नाथ संप्रदाय व त्याचा प्रभाव
नाथ संप्रदाय हा भारतातील प्राचीन लोकप्रिय असा धर्मपंथ आहे. तो मध्ययुगीन उपासना पंथ आहे. नाथसंप्रदायाचे महत्त्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अनन्यसाधारण आहे. नाथपंथाचा प्रभाव महाराष्ट्रातील वारकरी, दत्त, आनंद, समर्थ या साधनासाधक संप्रदायांवर पडलेला दिसून येतो. मराठीतील आद्यकवी मुकुंदराज, ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ हे नाथपंथीय होते. नाथपंथ नेपाळ, आसाम, बंगाल, पंजाब, उत्तरप्रदेश या भूभागांपासून श्रीलंकेपर्यंत पसरलेला होता. नाथ संप्रदायाचे विशेष अद्वैतभाव, योगभक्ती, कृष्णभक्ती, गुरुनिष्ठा, देशीभाषेतील साहित्यनिर्मिती हे होत. त्या संप्रदायाने सगुण-निर्गुण या दोन्ही प्रकारच्या उपासनेला महत्त्व दिले. त्या संप्रदायाची ख्याती सर्वसंग्राहक व समन्वयवादी अशीही आहे.