला भारदस्त असे डोंगर व एका बाजूने फेसाळणारा समुद्र ... आणि त्याच्या बाजूला वाळूच्या छोट्या डोंगरानजीक विसावलेली टुमदार घरे. त्या डोंगरावर पावसाळ्यात सौंदर्याची अधिकची भर पडली जाते. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ते गाव अलिकडे प्रकाशझोतात येत आहे.